थिवी रेल्वेस्थानकावरील पोलिसांचा प्रामाणिकपणा!

स्थानकावर सापडलेली दोन लाखांचा मुद्देमाल असलेली बॅग प्रवाशाला केली परत


21st September 2021, 10:23 pm
थिवी रेल्वेस्थानकावरील पोलिसांचा प्रामाणिकपणा!

प्रवासी आदित्य भंडारी यांच्यासमवेत थिवी रेल्वे पोलीस.

प्रतिनिधी। गोवन वार्ता
मडगाव :
थिवी येथील रेल्वे पोलिसांकडून दोन लाखांचा मुद्देमाल असलेली बॅग प्रवाशाला परत करण्यात आली. गुजरात येथून आलेला प्रवासी १ लाख रोख व लॅपटॉप असलेली बॅग रेल्वेस्थानकावर विसरून गेला होता.
रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थिवी रेल्वेस्थानकावर नेहमीप्रमाणे गस्त घालत असताना कॉन्स्टेबल नारायण राम यांना प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर एक बॅग आढळून आली. चौकशीअंती ती बॅग स्थानकावरील कुणाची नसून कुणीतरी ती बॅग विसरून गेलेला असण्याची शक्यता होती. त्यामुळे योग्य तपासानंतर ज्या प्रवाशाची ती बॅग होती त्याला फोनवरून कळवण्यात आले.
अहमदाबाद - गुजरात येथील प्रवासी आदित्य भंडारी हा २१ सप्टेंबर रोजी थिवी रेल्वेस्थानकावरील दोन नंबरच्या प्लॅटफॉर्मवर उतरला होता. भंडारी यांनी सांगितले की, ओखा - एर्नाकुलम या गाडीतून अहमदाबाद ते थिवी असा प्रवास केला. मित्रांसमवेत जाण्याच्या गडबडीत रोख १ लाख रुपये, अॅपल कंपनीचा लॅपटॉप व तीन हार्डडिस्क असलेली बॅग स्थानकावरच विसरलो. थिवी रेल्वे पोलिसांकडून बॅग व साहित्याची ओळख पटवून त्यानंतर सर्व साहित्य प्रवाशाला सुपूर्द करण्यात आले. प्रवासी आदित्य भंडारी यांनीही रेल्वे पोलिसांचे आभार मानत कौतुक केले.