अगम्य

Story: स्टेथोस्कोप । डॉ. अनिकेत मयेकर, ९४२०१५ |
16th October 2021, 10:40 pm
अगम्य

‘सकाळी सहा वाजता घरातून निघालो. काका पण घरातून निघाले होते. अंदाजे आठ वाजता हॉस्पिटल सुरु होते. हॉस्पिटल तसे मुंबईमधील नावाजलेले व ट्रस्ट प्लस medical college असा विस्तार. अशी हॉस्पिटल्स म्हणजे सामान्य रुग्णांसाठी जीवनदायिनी. कमीत कमी पैश्यांमध्ये महत्त्वाच्या उपचारांचा एक आधार. माझा तर अश्या हॉस्पिटलचा पहिला अनुभव. कारण अगोदर कुणी आजारी पडले नाही आणि खाजगी इस्पितळात सगळ्या गोष्टी होत होत्या. पण काकाला काही महत्त्वाच्या उपचारांची गरज होती म्हणून ह्या इस्पितळात जाणे आम्हाला भाग पडले. 

इस्पितळात पोहोचलो.सगळीकडे डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय यांची गडबड. सगळे मनापासून आपल्या कामामध्ये व्यस्त. मी जरा चौकशी केली. सांगितलं की अमुक एका डॉक्टरांनी पाठवलंय, म्हणाले - खालच्या मजल्यावरच्या चार नंबरच्या खिडकीवर केस पेपर बनवा. तिथे १ तास रांग लावून नंबर लागला. आता मला सहाव्या मजल्यावर जायचं होतं. इमारतीची लिफ्ट बंद. धावत पळत जिना चढत वर गेलो." इथं त्याने खरोखर दम काढला आणि मघाशी त्याच्या समोर ठेवलेला पाण्याचा ग्लास पूर्णपणे घाटाघट रिता केला.. आता त्याला जरा बरं वाटलं असावं. सावरून पुन्हा नंतर नॉर्मल होऊन सांगायला लागला.." तर सहाव्या मजल्यावर पोहोचलो खरा, तिथे बघतो तर डॉक्टर अजून आलेले नाहीत! कपाळावर हात मारून घेतला आणि तिथल्याच एका बाकड्यावर वाट बघत बसलो. माझ्या आधी तिथे दहा माणसं आधीचं आलेली होती. एवढ्या लवकर आम्ही येऊनही हे असं. बसलो कितीतरी वेळ.


एवढ्यात कुठूनसे घाई गडबडीत ते डॉक्टर आले. सोबत अजून दोन शिकावू डॉक्टर. नुसती धांदल उडलेली दोघा नवशिक्या डॉक्टरांची. अस्सा आता शब्द तोंडातून निघेल आणि ते तो झेलतील असा अविर्भाव दोघांच्याही तोंडावर. ते डॉक्टरसुद्दा काय.. मला तर अगदी ऋषी मुनींच्या जमान्यातल्या जमदग्नीचा मॉडर्न अवतार आहेत असेच भासले. मग ते खट खट बूट वाजवत आपल्या opd मध्ये निघून गेले. डॉक्टरना पाहून अजूनच वाढलेला गोंधळातला गोंधळ जरा विसावला. आता आपला नंबर येईल म्हणून सगळे निवांत. आम्ही इथे वाट बघत होतो. कधी नंबर येईल आणि कधी आमचा रुग्ण आत जाईल."


" मघापासून कानाकडे कुणा लहान मुलाचा पिरंगण्याचा, मधून रडण्याचा आवाज येत होता. माझे सुरुवातीला तिकडे लक्ष अगदी गेलेच नाहीं. म्हणजे मला सांग, एवढा सगळा तो सरकारी इस्पितळातला गोंगाट. त्यात हे आपलं कानाकडे माशी घोंगवल्यासारखं… नाही, बरोबर की नाही? " मी हो हो म्हणत मान हलवली. याची गोष्ट ऐकायची म्हणजे वेळ काढूनच याला भेटायचं आणि असं त्याला त्याची गोष्ट सांगता सांगता भान आलं की मी मान हलवायची किंवा हम हम करायचं म्हणजे त्याला बरं वाटतं. " हा तर काय सांगत होतो.. त्या मुलाचा चिरकासा आवाज कानावर आला. मी इकडे तिकडे बघितलं तर एक आज्जी आपल्या नातवाला घेऊन बसलेल्या. नातू असेल पाच सहा वर्षांचा. आजी तर काय आयुष्यभराच्या खस्ता खाऊन वयपरत्वे तोंडभर पसरलेलं  जाळं. अगदी खपटीला गेलेलं पोट .सकाळी सकाळीच आपल्या नातवाला घेऊन एकटीच तिथे बसलेली असावी कारण आमच्या आधी दोन तीन नंबरवर ती होती. नातू अगदी गुबगुबीत. तिच्याच तोंडावळ्याचा. पण अगदी किरकिरून रडरडून तिला नको केलेला. पण ती त्याला सोन्या राजा करुन आवरायचा प्रयत्न करत होती. बाकड्यावर तो आवरेना म्हणून हिने खालीच फरशीवर फतकल मारली आणि फरशी पुसणारी बाई आली तरी 'बाजूस्नी घ्या की वाईच ' म्हणून तिलाच दटावली."


" हे चित्र नेहमीचंच ना रे… अश्या सरकारी हॉस्पिटलमधलं… " काहीतरी बोलायचं म्हणून मी बोललो. पण त्याला त्याच्याशी काही देणं घेणं नव्हतं. " अरे ऐक तर पुढे..मी मग त्या मुलाला एक चॉकलेट माझ्या खिशात सापडलं ते द्यायचा प्रयत्न केला तर मुलगा काही थांबेना. अजूनच त्याची किरकिर वाढली. आजीकडे जरा विचारपूस केली तर समजलं लांबून कुठूनशी चालत ती आजी नातवाला कडेवर घेऊन आलेली. आई बाप दोघेही करोनाच्या पहिल्या लाटेत दगावलेले. आजी आणि नातू त्यांच्या कर्माधर्माने कसेतरी बचावले. आता नातवाची पूर्ण जबाबदारी हिच्यावर, आज्जीवर आलेली. लोकांकडे धुणी भांडी करुन आजी त्याला वाढवायला लागली. आज्जीचा नातवावर फार जीव. त्याला जपायचं, काय हवं नको ते बघायचं, चांगलं शिकवायचं. हापिसात त्याने नोकरीला जायचं आणि आपण समाधानाने डोळे मिटायचे. असं तिचं ध्येय. आठ दहा दिवसांमागे तो खेळता खेळता पडला आणि याचा हात प्लास्टरमध्ये गेला. तेव्हापासून 'असं निसतं किरकिरतंय बघा.' आजीने लाडाने दोन्ही हात त्याच्या चेहऱ्यावरून फिरवून आपल्या डोक्यावर कडकडा बोटं मोडली. (क्रमशः)