गुन्हेगारी रोखण्यास सरकारने प्राधान्य द्यावे

Story: राज्यरंग गोवा/प्रसाद शेट काणकोणकर |
23rd September 2021, 12:42 am
गुन्हेगारी रोखण्यास सरकारने प्राधान्य द्यावे

राज्यात पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहे. त्यासाठी विविध राजकीय पक्षांनी तसेच बिगरसरकारी संस्थांनी किंवा सामाजिक कार्यकर्त्यांनी निवडणूक लढविण्यासाठी तयारी सुरु केली आहे. या व्यतिरिक्त करोनाच्या महामारीनंतर राज्यात काही निर्बंध शिथिल करण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीमुळे राज्यात अनेक पर्यटक तसेच प्रवासी दाखल झाले आहेत. असे असताना काही गुन्हेगार राज्यात दाखल होऊन गुन्हेगारी कारवाया करून पसार झाल्याचे मागील काही घटनांमुळे समोर आले आहेत, तर काही राज्यातील गुन्हेगार कोल्हापूर तसेच इतर ठिकाणी पळून गेल्याचे नंतर उघड झाले आहे.      राज्यात मागील महिन्यात गंभीर गुन्ह्यांसह वेगवेगळ्या प्रकारच्या चोऱ््या, सोनसाखळी चोरी तसेच इतर प्रकारची गुन्हेगारी कृत्ये झाले आहेत. यातील काही गुन्हेगार  परराज्यातील असल्याचे पोलीस तपासात नंतर समोर आले आहे. अशा गुन्हेगारांवर कारवाई करणे अवघड होत आहे. त्यामुळे प्रतिबंधक कारवाई आवश्यक असून त्यासाठी पोलिसांसह स्थानिकांनी तसेच सबंधित बिगरसरकारी संस्थांनी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी मदत करणे आवश्यक आहे.      

गोवा हे पर्यटन स्थळ असल्यामुळे ऑक्टोबरपासून पर्यटन हंगाम सुरु होत आहे. मागील वर्षी करोनामुळे पर्यटन व्यवसायावर अवलंबून असलेल्यांना मानसिक तसेच आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागले आहे. तसेच पुढील वर्षी होणाऱ््या विधानसभा निवडणुकीमुळे सरकार यंदा काही प्रमाणात निर्बंध टाकून पर्यटन संबंधित व्यवसाय सुरु करणाऱ्यावर भर देणार असल्याचे दिसून येत आहे. याचा एक भाग म्हणजे कोविड निर्बंध घालून सोमवारपासून राज्यात कॅसिनो व्यवसाय सुरु करण्यात आला आहे.      

या सर्व पार्श्वभूमीमुळे राज्यात पुढील काळात गुन्हेगारी कारवायांत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहेत. राज्यात पुढील वर्षी होणाऱ््या विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. तसेच काही नेत्यांना संबंधित पक्षाची उमेदवारी मिळण्यात शक्यता कमी आहे. त्यामुळे पुढील काळात राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत यंदा राज्यात निवडणूकसंबंधित गुन्हेगारीत वाढ होण्याची शक्यता जास्त आहे. आपल्या शांत गोव्यात गुन्हेगारी कारवाया वाढण्याची शक्यता आहे. निवडणूक काळात इतर राज्यांत मोठ्या प्रमाणात उमेदवारांवर हल्ले किंवा त्याच्या मुख्य कार्यकर्त्यांवर वर हल्ले होतात. तशा प्रकारचे चित्र गोव्यात तयार होण्याची शक्यता आहेत. राजकीय पक्षांच्या नेत्यांनी तसेच नागरिकांनी अशा गुन्हेगारी कारवाया होण्यास वाव देऊ नये. पुढील काळात राजकीय नेत्यांनी आपल्या स्वार्थासाठी आंतरराष्ट्रीय किंवा इतर पातळीवर गोव्याची बदनामी करणे टाळावे.