नववी ते बारावीपर्यंतचे प्रत्यक्ष वर्ग सोमवारपासून

मुख्यमंत्र्यांची घोषणा; लवकरच अधिसूचना


13th October 2021, 11:58 pm
नववी ते बारावीपर्यंतचे प्रत्यक्ष वर्ग सोमवारपासून

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे प्रत्यक्ष वर्ग येत्या सोमवारपासून सुरू होतील, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना केली. कृतिदलाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.
कोविडसंदर्भात राज्य सरकारने स्थापन केलेल्या कृतिदलाची बुधवारी सायंकाळी आल्तिनो येथील वन भवनात बैठक झाली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर, डॉ. शेखर साळकर यांच्यासह इतर पदाधिकारीही उपस्थित होते.
बैठकीनंतर डॉ. साळकर म्हणाले, येत्या सोमवारपासून इयत्ता नववी​ ते बारावीपर्यंतचे प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्याचा निर्णय कृतिदलाने घेतला आहे. शिक्षण खाते यासंदर्भात लवकरच अधिसूचना जारी करेल. विद्यालये तसेच उच्च माध्यमिक विद्यालयांना कोविड प्रसार रोखण्यासाठी आवश्यक ती मार्गदर्शक तत्त्वे जारी करून नववी ते बारावीपर्यंतचे प्रत्यक्ष वर्ग सुरू करावे लागतील. शाळेतील एखाद्या विद्यार्थ्यात कोविडची लक्षणे दिसल्यास त्याला तत्काळ जवळच्या इस्पितळात दाखल करून त्याची कोविड चाचणी करावी लागेल, असे त्यांनी सांगितले. प्राथमिक वर्गांबाबतचा निर्णय अजून कृतिदलाने घेतलेला नाही. पण दिवाळीनंतर त्याबाबतही विचार होऊ शकतो, असेही डॉ. साळकर यांनी नमूद केले.
राज्यातील कोविडचा प्रसार नियंत्रणात आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून बाधित होण्याचा दरही घटत आहे. त्यामुळेच कृतिदलाने नववी ते बारावीपर्यंत प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे डीन डॉ. बांदेकर यांनी स्पष्ट केले. दरम्यान, कोविड प्रसारामुळे गेल्या दीड वर्षांपासून शाळा, महाविद्यालयांचे प्रत्यक्ष वर्ग बंद आहेत. बहुतांशी शाळांनी ऑनलाईन शिक्षण सुरू केले आहे. पण ग्रामीण भागांतील अनेक विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाईन शिक्षण पोहोचत नसल्याने असे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत. याचा विचार करून तसेच कोविड प्रसार नियंत्रणात आल्याचे लक्षात घेऊन डॉक्टरांच्या तज्ज्ञ समितीने मार्गदर्शक तत्त्वे जारी करून नववी ते बारावीपर्यंतचे प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्याची शिफारस सरकारकडे केली होती. तज्ज्ञ समितीची ही शिफारस सरकारने मान्य केल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या घोषणेतून स्पष्ट झाले आहे.
.............................................
बहुतांशी विद्यार्थी, पालकांची मागणी मान्य
प्रत्यक्ष वर्ग बंद असल्यामुळे तसेच ऑनलाईन शिक्षण योग्यरीत्या पोहोचत नसल्याने त्याचा विद्यार्थ्यांवर परिणाम होत होता. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांसह पालकांनीही सरकारकडे प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्याची मागणी केली होती. त्यांची मागणी सरकारने मान्य केल्याने अशा विद्यार्थ्यांमध्ये आनंद आणि समाधान पसरणार आहे.

हेही वाचा