वर्ल्ड कप जिंकण्यासाठी घेणार राहुल द्रविडची मदत; बीसीसीआयचा निर्णय


18th September 2021, 11:20 pm
वर्ल्ड कप जिंकण्यासाठी घेणार राहुल द्रविडची मदत; बीसीसीआयचा निर्णय


मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार राहुल द्रविड याचे भारतीय क्रिकेट वर्तुळात आदराचे स्थान आहे. द्रविड सध्या भारतीय क्रिकेटपटूंची नवी पिढी घडवण्याचे काम करत आहे. श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या टीम इंडियाचा देखील तो कोच होता. द्रविडच्या या अनुभवाचा फायदा वर्ल्ड कप स्पर्धा जिंकण्यासाठी करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे.
तामिळनाडूचा माजी फलंदाज श्रीधरन शरथ यांची राष्ट्रीय ज्युनिअर टीमच्या निवड समितीचे प्रमुख म्हणून शुक्रवारी निवड झाली आहे. ही निवड होताच श्रीधरन कामाला लागले असून आगामी अंडर १९ वर्ल्ड कप जिंकण्यासाठी योग्य टीम निवडणे हे त्यांचे मुख्य काम आहे. याच कामासाठी राहुल द्रविडची मदत घेतली जाणार आहे. द्रविडच्या मार्गदर्शनाखालीच भारतीय क्रिकेट टीमने यापूर्वी अंडर १९ वर्ल्ड कप जिंकला होता.
श्रीधरन यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना द्रविडला भेटण्यासाठी लवकरच बंगळुरुला जाणार असल्याचे सांगितलं. तो गेल्या काही वर्षांपासून अंडर १९ टीमसोबत काम करत आहे. त्याला खेळाडूंच्या गुणवत्तेबाबत चांगली माहिती आहे. तो आमचा मार्गदर्शक असेल. त्याच्याशी चर्चा करून आम्ही भविष्यातील योजनांचा रोडमॅप तयार करणार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.
संघ निवडीचे आव्हान
करोना महामारीमुळे गेल्या एक वर्षांपेक्षा जास्त कालावधीमध्ये कोणतेही एज ग्रुप क्रिकेट झालेले नाही. काही महिन्यांपूर्वीच या खेळाडूंना क्रिकेटचा सराव करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या अंडर १९ वर्ल्ड कपसाठी टीम निवडणे हे निवड समितीच्यासमोर मोठे आव्हान असेल. शरथ यांनी देखील निवड समितीकडे पुरेसा वेळ नसल्याचे मान्य केले. पण तरीही वर्ल्ड कपसाठी सर्वोत्तम टीम निवडण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे ते यावेळी म्हणाले.