मतभेद म्हणजे धुसफूस नव्हे!

देवेंद्र फडणवीस : भाजपच्या हितार्थ बोलणे म्हणजे नाराजी नाही

|
22nd September 2021, 12:39 Hrs
मतभेद म्हणजे धुसफूस नव्हे!

पर्रा येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजपचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस. सोबत मंत्री मायकल लोबो, डिलायला लोबो व इतर.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
म्हापसा : भाजप वरिष्ठ नेते मंत्री मायकल लोबोंवर नाराज नाहीत. पक्षाच्या हितार्थ काही बोलण्यास त्याला भाजपात नाराजी म्हटले जात नाही. एखाद्याविषयी मतभेद असल्यास त्याला धुसफूस म्हटले जात नसून त्या कपोलकल्पित बाबी आहेत, त्याला अर्थ नाही, असे स्पष्टीकरण गोवा भाजप निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
मंगळवारी फडणवीस यांनी मंत्री लोबो यांची त्यांच्या पर्रा येथे निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे व लोबो यांच्या पत्नी डिलायला लोबो उपस्थित होत्या. या भेटीत त्यांनी आगामी विधानसभा निवडणूक व राजकीय समीकरणांविषयी चर्चा केली. आपली ही भेट वैयक्तिक आहे. पण, राजकारणी जेव्हा भेटतात, तेव्हा साहजिकच राजकारण हा विषय असतो. भाजप धोरणानुसार आगामी निवडणुुकांना सामोरे जाणार आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.
जमिनीवरील वास्तव पाहून उत्तम मार्ग काढण्याची आवश्यकता आहे. गोव्यात पुन्हा भाजपच सरकार प्रस्थापित करेल, अशी राजकीय स्थिती आहे. आम्हाला पुढील रणनीती आखता येईल यासाठीच प्रत्येक आमदार व नेत्यांशी भेटत आहोत, असेही फडणवीस म्हणाले.
शिवोली मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास माझी पत्नी डिलायला लोबो या इच्छुक आहेत. ही गोष्ट आपण फडणवीस यांच्या कानावर घातली आहे. फडवणीस यांनी मला सकारात्मक किंवा नकारात्मक प्रतिसाद न देता योग्यवेळी पक्षाकडून निर्णय घेतला जाईल असे उत्तर दिले आहेे, असे मंत्री लोबो यांनी सांगितले.

आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर अनेकजण गोव्यात येतील आणि स्वतःच्या पक्षाला निवडून द्यावे, असे आवाहन करतील. निवडणुकांमुळे नेतेमंडळीच्या गाठीभेटी होतात, त्यात गैर काहीच नाही, असे मायकल लोबो यावेळी म्हणाले.

राजकारणात असल्याने नेते मंडळी वक्तव्ये करतातच. काहीवेळा कामे करून घेण्यासाठी आपापसात वाद होतात. लोकप्रतिनिधी म्हणून लोकांची कामे करून घेणे हे आमचे कर्तव्य आहे. _मायकल लोबो, कचरा व्यवस्थापन मंत्री