गगन वेधी गंधकळी आकाश मल्लिगे

आपल्या मातीतले नसूनही आपल्या मातीत घट्ट रुजलेले आकाश मल्लिगे, मातीशी नाळ जोडूनही दिगंतात पसरवता येतो सुगंध आपल्या कर्तृत्वाचा असा काहीसा संदेश देत राहते आपल्या फुलण्यातून.

Story: त्या फुलांच्या गंधकोषी । आसावरी कुलक� |
15th October 2021, 10:16 pm
गगन वेधी गंधकळी आकाश मल्लिगे

एका गावात एक श्रीमंत कुटुंब रहात होते. या कुटुंबात सहा भाऊ, त्यांच्या बायका आणि एकुलती एक बहीण असा भरलेला परिवार होता. बहिणीचे नाव होतं चमेली, जी नावा प्रमाणेच नाजूक आणि सुंदर होती. आई वडील फार लवकर गेल्यामुळे सहा भावांनी अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे तिला जपलं होतं. ती स्वभावाने अतिशय गोड आणि मनमिळाऊ होती. श्रीमंत घरातली असली तरी गावातल्या सर्वच थोरा मोठ्यांची फार लाडकी होती. सगळ्यांना मदत करायची. तिच्या नुसत्या येण्यानेच लहान-थोर सगळेच खूश व्हायचे. तिच्या या एकूणच लोकप्रियतेला आणि भावाच्या वाढत्या प्रेमामुळे त्यांच्या बायका मात्र चमेलीवर जळत असायच्या. भाऊ सतत अवतीभवती असल्यामुळे त्यांना कहीही  करणे शक्य होत नव्हते. आणि एक दिवस ती संधी त्यांना मिळाली.देशा बाहेर व्यापार करण्याचे सहाही भावांनी ठरवले. डोईजड झालेल्या चमेलीचा काटा काढण्याची नामी संधी सहाही वहिन्याकडे आली. त्यांनी चमेलीला खूप कष्टाची कामे दिली. कामाची सवय नसल्यामुळे, आणि सततच्या मानसिक आणि शारीरिक त्रासामुळे चमेलीने प्राण सोडले. या सहाही वहिन्यांनी घरातल्या अंगणात गुपचूप हिला पुरून टाकले. त्यावर काही दिवसांनी अत्यंत सुवासिक फुले देणारे एक झाड उगवले. या झाडाचे खोड मात्र जखमा झाल्यासारखे होते. सहाही भाऊ तीन वर्षांनी परतले, त्यांनी बहिणीची चौकशी केली, अपेक्षेप्रमाणे बायकांनी खोटेच सांगितले, भावांचा विरह सहन न झाल्यामुळे चमेलीने प्राण सोडले. भाऊ खूप दुखी झाले. एके दिवशी बागेत फिरताना त्यांना मंद फुलांचा वास आला, झाडाजवळ जाताच उंच असलेल्या फांद्या त्यांच्याजवळ आल्या, जणू सहाही जणांना आपल्या कवेत घेत आहेत.बायकांना हेही बघवले नाही. त्या घाबरल्या आणि काही तरी कारण काढून झाड तोडायला सांगितले. शेवटी भाऊ झाड तोडायला तयार झाले. पण कुऱ्हाडीचा घाव घालणार तोच झाडामधून आवाज आला, दादा मी चमेली मला तोडू नका! आणि तिने सगळी कथा भावांना सांगितली. भावांनी संतापून बायकांना चांगलीच अद्दल घडवली आणि या झाडाची रोपं गावभर लावायला सांगितली. लोकांनाही ही झाडं खूप आवडली. आकाशात जाऊन सुगंधित फुलं देत असल्यामुळे आणि कडूनिंबासारखी पाने असल्यामुळे सगळे या झाडाला आकाशनिंब म्हणू लागले. तर फुले सुगंधी आणि मोगरी सारखीच रात्रीची फुलून सकाळी जमिनीवर ओघळण्याच्या स्वभावामुळे याचे नाव आकाश मल्लिगे असे पडले.

गोव्यात फारसे प्रचलित नसलेल्या पण केसात माळण्यासाठी वापरात असलेल्या आकाशनिंब किंवा बुच या फुलझाडाची ही गोष्ट. ब्रम्हास हेयर (ब्रम्हाचे केस) या वृक्ष पुराण कथा वर आधारित मनेका गांधी आणि यास्मिन सिंग यांच्या पुस्तकातून घेतलेली आहे. भारतात बहुतांश ठिकाणी ही झाड बागेत लावलेली दिसून येतात. सामजिक वनीकरण आणि सौंदर्यीकरण करण्यासाठी या झाडांचा फार पूर्वीपासून वापर होतो. त्यामुळे गोव्यात जिथे कुठे उपलब्ध आहेत फार उंच वाढलेली अशी याची झाडं आहेत. पणजी मार्केट ते कला अकादमी पर्यंतच्या रस्त्याच्या कडेला ही झाडं लावलेली आढळतात. गोवन वर्ताच्या ऑफिस समोरही याचे भले मोठे झाड आहे तसेच आकाशवाणीच्या समोर धेंपो बागेच्या शेजारी याचे झाड आहे.  अश्याच काही जुन्या गल्ल्यातून रस्त्यावर ही झाडे मी पाहिली आहेत. उंच गेलेलं, काहिसं खडबडीत खोड असलेलं हे झाड वर्षातून दोनदा फुलतं. एप्रिल ते जून आणि नोव्हेंबर ते जानेवारी या काळात. फुलं लांब देठाची पांढऱ्या किंवा मोतिया रंगाची अशी असतात, निशिग्न्धाच्या फुलाप्रमाणेच सलग्न पाकळ्या आणि लांब पोकळ देठ अशी याची रचना असते. संध्याकाळी झाडा जवळून गेल्यास मंद सुगंध येतो. या फुलांची फक्त देठावरची वेणी (फाती) प्रसिद्ध आहे. याच्या झाडाच्या लाकडाचा दुय्यम दर्जाची बुच बनविण्यासाठी वापर होतो. म्हणून याला बुच असे मराठीत म्हटले जाते. एरवी या फुलाला आकाश मल्लिगे, मारा मल्लिगे, आकाश निंब अशी नाव आहेत. या झाडाची मूळ उत्पत्ती दक्षिण आशिया मानली जाते. पण लागवडीमुळे जगभर बागेत लावले जाते. याचे शास्त्रीय नाव मेलिंगटोनिया होर्टेन्सीस असे आहे. थोमस मिलिंगटन या वनस्पतीशास्त्रज्ञाच्या सन्मानार्थ हे नाव देण्यात आले आहे. तसेच होर्तेन्सीस म्हणजे बागेत लावले जाणारे असा अर्थ आहे. पानांचा वापर दुय्यम दर्जाच्या विड्या किंवा सिगरेटी बनविण्यासाठी केला जातो.

असे हे आपल्या मातीतले नसूनही आपल्या मातीत घट्ट रुजलेले आकाश मल्लिगे, मातीशी नाळ जोडूनही दिगंतात पसरवता येतो सुगंध आपल्या कर्तुत्वाचा असा काहीसा संदेश देत राहते आपल्या फुलण्यातून. कधीफेरफटका मारताना जवळ पास दिसलेच तर गोळा करा याची फुले. दोऱ्या विरहित माळा गुंफा किंवा साबणाच्या पाण्यात बुडवून रंगीत फुगे उडवा हवेत...आपलं लहानपण जगून घ्या पुन्हा एकदा आताच जगणं सुसह्य होण्यासाठी.......