दामबाबाचा गुलालोत्सव

उंच पर्वतशिखरांचा, खळखळणाऱ्या नद्यांचा, झुळझुळणाऱ्या झऱ्यांचा, झाडाझुडपांनी, लतावेलींनी वेढलेला, फळाफुलांनी बहरलेला निसर्ग संपन्न गोवा म्हणजे भारताचे दुसरे नंदनवनच. म्हणूनच तर देश-विदेशातील पर्यटक गोव्याकडे आकर्षित होतात. जगभरातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या आपल्या गोमंतभूमीमध्ये कितीतरी प्रेक्षणीय स्थळे आहेत. ज्यामध्ये मंदिरेच जास्त आहेत. साडेचारशे वर्षानंतरच्या जुलमी राजवटीनंतरही ह्या मंदिरांनी आणि त्यामधील देवदेवतांनी आपली संस्कृती जपून ठेवण्याचे समर्थपणे काम केले आहे.

Story: लोकसंस्कृती । पिरोज नाईक |
16th October 2021, 10:49 pm
दामबाबाचा गुलालोत्सव

गोव्यामध्ये श्री शंकराची अनेक मंदिरे आहेत. मंगेश, नागेश, महादेव, सोमनाथ, गणनाथ, भूतनाथ, आदिनाथ, सिद्धनाथ, चंद्रनाथ, मल्लीकार्जुन, महेश्वर अशा असंख्य रुपांनी कैलासाधिपती श्री शंकरानी गावोगावी वास्तव्य करून येथील भूमी पावन केली व लोकांना जीवन जगण्याची नवसंजीवनी दिली.

गोवा ही देवदेवतांची, सण उत्सवांची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे. येथे प्रत्येक गावातून पाच-सहा तरी मंदिरे पहावयास मिळतात आणि प्रत्येक मंदिरातून परंपरागत सण उत्सव साजरे होतात. वर्षभरात प्रत्येक मंदिरामध्ये वेगेवगळ्या तिथीला वेगवेगळे उत्सव साजरे होत असतात. पण शिमगोत्सव हा असा उत्सव आहे की तो मात्र विशेषत: दक्षिण गोव्यामध्ये फाल्गुन शु. नवमीपासून सुरू होऊन होळी पौर्णिमेला संपतो तर उत्तर गोव्यामध्ये होळी पौर्णिमेला सुरू होतो. प्रत्येक गावातील शिमगोत्सवाला वेगवेगळ्या नावाने संबोधले जाते. म्हार्दोळची चतुर्दशी,सत्तरीतील घोडेमोडणी, वाळपईच्या करवल्या, फोंड्याचा विरभद्र, डोंगरीचा प्रसिद्ध इत्रूज, काणकोणची शिशिरान्नी, वळवईचा गोंधळ तर जांबावलीचा गुलालोत्सव अशा निरनिराळ्या नावांनी प्रसिद्ध असलेल्या शिमगोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे आपल्या लोकसंस्कृतीचे जतन करून कलाकारांच्या कलागुणांना वाव देत नवीन कलाकारांची निर्मिती करणे, आपल्या परंपरागत रितीरिवाजानुसार सण साजरे करून सर्वांनी एकत्र येऊन आनंद उपभोगणे, शिमगोत्सव हा कष्टकरी समाजाचा प्रमुख उत्सव आहे. मरगळलेल्या जीवाला नवचैतन्य प्राप्त करून नव्या दमाने, नव्या जोमाने पुढे नेणारा हा सण हिंदू बांधव ढोल-ताशांच्या गजरात मोठ्या उत्साहाने साजरा करतात.

दक्षिण गोव्यातील केपे तालुक्यामध्ये कुशावती नदिच्या तिरावर वसलेले निसर्गसंपन्न जांबावली गाव धार्मिक, पवित्र स्थळ म्हणून ओळखले जाते. गावामध्ये श्री दामोदराचे भव्य व दिव्य असे मंदिर आहे. या मंदिराची गोव्यातील वैभवशाली मंदिरामध्ये गणना केली जाते. त्याचप्रमाणे गोव्यातील सर्वात सुंदर आणि वास्तुकलेचा नमुना म्हणूनही या मंदिराकडे पाहिले जाते. श्री दामोदर म्हणजे श्री भगवान, श्री शंकराचा अवतार, भक्तजन मोठ्या आत्मियतेने व श्रद्धेने ‘दामोदरा’ ला ‘दामबाब’ या नावाने संबोधतात. सर्व भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दामबाबाचा शिमगोत्सव ‘जांबावलीचा गुलाल’ या नावाने प्रसिद्ध आहे.

