दिल्लीचा हैदराबादवर आठ गड्यांनी विजय

सनरायझर्सच्या फलंदाजांकडून निराशा : दिल्ली कॅपिटल्स १४ गुणांसह गुणतालिकेत प्रथम


23rd September 2021, 12:06 am
दिल्लीचा हैदराबादवर आठ गड्यांनी विजय

सामन्यात कॅगिसो राबाडाने बळी घेतल्यानंतर आनंद व्यक्त करताना दिल्लीचे खेळाडू.

दुबई : आयपीएलच्या दुसऱ्या राऊंडमध्ये बुधवारी दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झालेल्या सामन्यात हैदराबादने दिल्लीला १३५ धावांचे माफक लक्ष्य दिले होते, जे दिल्लीने १३ चेंडू शिल्लक असताना २ गड्यांच्या मोबदल्यात सहज गाठले. श्रेयस अय्यरने ४१ चेंडूत नाबाद ४७ धावा आणि कर्णधार ऋषभ पंतने २१ चेंडूत नाबाद ३५ धावा करून संघाच्या विजयात यश मिळवले. दिल्लीने हा सामना सामना ८ गडी राखून जिंकल्याने दिल्ली कॅपिटल्स पुन्हा १४ गुणांसह गुणतालिकेत पहिल्या स्थानावर पोहोचली आहे.
दिल्लीतर्फे सलामीला आलेल्या पृथ्वी शॉ आणि शिखर धवन जोडीने दिल्लीला चांगली सुरुवात करून दिली. आक्रमक खेळी खेळणाच्या नादात पृथ्वी शॉ बाद झाला. हैदराबादचा कर्णधार केन विलियमसनने त्याचा अप्रतिम झेल घेत तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर शिखर धवन आणि श्रेयस अय्यर जोडीने संघाला चांगली धावसंख्या उभारून दिली. संघाची धावसंख्या ७२ असताना उंच फटका मारण्याच्या नादात धवन बाद झाला. राशीद खानच्या गोलंदाजीवर अब्दुल समादने त्याचा झेल घेतला. त्यानंतर कर्णधार ऋषभ पंतने आक्रमक खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.
तत्पूर्वी आयपीएलच्या या ३३ व्या सामन्यात बुधवारी हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात हैदराबादची सुरुवात निराशाजनक झाली. नॉर्त्जेने केलेल्या पहिल्याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर डेव्हिड वॉर्नर (०) सोपा झेल देऊन बाद झाला. त्यानंतर विल्यमसन व साहा यांनी सावधपणे खेळण्यास सुरुवात केली. मात्र, राबाडाने सहाला (१८) धवनकरवी झेलबाद करून हैदराबादला दुसरा धक्‍का दिला.
त्यानंतर विल्यमसन व मनीष पांडे यांनी नवव्या षटकांत संघाचे अर्धशतक पूर्ण केले. मात्र, अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात विल्यमसनने (१८) हेटमायरकडे झेल दिला. यामुळे हैदराबादची ३ बाद ६० अशी स्थिती बिकट झाली. यात केवळ एक धावेची भर घालून मनीष पांडे (१७) बाद झाला. संघाची स्थिती ४ बाद ६१ अशी दयनीय असताना फलंदाजीसाठी आलेल्या केदार जाधवनेही (३) निराशा केली. त्याला नॉर्त्जेने पायचित केले. त्यानंतर अनुभवी खेळाडू जेसन होल्डर (१०) याला अक्षर पटेलने पृथ्वीकडे झेल देण्यास भाग पाडले. यामुळे संघाची स्थिती ६ बाद ९० अशी झाली.
अब्दुल समद व राशीद खान यांनी १७व्या षटकांत संघाचे शतक पूर्ण केले. समदने २ चौकार व १ षटकाराच्या मदतीने महत्त्वपूर्ण २८ धावा काढल्या. शेवटच्या षटकात धाव घेण्याच्या प्रयत्नात राशीद खान २२ धावांवर धावबाद झाला. त्यानंतर संदीप शर्माही शून्यावर धावबाद झाला. हैदराबादने २० षटकांत ९ बाद १३४ धावा काढल्या. तर, भुवी ५ धावांवर नाबाद राहिला. दिल्लीच्या वतीने कॅगिसो राबाडाने ३७ धावांत ३, तर नॉर्त्जे व अक्षर पटेलने प्रत्येकी २ गडी बाद केले.
शिखर धवनच्या ४००+ धावा
दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर शिखर धवनने सलग सहाव्यांदा आयपीएलमध्ये ४००+ धावा पूर्ण केल्या. त्याने २०१६ मध्ये ५०१ धावा, २०१७ मध्ये ४७९ धावा, २०१८ मध्ये ४९७ धावा, २०१९ मध्ये ५२१ धावा, गेल्या हंगामात ६१८ धावा आणि चालू हंगामात ४००+ धावांचा टप्पा ओलांडला आहे.

दिल्लीने आयपीएल २०२१ मध्ये खेळलेल्या ९ सामन्यांपैकी ७ सामन्यांत विजय मिळवला आहे. तर दोन सामन्यात पराभवाचे तोंड पाहावे लागले. दिल्लीचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी असून खात्यात १४ गुण जमा झाले आहेत. तर सनराइजर्स हैदराबादचा खराब फॉर्म सुरूच आहे. या सामन्यात पराभव झाल्याने सर्वात शेवटच्या स्थानी आहे.

संक्षिप्त धावफलक
हैदराबाद सनरायझर्स : २० षटकांत ९ बाद १३४ धावा
दिल्ली कॅपिटल्स : १७.५ षटकांत २ बाद १३९ धावा