धर्म, पंथांत रुजलेली कट्टरता धोकादायकच

ही कट्टरता सर्व धर्मांत, सर्व पंथांत, अगदी सुखनैव नांदते. कोणीही हिची साथ सोडू पहात नाही, उलट एका समूहामध्ये कट्टरतेच्या खाणाखुणा दिसल्या की दुसऱ्या समूहामध्ये कट्टरतेला फारच आपुलकीने कवटाळले जाते.

Story: विचारचक्र/प्रा. कुलदीप कामत, (लेखक मरा� |
23rd September 2021, 12:32 am
धर्म, पंथांत रुजलेली कट्टरता धोकादायकच

कट्टरतेविषयी एवढा ‘कट्टर’ होणे बरे नव्हे! हे बरोबर! पण कट्टरतेचा महिमाच एवढा आहे की त्याविषयी न बोलता राहणे अगदीच अशक्य बनून जाते. अनेकांना असे वाटते की, कट्टरतेचा अतिरेक वाईट असेल कदाचित, पण त्यातूनही काही तरी चांगले निघेलच की! त्यामुळे हा आशावाद मनात जागता ठेवून कट्टरतेच्या तिला शोधण्याचा प्रयत्न केला आहे. कट्टरतेचा इतिहास हा जुना आहे. त्याचबरोबर मानवजातीच्या प्रगतीच्या हरएक टप्प्यांवर त्यांचे योगदान वादातीत असल्यामुळे त्यांची दखल येणे अपरिहार्य ठरते.       

मानवी इतिहासात शोषण व भेदांविरूद्ध चळवळ उभारणाऱ्या गौतम बुद्धांवर अनेक वेळा प्राणघातक हल्ले झाले. गौतम बुद्धांचा काय अपराध होता. प्रज्ञा, शील व करूणेवर आधारलेल्या धर्मांची त्यांना का बरे अॅलर्जी वाटावी. संत ज्ञानेश्वरांना काय कमी ‘सुख’ दिले. धर्म प्रायश्चित म्हणून ज्ञानेश्वरांच्या आई-वडिलांना देहान्ताचे प्रायश्चित घ्यायला लावले. बरे, आई-वडील गेल्यानंतर तरी धर्माचे भूत उतरायला हवे होते. पण धर्म एकदा डोक्यात घुसला की काही विचारायलाच नको, ‘संन्याशांची पोरे’ म्हणून त्यांची आयुष्यभर विटंबना केली. कटुतेचे घोट पिऊनसुद्धा ‘पसायदान’ हे मानवता गीत लिहून ज्ञानेश्वर अमर झाले. आजचे तथाकथित संस्कृती रक्षक पसायदानाचे मर्म न लक्षात घेता तारस्वरात गात असतात. गावोत बिचारे.  येशु ख्रिस्ताला सुळावर चढविणारे, त्यांच्या यातना बघून चेकाळणारे कोणे होते? सनातन दु:खाच्या गहिऱ्या छायेत वावरणाऱ्या बहुजन समाजाला वेदांचे तत्त्वज्ञान सांगणाऱ्या तुकारामांना छळण्याचा पराक्रम कोणाच्या नावावर लावायचा? वेदाशी मिजाशी दाखवणाऱ्या धर्ममार्तंडांना, वेदांचा तो अर्थ आम्हांसी ठावा, असे ठणकावून सांगणाऱ्या तुकारामांचे अभंग आपण इंद्रायणीत बुडविले. अभंग शिल्लक राहिले ते जनमानसाच्या आेठांवर पण तिथेही आपण त्याचा संबंध चमत्काराशी जाेडला आणि तुकारामाचे श्रेय त्यांना दिले नाही. तुकारामांचा खून करून जनमानसात वैकुंठ विमानाचे थोतांड पसरवून टाकले.      