पोर्तुगीज राजवटीच्या काळामध्ये मडगावहून जांबावली येथे स्थलांतर करण्यात आलेल्या मंदिरातील शिमगोत्सव मठग्रामस्थ हिंदू सभेतर्फे साजरा करण्यात येतो. दामबाबांचा शिशिरोत्सव मडगावकारांचा उत्सव म्हणून ओळखला जातो. मडगावकरांचे आराध्य दैवत असल्यामुळे साहजिकच येथे मडगांवकरांची उपस्थिती लक्षणीय असते. साऱ्या गोमंतकामध्ये प्रसिद्ध असलेला हा शिमगोत्सव सतत सात दिवस चालतो.

जांबावली गुलालोत्सवाला श्री दामोदरच्या हळदुण्याच्या कार्यक्रमाने बुधवारी सुरुवात होते. कोंबवाडा-मडगाव येथे ‘केणी’ यांच्या घरी नारळाची पूजा केली जाते. दुसऱ्या दिवशी गुरुवारी केणी यांच्या घरी पूजेला लावलेला नारळ बँडवादनासह भव्य मिरवणुकीने जांबावलीच्या श्री दामोदर संस्थानाकडे रवाना होतो. त्यानंतर सतत सात दिवस निरनिराळे सांस्कृतिक कार्यक्रम, नाटके, लावणी, सुगम संगीत असे कार्यक्रम आयोजित केले जातात. मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता श्री रामनाथ देवस्थानाच्या प्राकारात पालखीत विराजमान असलेल्या श्री दामोदर देवाला गुलाल अर्पण केल्यानंतर गुलाल उधळण्यास सुरवात होते. क्षणार्धात मंदिराचा सारा आसमंत गुलालाच्या रंगात न्हाऊन जातो. श्री रामनाथांच्या प्राकारात ‘रामनाथ महाराज की जय’ हर, हर महादेव असा गजर करीत गुलालाची उधळण केली जाते. ढोल ताशांच्या गजरात दामोदराच्या नामघोषात सारा प्राकार दुमदुमून जातो. बालवृद्धांसह सारा भक्तगण मनसोक्तपणे गुलालाचा आनंद लुटतात. स्वागतासाठी उभारलेल्या कमानीनी आणि विजेच्या रोषणाईने सारा परिसर खुलून जातो. हा आनंद लुटण्यासाठी मडगांवकार परंपरागत गुलालाच्या दिवशी दुपारनंतर मडगाव बाजारपेठ बंद ठेवतात. संपूर्ण गोव्यातील तसेच गोव्याबाहेरील कर्नाटक, महाराष्ट येथील भाविक या गुलालोत्सवात सहभागी झालेले दिसून येतात. शिवाय गुलालोत्सवाला हिंदू बांधवांव्यतिरिक्त इतर धर्माचे लोकही आवर्जून हजर रहातात. यावेळी मंदिराचा सारा परिसर माणसांनी भरून जातो.

गुलालानंतर असंख्य लोक कुशावतीच्या पाणवठ्यावर (पाणथ्यावर) आंघोळ करतात. ह्या पाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे ह्या पाणथ्याचे पाणी औषधी असल्याचे सांगण्यात येते. ह्या पवित्र पाण्याने आंघोळ केली असता विविध आजारांपासून रोगमुक्त होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे या पाणथ्याकडे एक झाड आहे. पोर्तुगीजांनी बाटाबाटीत जेव्हा देवळांची मोडतोड केली त्यावेळी या झाडाखाली शिवलिंग लपवून ठेवल्याचे सांगण्यात येते. गुलालोत्सवानंतर मंदिराच्या अग्रशाळेत अन्नसंतर्पणाचा कार्यक्रम असतो. रात्री मंदिरामध्ये लग्नविधी साजरा केला जातो. ‘नवरदेवाची वरात’ हा लोकनाट्याच्या कार्यक्रमानंतर भजनाचा कार्यक्रम होतो. दुसऱ्या दिवशी ‘धुळपेट’ होऊन शिशिरोत्सवाची सांगता होते.

वर्षभर या मंदिरातून उत्सव चालूच असतात. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवपिंडीवर अभिषेक, होमहवन, धार्मिक कार्य करून बेल वाहतात. नंतर जमलेल्या साऱ्या लोकांना फलाहार देतात. अश्विन पौर्णिमा, कार्तिक पौर्णिमा साजरी केली जाते.

कृष्णाच्या रथातून देवाची मिरवणूक काढतात. दर सोमवारी मंदिराच्या प्राकारात श्री दामबाबाच्या पालखीची मिरवणूक काढतात. हे एक जागृत देवस्थान असल्याने प्रत्येक उत्सवाला भक्तगण आवर्जून हजर रहातात. कोणत्याही कठीण प्रसंगातून देव आपल्याला संकटमुक्त करेल अशी भक्तांची श्रद्धा आहे.