कोळसा संकट नाहीच!

- अर्थमंत्री सीतारामन यांचा निर्वाळा; लखीमपूर विषयावरही भाष्य

Story: नवी दिल्ली : |
14th October 2021, 01:04 Hrs
कोळसा संकट नाहीच!

नवी दिल्ली : काही दिवसांपासून कोळसा संकट अधिक गडद होताना दिसत आहे. मात्र, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोळसा संकट ही अफवा असल्याचे म्हटले आहे. देशात कोळशाची कमतरता नाही. भारत एक पॉवर सरप्लस देश आहे, असे सीतारामन यांनी अमेरिकेच्या हॉवर्ड केनेडी स्कूलमध्ये संबोधित करताना स्पष्ट केले. हॉवर्ड येथील प्राध्यापक लॉरेंस समर्स यांनी भारतातील कोळशाच्या कमतरतेबाबत प्रश्न विचारला होता.
कोळशाची कमतरता किंवा विजेचे संकट हे वृत्त निराधार आहे. देशातील प्रत्येक वीज उत्पादक कंपनीकडे पुढील ४ दिवसांचा स्टॉक शिल्लक आहे. तर, कोळसा पुरवठ्याची साखळीही अखंडित सुरू आहे. देशातील वीजनिर्मिती सक्षम आणि परिपूर्ण असून भारत सरप्लस देश आहे, असेही सीतारमन म्हणाल्या. दरम्यान, लखीमपूर खेरी हिंसाचाराचे संपूर्ण देशभरात पडसाद उमटत असताना भाजप नेत्यांनी मात्र यावर मौन बाळगले आहे, अशा प्रश्नावर केंद्रीय अर्थमंत्री सीतारमन यांनी प्रतिक्रिया दिली असून, शेतकऱ्यांची हत्या होणे निंदनीय आहे. मात्र, अशा प्रकारचे अनेक मुद्दे देशातील इतर भागांतही असून वेळीच उपस्थित करत त्यांच्यावरही समान पद्धतीने भाष्य केले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. अशा घटना घडतील तेव्हा त्या उपस्थित केल्या पाहिजेत. फक्त तिथे भाजपचे सरकार आहे, तेथेच बाेलावे हे योग्य नाही, असे सांगत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. केनेडी स्कूलमध्ये विविध विषयांवर भाष्य करताना लखीमपूर खेरी येथील शेतकरी हत्या आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा यांच्या अटकेसंबंधीही त्यांना विचारण्यात आले.
प्रत्यक्षात स्थिती निराळी?
दिल्ली :
केंद्रीय विद्युत प्राधिकरणाच्या वेबसाइटवर ११ ऑक्टोबरपर्यंतची आकडेवारी उपलब्ध आहे. देशातील १५ वीजनिर्मिती प्रकल्पांकडे कोळशाचा एक दिवसाचाही साठा शिल्लक नाही, असे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. या १५ वीजनिर्मिती प्रकल्पांमध्ये उत्तर प्रदेश आणि हरियाणातील प्रत्येकी ३ तर महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी २ वीजनिर्मिती प्रकल्पांचा समावेश आहे. राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश, तामिळनाडू आणि झारखंडमधील प्रत्येकी एका वीजनिर्मिती प्रकल्पाला कोळशाच्या कमतरतेचा सामना करावा लागत आहे.