अफलातून

"आमच्या सोबित आणि माणकुल्या गोंयात मागील काही दिवसांपासून एका पाठोपाठ एक मुलींवर अत्याचार होत आहेत. म्हणून राणीच्या घरातले आणि माझ्या घरातले दिवसभर आमच्यावर पाळत ठेवून राहतात."

Story: कथा । डॉ. विभा लाड, काणकोण (९८५०४६९०६६) |
18th September 2021, 12:21 am
अफलातून

मीनी आणि राणी दोघीही एकमेकींच्या शेजारी व महाविद्यालयात बरोबर शिकणाऱ्या वर्गमैत्रिणी. दररोज कॉलेजमध्ये जाण्यासाठी अर्धातास आधी त्या घरातून बाहेर पडायच्या. हसत, खेळत, रमत, गमत दहा मिनिटांच्या वाटेवर असलेल्या कॉलेजमध्ये त्या अर्धा तासांनी पोचायच्या. आजही त्या दोघी नटून थटून बॅग पाठीला मारून बाहेर पडल्या. त्यांच्या मागून एका विशिष्ट अंतरावरून मीनीचे पप्पा स्कूटर घेऊन आणि राणीचा भाऊ बुलेट घेऊन हळू हळू पुढे सरकत होते.

“राणी, पप्पा मला म्हणत होते, मीनी बेटा.. मी तुला कॉलेजमध्ये नेऊन सोडतो”

“मी म्हटलं नको पप्पा. मी राणी सोबत चालतच जाणार.”

“हो का? मी पण भैय्याला आणि मम्माला असंच ठणकावून सांगितलं..”असं म्हणत दोघींनी तिरक्या डोळ्यांनी मागे पाहिले व दोघीही खुदकन् हसल्या.

त्याचं झालं होतं असं की आपल्या शांत व सुरक्षित गोव्यात गेल्या काही दिवसांपासून मुलींवर होत असलेल्या अत्याचारांमुळे मीनीचे पप्पा आणि राणीची मम्मा चिंताग्रस्त झाले होते. ते आता राणी व मीनीला कुठेच एकट्याने बाहेर जायला देत नव्हते. सतत पहारा ठेवत होते. त्यामुळे मीनी आणि राणी बऱ्याच वैतागल्या होत्या.  

दोघीही बोलत, बोलत, रमत, गमत एकदाच्या कॉलेजमध्ये पोचल्या. पहिलाच तास ‘ऑफ’ होता.  मीनी आणि राणीला उदास पाहून त्यांचा वर्गमित्र शरद त्यांच्या जवळ आला. “काय गं आज दोघीही एवढ्या खिन्न का? आणि तोंडाची गिरण पण बंद!!” (मीनी आणि राणीच्या बॅगमध्ये पुस्तके कमी आणि चिवडा, चिप्स, चणे असल्या गोष्टी अधिक असायच्या. कधी कधी लहर आली की वर्ग चालू असताना सूरू व्हायच्या. खाऊन राहिलंच तर कधी कधी शरदच्या हातावरही दोन चिप्स ठेवायच्या. पण आज त्या दोघींना कशाचीच चव लागेना) 

“अरे मेल्या शरद, आम्ही दोघी फार दुःखी आहोत रे”

“आणि त्यात तू आमच्या जखमेवर मीठ चोळू नकोस”

“काय झालं तरी काय? सांगा तरी.” शरद 

“अरे तुला माहित आहे ना, आमच्या सोबित आणि माणकुल्या गोंयात मागील काही दिवसांपासून एका पाठोपाठ एक मुलींवर अत्याचार होत आहेत. म्हणून राणीच्या घरातले आणि माझ्या घरातले दिवसभर आमच्यावर पाळत ठेवून राहतात. त्यांना भीती वाटते उद्या आमच्या बाबतीत काही घडलं तर समाज त्यांना दोष देईल.” 

“पप्पा तर कहरच करतात.मी कुणाशी बोलते, कुठे जाते, काय करते, झोपण्याआधी सगळा माझ्याकडून अहवाल वाचन करून घेतात. कॉलेजमध्ये सोडायला येतात. आधी कसं स्वातंत्र्य होतं. हसत, खेळत, रमत, गमत आम्ही कॉलेजमध्ये यायचो. लेक्चर अटेंड करून घरी जायचो. आता असं वाटतं कि आमच्यावर सतत कुणाचे तरी रोखलेले डोळे असतात.” मीनीने आपली कैफीयत मांडली.

