सोन्याचे फुल अर्थात शेवंती

लहानपणी आम्ही शेवंतीची दोन किंवा तीन रूप बघायचो. एक जी वर्षभर बाजारात मिळतात,(सफेद रंगाची), त्यातच एक लांब देठ असलेली गुलाबी रंगाची, आणि बटन शेवंती जी प्रत्येक पोरसात लावली जायची.

Story: त्या फुलांच्या गंधकोषी । आसावरी कुलक� |
18th September 2021, 12:33 am
सोन्याचे फुल अर्थात शेवंती

"हळद माखून 

गोरी झाली

लाडकी सोनपरी

सजणाला भेटायला 

आतुर नवरी" 

गोव्यातील प्रत्येक पोरसात फुलं उमलत असतात वर्षभर. पण तरीही सणासुदीला बाजारातून “फुलां ” आणली नाही तर पूजा पूर्ण होतच नाही अस प्रत्येक पूजा करणाऱ्या माणसाला वाटतं . या विकत आणलेल्या “फुलां” मध्ये गच्च गुंफलेला झेंडू, शेवंती किवा गुलाबाचा हार आणि, शेवंतीची पाती(फाती). किती वर्ष माहित नाही, पण माझ्या लहानपणापासून  ही शेवंतीची फुलं मी बघत आलेय पूजा किंवा धार्मिक विधीसाठी. फिक्कट  पांढऱ्या पिवळसर रंगाची, भरपूर पाकळ्यांची शेवंती फाती, हार किंवा एकल स्वरूपात वापरली जातात. श्रावण महिन्यातल्या सवाष्ण पूजेला, सत्यनारायण पुजेस बसणाऱ्या यजमानीणीला, गोव्यातल्या अधिकश्या देवींच्या  देवळात न चुकता वापरात येते ती शेवंतीची फाती. चतुर्थीनंतर येणाऱ्या म्हाळवस, नवरात्रातली कुमारीपूजन, नवचंडी, जत्रा, धालो, संक्रांतीचे हळदी कुंकू, या सगळ्या सणावाराला शेवंतीची फाती खूप महत्वाची असायची काही वर्षांपूर्वी.

मोठ्या बोटभर असणाऱ्या फुलांना शिस्तीत केळीच्या दोरात बांधले जायचे आणि सजावटीला खास कलाबूत, रंगीत शेवंत किंवा कागद नाहीतर बकोडिया वापरले जायचे. फुलं मोठी असल्यामुळे ही फाती अगदी दणदणीत, सणसणीत दिसते. केसात माळल्यानंतर अगदी भारदस्त दिसते. केसाच्या कुठल्याही आकाराच्या आंबाडयाला शृंगारीत करते. म्हणूनच धार्मिक विधीच्या वेळी ही फाती माळणं अगदी गरजेच आहे, स्त्रियांसाठी (शास्त्र असतय ते).  गोव्यातील धालो, फुगडी, आरत्या या सगळ्या  लोक सांस्कृतित किंवा धार्मिक गीतांमध्ये शेवंती हमखास डोकावते. मग शेवंतीच्या मळ्यात कुणी माळीण मळे शिंपित असते, किंवा शेवंतीचा देठ लांब म्हणून कुणाचा भाऊ परगावीहून परतायचं नाव घेत नाही. मंगळागौरी, हरतालिकेच्या पूजेला सुवासिनी गुलाब, अबोली, मोगरी याचबरोबर शेवंतीही घेऊन पूजा करते. ललिता सहस्त्र नामावलीत सौगांधिका (जे खर तर सोनटक्क्याच नाव आहे) नावाने शेवंतीचा उल्लेख येतो. वैभवाचे प्रतिक असल्याने श्री लक्ष्मीच्या पूजेत शेवंती वापरण्याची पद्धत आहे.

जगभर शेवंतीला 'ऑक्टोबर फ्लॉवर' किवा 'फॉल फ्लॉवर' असं म्हणतात कारण शरद ऋतू हा या झाडाचा फुलण्याचा काळ. लहानपणी आम्ही शेवंतीची दोन किंवा तीन रूप बघायचो. एक  जी वर्षभर बाजारात मिळतात,(सफेद रंगाची), त्यातच एक लांब देठ असलेली गुलाबी रंगाची, आणि बटन शेवंती जी प्रत्येक पोरसात लावली जायची. शरदाच्या कोवळ्या उन्हात उमलणारी ही नाजूक बटन शेवंती मला उप्पीटाची आठवण करून द्यायची. कधी रतन अबोलीच्या फातीत साथीदार व्हायची किंवा कधी एकटीच मिरवायची. हल्ली ही जात कुठे तरी लुप्त झाली आहे. वास्तविक शेवंतीचे डेरेदार फुल हे असंख्य एकल फुलाचा समूह किवा गुच्छ असतो. म्हणजेच शेवंती कुळात येणाऱ्या सगळ्याच फुलांची रचना ही अशी गोलाकार गोंड्या सारखी असते. एक पाकळी आणि त्या खाली असणारी काळी बी म्हणजे स्वतंत्र फुल असते. म्हणूनच की काय, संस्कृतमध्ये  शेवंतीला ' बहु पत्रिका ' असे एक नाव आहे. त्याचप्रमाणे चारुकेसर , भृन्ग्वल्ल्भा, चन्द्र्मल्लीका हिंदीत गुलदाउदी, कन्नड भाषेत शेवंतीगे, तेलगुत चाम्न्तिका अशी  नाव आहेत. पूर्ण जगात 'क्रीसेन्थेमम' किवा फक्त 'मम' या नावाने ओळखले जाते.  शास्त्रीय नाव 'क्रीसेन्थेमम इंडिकम' असे आहे. ग्रीक भाषेत 'क्रायोस' म्हणजे 'सोने' आणि 'अन्थ्मम' म्हणजे फुल.