‘जय शिवाजी’ ‘जय भवानी’ अशा घोषणा देवून शिवजयंतीला दहशतीचे वातावरण तयार करणाऱ्या सैनिकांनी लक्षात घ्यायला हवे की, शिवाजीचा राज्याभिषेक करायला इथल्या थोर कट्टर हिंदू पुरोहितांनी नकार दिला. त्यासाठी उत्तरेतून गागाभट्टांना आणावे लागले. पुढे तर दलितांना गळ्यातच मडके बांधून हिंडावे लागले. शिवाजी हा रयतेचा राजा होता. आता तो हिंदूंचा राजा झाला. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचा सत्कार कितीवेळा केला असेल याला तर गणतीच नाही. महात्मा फुलेंवर मारेकरी कुठल्या हेतूने पाठविले असतील? महात्मा फुले काही शेठ, व्यापारी नव्हते. आपल्या स्वार्थासाठी कर्मकाडांची रचना धर्माच्या नावाने करणाऱ्या लोकांचा पर्दाफाश करण्याचा ‘अधर्म’ त्यांनी केला होता. सावित्रीबाई फुले यांनी प्लेगग्रस्तांची सेवा करता करता आपला देह ठेवला. नावात फुले असणाऱ्या ह्या माऊलीला कट्टर लोकांनी तर काटेच दिले. थोर बुद्धिवादी गोपाळ गणेश आगरकरांना तर त्यांच्या हयातीतच प्रेतयात्रा बघावी लागली,      

महात्मा गांधीची हत्या करणारा कोण होता? हत्येनंतर मिठाई वाटून आनंद साजरा करणारे कोण होते? फाळणीचे दु:ख सर्वांनाच होते. पण हत्या? आपण इथे एक बाब लक्षात घ्यायला हवी. ती  म्हणजे, गांधी हत्येचा प्रयत्न फाळणी, ५५ कोटी ह्या सर्व प्रकरणाअगोदर झालेले आहेत. इतकेच नव्हे काही जणांच्या मनात विद्वेषाचे हलाहल इतके काठोकाठ भरलेले आहे की अजूनही गांधी हत्येचा उल्लेख ते ‘गांधी वध’ म्हणून करतात. सलाम त्यांच्या कट्टरतेला.      

आंबेडकरांना बालपणापासून जाती व्यवस्थेचे चटके बसतच होते. राज्यघटनेचे शिल्पकार झाल्यानंतर सुद्धा ‘हिंदू कोड बिल’ त्यांना संमत करू दिले नाही.  त्यांना सक्त विरोध करण्यात आला, त्यासाठी आंबेडकरांनी मंत्रिपदाचा त्याग केला. कारण हिंदू कोड बिल म्हणजे सनातन हिंदू धर्मावर आक्रमण असेच काही जणांना वाटते, असे भासविण्यात आले. म्हणजे अनिष्ट चाली, भुळसट रूढी म्हणजे आपला धर्म. बरोबर आहे, राजाराम मोहन रॉय पुढारपणात सतीची चाल ब्रिटिशांनी बंद केली, त्यावेळी या सनातनी लोकांनी त्याच्या निषेधार्थ मोर्चे काढले होते. ते ब्रिटिश होते म्हणून नरमले नाहीत, त्याचा वचपा ‘हिंदू कोड बिल’ अडवून ठेवून करण्यात आला.      

इंदिरा गांधीची हत्या करणारे तिचेच अंगरक्षक होते. शाहबानो प्रकरणात उच्च न्यायालयाने पुरोगामी वाटचालीचा मार्ग मोकळा केला असताना, धर्माच्या धुरिणांनी त्याला तीव्र विरोध केला. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी त्याच्यापुढे शरणागती पत्करून न्यायालयाच्या निर्णय फिरविला. काही वर्षांनी राजीव गांधींची हत्या करणारे कोणी दरोडेखोर नव्हते? पाकिस्तानी नव्हते. इंदिरा गांधी, राजीव गांधींची हत्या करणारे भारतीयच होते.      

