सात वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; संशयित ट्यूशन शिक्षकाला अटक

|
21st September 2021, 04:22 Hrs
सात वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; संशयित ट्यूशन शिक्षकाला अटक

सात वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; संशयित ट्यूशन शिक्षकाला अटक
प्रतिनिधी । गोवन वार्ता
म्हापसा ः
ट्यूशन शिक्षकाकडून एका सात वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. बार्देश तालुक्यातील हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून पोलिसांनी संजय हिर्लेकर या ४७ वर्षीय संशयितास शिक्षकास अटक केली आहे. हा लैंगिक अत्याचाराचा प्रकार शनिवार दि.१८ रोजी रात्री ८.१५ ते ९.४५ वा. दरम्यान घडला. या प्रकरणी पीडितेच्या आईने पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.
संशयित आरोपी हा व्यवसायाने ट्यूशन शिक्षक असून मुलांना त्यांच्या घरी जाऊन तो शिकवीत होता.  बार्देशमधील एका इमारतीत राहणार्‍या फिर्यादीने आपल्या सात वर्षीय मुलीला शिकवण्यासाठी संशयिताशी संपर्क साधला होता व गेल्या पाच सहा दिवसांपासून त्याने फिर्यादींच्या घरी जाऊन पीडितेला शिकवण्यास सुरुवात केली होती. मुलीला शिकवण्यासाठी घरातील एका खोलीत हा शिकवणी वर्ग सुरू करण्यात आला होता.  शिकवणी दरम्यान त्या खोलीत फक्त संशयित व पीडित मुलगी दोघेच असायचे. या संधीचा फायदा घेत  संशयित ट्यूशन शिक्षकाने त्या लहान मुलीवर लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार घरच्यांच्या कानी घातल्यास जीवे मारण्याची धमकीही त्या मुलीला दिली. सोमवार दि. २० रोजी रात्री संशयित शिकवण्यासाठी घरी येण्यापूर्वी पीडित मुलीने आपल्यावर घडलेला प्रकार आईवडिलांना सांगितला. संशयित रात्री ८.१५ च्या सुमारास घरी येताच फिर्यादींंनी त्यास जाब विचारला. त्यानंतर पोलिसांना पाचारण केले.  पोलिसांनी संशयितास ताब्यात घेतले. नंतर फिर्यादीच्या तक्रारीच्या आधारे भा.दं.सं.च्या कलम ३५४, ३५४(अ), ३७६ अ ब, ५०९, ५०६ (२), गोवा बाल कायदा कलम ८ व पोक्सो कायदा कलम ४, ८, १० व १२ खाली गुन्हा दाखल केला व संशयितास अटक केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.