मुख्य प्रशिक्षकासाठी बीसीसीआय कुंबळेच्या संपर्कात

कोहलीला आणखी एक धक्का


18th September 2021, 11:19 pm
मुख्य प्रशिक्षकासाठी बीसीसीआय कुंबळेच्या संपर्कात

मुंबई : विराट कोहलीने टीम इंडियाच्या टी-२० संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेताच बदलाचे वारे वाहू लागले आहेत. टीम इंडियाचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रीचा कार्यकाळ टी-२० वर्ल्ड कपनंतर संपणार आहे. त्यानंतर बीसीसीआय पुन्हा एकदा मुख्य प्रशिक्षक पदासाठी भारताचे माजी लेगस्पिनर अनिल कुंबळे यांना परत आणण्याच्या तयारीत आहे आणि त्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे कर्णधार विराट कोहलीच्या विरोधातील अडचणी वाढल्या आहेत.
कुंबळे यापूर्वी २०१६-१७ या कालावधीमध्ये टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक होते. मात्र, विराट कोहलीशी झालेल्या मतभेदानंतर त्यांनी राजीनामा दिला होता. बीसीसीआयने पुढील महिन्यात होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपसाठी महेंद्रसिंह धोनीला मेंटर बनवले आहे. त्यानंतर आठवभरातच विराट कोहलीने टी-२० संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
चार वर्षांपूर्वी कुंबळे यांनी राजीनामा दिल्यानंतर रवी शास्त्रीची त्यांच्या जागी नियुक्ती करण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार कुंबळे यांना परत आणण्याची तयारी बीसीसीआयने सुरू केली आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांचीही कुंबळेनी पुन्हा प्रशिक्षक व्हावे, अशी इच्छा आहे. कुंबळेच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाने २०१७ साली चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये धडक मारली होती. कुंबळे सध्या यूएईमध्ये असून पंजाब किंग्स या आयपीएल संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत.
आयपीएल टीम सोडावी लागणार
अनिल  कुंबळेने रवी शास्त्रीचा उत्तराधिकारी होण्याची तयारी दर्शवली तर त्यांना पंजाब किंग्सची जबाबदारी सोडावी लागेल. कारण, बीसीसीआयच्या घटनेनुसार टीम इंडियाचा मुख्य प्र‌शिक्षक अन्य कोणत्याही क्रिकेट संघाची जबाबदारी घेऊ शकत नाही.
का दिला होता राजीनामा?
अनिल कुंबळे २०१६ साली सर्वप्रथम टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक झाले होते. पण, त्यावेळी कर्णधार विराट कोहलीशी त्याचे मतभेद झाले. या मतभेदामुळेच कुंबळे यांनी वर्षभरानंतर पदाचा राजीनामा दिला होता. बीसीसीआयने कोहली आणि आपल्यातील मतभेद दूर करण्याचा प्रयत्न केला होता, असेही कुंबळे यांनी म्हटले होते.