करोना होत आहे कमकुवत

सप्टेंबरच्या मध्यापासून घसरली आर-व्हॅल्यू


22nd September 2021, 12:07 am
करोना होत आहे कमकुवत

करोना होत आहे कमकुवत
सप्टेंबरच्या मध्यापासून घसरली आर-व्हॅल्यू
नवी दिल्ली :
देशातील करोना विषाणूची ताकद हळूहळू कमी होताना दिसत आहे. याच पार्श्‍वभूमीवर, याबाबत एक सकारात्मक बातमी समोर येत आहे. करोना व्हायरसचं भारतातील आर व्हॅल्यू ही १ च्या खाली आली आहे. आर व्हॅल्यू हे एक परिमाण आहे. याद्वारे देशात करोना व्हायरसचा संसर्ग किती वेगाने पसरत आहे हे मोजले जाते. संशोधकांच्या मते, आर-व्हॅल्यू करोना विषाणू किती वेगाने पसरतो हे दर्शवते. दिलासादायक बाब अशी की, सप्टेंबरच्या मध्यापर्यंत देशातील आर व्हॅल्यू ०.९२ वर आली आहे.
ऑगस्टच्या अखेरीस देशाची आर-व्हॅल्यू १.१७ इतकी होती. तर ४ सप्टेंबर ते ७ सप्टेंबर दरम्यान ही आर-व्हॅल्यू १.११ वर आली होती. तेव्हापासून सातत्याने देशाची आर-व्हॅल्यू ही १ च्या खाली आली आहे. ११ ते १५ सप्टेंबर दरम्यान देशाची आर-व्हॅल्यू ही ०.८६ होती. खरं तर, महाराष्ट्र आणि केरळमध्ये झपाट्याने वाढणार्‍या प्रकरणांमुळे देशाची आर-व्हॅल्यू वाढली होती. मात्र, सध्या या दोन्ही राज्यांमध्ये करोनाची प्रकरणं कमी प्रमाणात नोंदवली जात आहेत.
चेन्नईच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅथमॅटिकल सायन्सेसच्या सीताभारा सिन्हा आर-व्हॅल्यूची गणना करणार्‍या संशोधकांच्या टीमचे नेतृत्व करत आहेत. आकडेवारीनुसार, मुंबईची आर-व्हॅल्यू १.०९, चेन्नईची आर-व्हॅल्यू १.११, कोलकाता १.०४, बेंगळुरूची आर-व्हॅल्यू १.०६ इतकी आहे.