त्यानंतर बाबरी मशिद  पाडण्यात आली. त्याची प्रतिक्रिया म्हणून मुंबईत बाॅम्बस्फोट घडविण्यात आले. आजही ह्या दोन्ही गोष्टीचे समर्थन करणारे लोक देशाच्या कानाकोपऱ्यात भेटतील. या सगळ्यातून काय भाष्य झाले? या प्रश्नाचे उलट निदान आपण शोधण्याचा प्रयत्न करूया. या घटनेनंतर राजकारण्याच्या पटावरून अर्थकारण बाजूला पडले व त्याची जागा धर्मकारणाने घेतली. त्यात झालेल्या नुकसानीतून देश अजून सावरलेला नाही. नरेंद्र दाभोळकर, कलबुर्गी, गौरी लंकेश, काॅ. गोविंद पानसरे यांच्या हत्या करून ह्या लोकांनी फार मोठा पुरूषार्थ गाजविला आहे. तुम्हाला उत्तर प्रदेश मधला ‘अखलाज’ आठवतो का ? केवळ गायचे मास फ्रिजमध्ये ठेवल्याच्या संशयावरून त्याला ठोकण्यात आले.      

कट्टरतेचे पुराण आणखी बरेच लांबवता येऊ शकते. हे वाचताना तुम्हालाही अनेक संदर्भ आठवले असतील. कट्टरतेची एक बाब मात्र उल्लेखनीय आहे, ती म्हणजे ही कट्टरता सर्व धर्मात, सर्व पंथांत, अगदी  सुखनैव नांदते. कोणीही हिची साथ सोडू पहात नाही, उलट एका समूहामध्ये कट्टरतेच्या खाणाखुणा दिसल्या की दुसऱ्या समूहामध्ये कट्टरतेला फारच आपुलकीने कवटाळले जाते. सर्व धर्मात, पंथांत, जातींत मान्यता असलेली, तितकीच प्रिय असलेली दुसरी कोणती बरी वस्तू आहे? असो, कुठल्याही सुसंस्कृत माणसाला कट्टरतेविषयी असलेला राग स्वाभाविक आहे, पण कट्टर माणसांविषयी मतभिन्नता ठेवनूही आपण सहानुभूतीच बाळगली पाहिजे. कारण ह्या कट्टरतेचे तेही बळी असतात. सगळ्यात मोठे दोषी ते आहेत जे ह्या कट्टरतेचे Software किंवा तत्त्वज्ञान तयार करतात. ती माणसे हुशार, चलाख असतात. आपण प्रतिपादन केलेला विचार विनाशकारी आहे, याची त्यांना पुरेपूर जाण असते, तरी हे ते जनमानसात भिनवत राहतात. एका उदाहरणाने हा मुद्दा स्पष्ट करतो. माजी न्यायमूर्ती श्री कोळसे पाटील यांनी पणजी येथील कार्यक्रमात सांगितलेला किस्सा. त्यांनी त्या नेत्याचे नाव घेतले होते. पण हाती कोणताही पुरावा नसल्याने ‘ते’ नाव घेणे टाळतो. राम मंदिराचे आंदोलनात अग्रभागी असलेल्या राष्ट्रीय नेत्याला रामाच्या अनेक मूर्ती भेट म्हणून मिळाल्या होत्या. (माझ्या बालपणी). आमच्या गावी झालेल्या रामाच्या मंदिरासाठी झालेल्या ‘विट’ पूजन आठवते. वातावरण अतिशय भक्तीमय बनले होते. (आता मात्र अशा गोष्टींचा ‘वीट’ येतोय),      

या नेत्याच्या संमतीने त्याच्या मुलीने व सुनेने सगळ्या मूर्ती वितळवून त्यांची घरात वापरायला, शोभेसाठी ठेवायला भांडी तयार केली. कट्टरतेचा Software तयार करणारी माणसे इतकी व्यवहारी असतात. म्हणून म्हणतो,कट्टरतेची नशा चढलेली माणसे धोकादायक आहेत. पण ते त्या व्यवस्थेत बळीही आहेत. त्यांच्याविषयी कटुता न ठेवता त्यांचे प्रबोधन झाले पाहिजे. पण दंगली पेटवून त्यावर आपल्यासाठी सत्तेची पोळी भाजणाचा लोकांना माफ करण्याइतपत मनाचा मोठेपणा मी दाखवू शकत नाही.