आमचा आधारस्तंभ : माझे बाबा

माझे बाबा आमच्या कुटुंबाचा मोठा आधारस्तंभ आहेत. दररोज अभ्यासासोबतच बाहेरच्या स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घेण्यासाठी माझे बाबा मला नेहमी प्रोत्साहित करतात.

Story: माझे बाबा । तनया कासार |
15th October 2021, 10:25 pm
आमचा आधारस्तंभ : माझे बाबा

माझे बाबा म्हटलं की, बाबांविषयी काय बोलावे कळतच नाही,पण आईचं तसं नाही. पण हे असं का? बाबा आपल्यासाठी काही करत नाही का? असा विचार मनात आला आणि मी विचार करू लागले तो म्हणजे एकाच गोष्टीचा व तो होता माझे बाबा...!

माझ्या बाबांचं नाव विष्णू आहे.  मी माझ्या बाबांना पप्पा म्हणते. माझ्या पप्पांविषयी बोलायचं झालं,तर ते सगळ्या वडिलांप्रमाणे एकदम कडक आहेत  आणि गंमत म्हणजे मी ही त्यांना खूप घाबरते.

बाबा म्हणजे सर्वांना वाटते की एक कडक,शिस्तबद्ध माणूस. पण असे नाही. आई समईतल्या ज्योतीप्रमाणे असते आणि बाबा समईप्रमाणे असतात. म्हणूनच ज्योतीपेक्षा समईच जास्त तापते. आई इतकेच बाबा सुद्धा हळवे असतात. सगळ्यांना आई खूप आवडते कारण आपण सगळे प्रत्येक लहान गोष्टीपासून ते काही मोठं झालं की लगेच आईला जाऊन सांगतो, कोणती वस्तू हवी असली तरी आपण न घाबरता त्या वस्तूसाठी आईकडे हट्ट करू लागतो, पण बाबांच्या बाबतीत तसे नसते. आपल्याला बाबांकडे काही मागणं तर सोडा, काही बोलायला पण भीती वाटते.कारण लहानपणापासूनच काही झाले की आई आपल्याला सांगते हे करू नको, ते करू नको, अभ्यास कर आणि नाही केला तर बाबांना नाव सांगेन आणि बाबा तुला ओरडतील. अशी बाबांची भीती आपल्यामध्ये लहानपणापासूनच निर्माण केली जाते आणि आपल्याला वाटते की बाबा काही झाले की आपल्याला ओरडतील आणि त्याच भीतीने आपण त्यांना घाबरू लागतो. पण बाबा खरे तसे असतात का?

नक्कीच नाही. बाबा आपल्यावर भरपूर प्रेम करतात, पण ते आपल्याला दाखवून देत नाहीत. दिवाळी असली की बाबा सगळ्यांसाठी हवे तसे कपडे घेऊन देतात. ते कधीही सांगणार नाही, पण स्वत:साठी मात्र काही घेणार नाहीत.ते बोलतील, " माझ्याकडे तर खूप आहेत. जास्त कपड्यांची मला काय गरज? " पण असे नसते. ते फक्त आपला विचार करत असतात. ते स्वत: जुने कपडे वापरतात, पण आपल्या मुलांना नवीन कपडे देतात.

बाबा नेहमी आपल्या मुलांच्या भविष्याचा विचार करत असतात, ते आपल्याला ओरडतात हे खरं आहे. पण ते असे करतात, कारण आपण आपल्या आयुष्यामध्ये काही चांगले करावे म्हणूनच त्यांना आपली खूप काळजी असते. माझी एखादी चूक झाल्यावर माझे बाबा मला रागवतात कारण व्यक्तिमत्त्व चांगले बनावे असे त्यांना वाटत असते. आपली मुलगी भविष्यात एकही चूक करू नये म्हणून ते सदैव दक्ष असतात. आपल्याला बरं नसलं तर बाबांना रात्रभर झोप लागत नाही. ते आपली चिंता करत बसतात.

कधीपण आपल्याला कुठे लागलं किंवा काही झालं तर आपल्या तोंडात एकच शब्द येतो तो म्हणजे आईच! पण जेव्हा काही मोठं होतं तेव्हा येणार शब्द असतो बापरे! हि एक गमंतच आहे ना!! मला खूप अभिमान आहे की माझे बाबा माझ्या आयुष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्याशिवाय माझं जीवन अपूर्ण आहे.

बाबा आपल्यासाठी स्वत:च्या जीवनाचं रान करतात, आपल्याला हवी असलेली प्रत्येक वस्तू ते आपल्याला आणून देतात असे आपले बाबा असतात.

अनंत उपकार बाबा तुमचे,

घडवले माझे आदर्श जीवन,

भरारी घेताना यशापर्यंत,

जपून ठेवेन संस्काराचे धन.

माझे बाबा आमच्या कुटुंबाचा मोठा आधारस्तंभ आहेत. दररोज अभ्यासासोबतच बाहेरच्या स्पर्धापरीक्षांमध्ये भाग घेण्यासाठी माझे बाबा मला नेहमी प्रोत्साहित करतात आणि ते अभ्यासासाठी मला मदत करतात. ते आमच्या सोबत खूप गप्पा मारतात. आम्हाला वेळ देतात. म्हणून मला नेहमी वाटते की जेव्हा आपण आईचे कौतुक करतो तेव्हा बांबाचेही कौतुक केले पाहिजे. त्यांनी केलेले कष्ट आपण कधीही विसरू नयेत. सगळे म्हणतात की तू तुझ्या बाबांसारखी दिसते. मी खूप खूश आहे कारण मी त्यांची मुलगी आहे. म्हणून माझे बाबा मला खूप आवडतात. माझे बाबा माझे हिरो आहेत. मी खूप नशीबवान आहे कारण मला त्यांच्यासारखे बाबा मिळाले आणि माझे त्यांच्यावर प्रेम आहे.