पुढे चालू

पोर्तुगीज सत्ता दृढ होत चालल्याने येथील 'मूर्ती पूजक' व इतरांना पाखंडी मानून त्यांच्या धार्मिक व सांस्कृतिक जीवनावर बंधने घालण्यात येऊ लागली.

Story: मागोवा । तेजश्री प्रभु |
16th October 2021, 10:57 pm
पुढे चालू

इसवी सन १४९८  ते १९६१ - गोव्यातली  पोर्तुगीज राजवट

पोर्तुगालचा   राजा  दों जुवांव हा अतिशय  धर्मनिष्ठ होता. त्याने पोर्तुगालमध्ये  धर्म समीक्षण सभे (Inquisition) ची स्थापना केली  होती. ज्यू लोकांनी ख्रिस्ती धर्म  स्विकारावा म्हणून त्यांची छळणूक करण्यासाठी सभा स्थापिली होती. सातवे पोप क्लॅमेतीकडे ह्या सभेची सूत्रे होती. १७ डिसेंबर, १५३१ पासून सुरू झालेल्या ह्या सत्तेने 'ज्यू' लोकांचे अनन्वित छळ केले. हात पाय तोडणे, घोड्याच्या शेपटीला बांधून रक्तबंबाळ अवस्थेत  जीव  जाईपर्य॔त फरफटत फिरवणे. शिरच्छेद करणे, मुंडकी कापून लटकविणे, असा अमानुष छळ सुरू केला. ह्या धर्मसमीक्षक सभा ह्या लोकांकडून हव्या तश्या जबान्या नोंदवून घेत असत आणि मग त्यांना जिवंत जाळीत असत. त्यांची मालमत्ता सरकार जमा केली जाई.

शेवटी पोपला आपली चूक कळून आली. १५३२ मध्ये १७ ऑक्टोबरला त्यांनी ही धर्मसमीक्षक सभा रद्द केली. पण परत  २३ मे,१५३६ साली पोर्तुगाल येथे ती परत स्थापिली  गेली. ह्या सभेचे सामर्थ्य प्रचंड होते आणि गोव्यातही धर्मांतर व्हावे म्हणून फ्रासिश्क शाव्हियरला ह्या  धर्मसमीक्षण सभेची इथें आवश्यकता वाटली. कालांतराने गोमंतकात १५६०  मध्ये( त्याच्या मते) पवित्र इन्क्विझिशन (santa  Inqaisicao )ची स्थापना केली गेली. मध्ये ह्या सभेवर १७७४ साली बंदी घातली खरी. पण परत १७७९ साली ती पुन्हा स्थापना करण्यात आली आणि १८१२ पर्य॔त अनन्वित छळ आणि धर्म परिवर्तनाचे दुष्ट कार्य गोमंतकात अविरत चालू होते.

पोर्तुगीज सत्ता दृढ होत चालल्याने येथील 'मूर्ती पूजक'  व इतरांना पाखंडी मानून  त्यांच्या धार्मिक व  सांस्कृतिक जीवनावर बंधने घालण्यात येऊ लागली. तसा हुकूम काढण्यात आला. त्या नुसार तसे न करणाऱ्यास  कडक शिक्षा होऊ लागल्या. १५४७ साली  हिंदूच्या सार्वजनिक जागा  वर्ज्य केल्या गेल्या. उत्सव बंद केले गेले. धार्मिक विधी, आचार यावरही बंदी घातली गेली. तरी हिंदू लोकांची धर्मनिष्ठा जाज्ज्वल्य होती. ते सगळी देवळे जमीनदोस्त झालीं असतानाही गुप्तपणे पूजा करत असत.

म्हणून जे शेणवी ब्राह्मण धर्मांतर करण्यास तयार नाहीत, त्यांना सीमेबाहेर हाकलून द्यावे अशी मागणी पत्राने 'मिंगेल व्हाज' याने पोर्तुगाल येथे कळविलें. त्या काळात गुलाम म्हणून माणसे विकली जात. ज्या हिंदूकडे असे गुलाम होते ; त्यांना बाटवून ख्रिश्चनानाच विकले जाऊ लागले. शिवाय जे निपुत्रिक मरत त्यांची सर्व संपत्ती, जमीन जुमला,  घर दार धर्मोपदेशकांना मिळावीत असा कायदा केला गेला .जर त्यांचे सगे कोणी ख्रिस्ती होत असतील तर त्यांना ती संपत्ती उपभोगता येत असे. जे ख्रिश्चन होत , त्यांच्या बायका मुले ख्रिस्ती मानली जात व दुसरे लग्न केल्यास होणारी संतती आपोआप  ख्रिस्ती मानण्यात येऊ लागली. म्हणून ती नातेवाईकांची वारस होऊ शकत नव्हती. पण जे बाटले, त्यांना आई वडिलांच्या इस्टेटचा वाटा मिळेल. आणि आई वडिलांच्या मृत्यून॔तर आणखी वाटा मिळेल असा कायदा केला. ख्रिस्तीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी गोव्याचा गव्हर्नर फ्रांसिस्क बार्रेतो याचे पाठबळ मिशनऱ्यांना मिळाले होते. सॉ  पॉल कॉलेजमध्ये  १७ मे, १७५७ मध्ये २३ लोकांचे ख्रिस्तीकरण करण्यात आले आणि मोठी मिरवणूक काढली. त्यात दों  जुवांव नुनीश बार्रेतोसह गोव्याचे प्रतिष्ठीत लोक सहभागी झाले होते.राजकीय पाठबळामुळे मिशनऱ्यांना अधिकाधिक लोकांना  ख्रिस्ती दिक्षा देणे सहज शक्य झाले. मग त्याच वर्षाच्या  २९ जूनला १२० लोकांचे धर्मातर सां पावल कॉलेजीत करून त्याना ख्रिस्ती बनविण्यात  आले  आणि ऑगस्टच्या १४ तारखेला  २४३  लोकांना  ख्रिस्ती धर्म दिक्षा दिली गेली. असे हे धर्मांतर अविरत चालू झाले.

(क्रमशः)

[संदर्भः-पुस्तक

स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास

मनोहर हिरबा सरदेसाई ]