उपनाव जरी भारतीय उपखंडावरून इंडिकम असले तरी फुलाची मूळ उत्पती मात्र चीन देशातली आहे. चीनमध्ये लागवडीत येणारं हे सर्वात प्राचीन फुल आहे असं मानतात. तीन हजार वर्षांपूर्वीपासून  चीन मध्ये शेवंतीची लागवड होत असल्याचा उल्लेख आहे.चीनमध्ये शेवंतीला 'जुहुआ' किवा 'चुआ'  असं नाव आहे.  शेवंतीमुळे दीर्घायुष्य, सकारात्मकता आणि आनंद लाभतो अशी तीथली मान्यता आहे.  “ तुम्हाला जर आयुष्यभर आनंद हवा असेल तर शेवंती लावा” अशी एक प्रसिद्ध चीनी म्हणसुद्धा आहे. शेवंतीच्या फुलाला चीनमध्ये चार अतीमहनीय व्यक्तींपैकी एक मानतात. तिथल्या धार्मिक उत्सवामध्ये शेवंतीला खूप महत्व आहे. सोळाव्या शतकात जेव्हा शेवंतीचा प्रचार जगभर झाला तो पर्यंत शेवंतीचे ५०० प्रकार चीनमध्ये लागवडीत होते. आताच्या घडीला शेवंतीचे जवळ जवळ २०,००० प्रकार लागवडीत आहेत.

शेवंतीचे फुल हे डोळ्यांच्या विकारासाठी, अर्धशिशीवर उपयुक्त असे मानले जाते. शेवंतीच्या फुलांचा चहा आणि पाकळ्यांचे सलाड चीनमध्ये प्रसिद्ध आहे. मूळ जंगली शेवंती ही एका थराची,  म्हणजे आपल्या आत्ताच्या सोनकी किंवा हरणाच्यासारखी आणि पिवळी  असते. पण तीची व्यवसायिक रूपं इतकी विविध आहेत कि मोजून संपणार नाहीत. आठव्या शतकात शेवंती जपान देशात पोहचली आणि तिथली अत्यंत प्रिय झाली. इतकी की जपानची राजकीय मुद्रा शेवंती आहे, तसेच राजेशाही संस्थेला शेवंती (क्रीसेन्थेमम) सिंहासन(संस्थान) असं म्हटलं जातं. उडोच्या राजवटीत शेवंतीचा खूप प्रचार झाला आणि त्याचे कित्येक प्रकार अस्तित्वात आले. जपानमध्ये शेवंतीला 'आनंद देणारे फुल' मानलं जातं. शेवंतीचं जपानी नाव 'कीकू' असं आहे. तिथे 'कीकू ना साकु' या नावाने शेवंती दिवस म्हणजेच आनंदाचा दिवस  हा राष्ट्रीय उत्सव साजरा केला जातो.

सोळाव्या शतकाच्या अखेरीस शेवंतीचा युरोप आणि अमेरिकेत प्रसार झाला. ' पोम्पोम', 'daizy' असे कितीतरी प्रकार जगभर प्रसिद्ध आहे. प्रत्येक प्रकाराचं महत्व वेगळं आहे. युरोपमध्ये शेवंती मेलेल्या माणसांना श्रद्धांजली देण्यासाठी वापरतात, तर अमेरिकेत ते आनंद, सुख पसरवणारे प्रतिक मानतात. त्यामुळे लग्न समारंभ, वाढदिवस अश्या कार्यक्रमासाठी आवर्जून शेवंती असतात. नॅशनल सोसायटी फॉर क्रीसेनथेमम या नावाची संस्था शेवंतीच्या एकूणच लागवड आणि सांस्कृतिक बाबींवर काम करते. दरवर्षी शेवंतीचे प्रदर्शन /उत्सव ठिकठिकाणी भरवले जातात. शेवंती हे जगातले दुसरे सगळ्यात आवडते फुल आहे. 

 शेवंतीच्या पाण्याचा उपयोग विविध रोगांवर होतो. त्वचा रोग, जुनाट पित्तरोग यावर हे पाणी रामबाण उपाय आहे. काही जातींचा उपयोग नैसर्गिक कीटनाशकासारखा होतो. शेवंतीचे झाड हवा शुद्ध करू शकते असेही संशोधनातून समोर आले आहे. 

या फुलांना पहिले कि खरंच आनंदी वाटते, समृद्ध वाटते. अश्या या आनंदी फुलांना तुम्ही आणलच असा ल लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी, पूजनासाठी.. सर्व दु:ख निवारण करणाऱ्या गजाननाकडे साकडं घालूया जगावरील संकटाचा नाश करण्यासाठी  आणि आनंदी होऊया सोनपाकळ्या लेऊन सजलेल्या या शेवंतीच्या सानिध्यात.