“हो, माझी मम्मा पण सतत भैय्याला माझ्या मागे मागे पाठवते. पप्पा विदेशातून रोज फोन करतात तर विषय मीच असते. राणीला एकटीने कुठेच पाठवू नकोस, कॉलेजमध्ये नंदूला सोडून यायला सांग.  आणि मम्मा तंतोतंत पालन करते. दोन दिवस आधी. माझ्या बालमैत्रिणीचा छायाचा बर्थ डे होता. तिने मला घरी बोलावलं होतं. मम्मानं पाठवलं नाही. म्हणाली काही बरं वाईट झालं तर समाज आम्हाला दोष देईल..”

“मी म्हणते मुलीची चुक नसताना काही बरं वाईट होतं तर समाजाला वाईट वाटायला पाहिजे. गुन्हेगारांविषयी तिरस्कार वाटायला पाहिजे. पण वा रे!! समाज ‘उल्टा चोर कोतवाल को डाँटे’ या उक्तीप्रमाणे त्या बिचाऱ्या मुलीला आणि तिच्या लोकांनाच वेठीस धरणार!! मी म्हणते म्हणूनच आम्हा बायकांवर अत्याचार होतात. हा समाज बघ्याची भूमिक घेतो आणि नंतर त्या निरपराध मुलीलाच दोषी ठरवतो. एक दोनदा गुन्हेगारांना जरब बसवा. तोंडाला काळे फासून मिरवणूक काढा, तिरस्काराची वागणूक द्या. समाजातून बेदखल करा. मुलीच्या बाजूने ठामपणे उभे रहा. तिला आधार द्या मग बघा कसे गुन्हे आपोआप कमी होतात ते.” मीनीने जोशात भाषण ठोकले.

“अशा घटना होतात. मग आरोप प्रत्यारोप होतात. नंतर आमच्यासारख्या मुलींना त्याचे परिणाम सोसावे लागतात. घरची मंडळी दडपणाखाली येतात आणि उद्या समाज आम्हाला दोष दईल या भीतीने आमचं स्वातंत्र्य हिरावून घेतात.” राणीने निराश होत म्हटले

“जसे तुझे भैय्या आणि मीनीचे पप्पा.”  शरदने हसत हसत म्हटलं.

“हो.. हो.. ‘मार रे फकाणां’  ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं.” मीनीने तोंड वेडेवाकडे करत म्हटले

त्यावर शरद मोठ्याने हसला.“अगं माझ्याकडे एक झक्कास आयडिया आहे. उद्यापासून तुम्ही फ्री.”

“म्हणजे..?” मीनी व राणीने म्हटले

“इथं या सांगतो.” असं म्हणून शरद मीनी व राणीच्या कानात काहीतरी कुजबुजून निघून गेला.मीनीने व राणीने एकमेकांकडे बघत कँटिनचा रस्ता धरला.

शेवटचा तास संपला. मीनी आणि राणी घरी जाण्यासाठी मुख्य रस्त्यावर येण्याआधीच मीनीचे पप्पा व राणीचा भैय्या तिथे उपस्थित होते.. दोघींनी एकमेकांना पाहिले व रमत गमत चालू लागल्या एवढ्यात स्वीटी तिथे पोचली. स्वीटीला रोज बसस्टॉप पर्यंत चालत जायला कंटाळा यायचा. तेव्हा ती कुणा न कुणाची ‘लिफ्ट’ शोधत असायची. मीनीने मुद्दामच स्वीटीला हटकले.

“हाय स्वीटी, आज काय चालत??”

“हो गं, सगळे गेले वाटतं. आज चालत जायचं.” स्वीटीने तोंड वेडेवाकडे करत म्हटले. एवढ्यात मीनीने म्हटलं, “आमच्या मागे तो गायीवर बसलेला कावळा दिसतो ना तो राणीचा भैय्या.” बुलेट चालवणाऱ्या कृश नंदूकडे बोट दाखवत मीनीने डोळे मोडत म्हटले. “आणि हो बाजूला जे स्कूटरवर विमानतळ दिसतं ना ते मीनीचे पप्पा” ‘हम भी किसी से कम नहीं’ च्या अविर्भावात राणीने म्हटले.

स्वीटीची त्या दोघांवर नजर पडताच डोळे चमकले. “अगं ते मला ‘लिफ्ट’ देतील का? चालायला पाय फार दुखतात गं.” स्वीटीने कण्हत म्हटलं “हो..हो.. भैय्या तुला लिफ्ट देईल. जा तू, मी सांगितलंय म्हणून सांग.” मीनीच्या पप्पांच्या स्कूटरवर आधीच कॅंटिनवाली बाई बसली होती. तेव्हा स्वीटीने राणीच्या भैय्यालाच ‘रिक्वेस्ट’ केली. आता राणी आणि मीनी पुढे पुढे आणि मीनीचे पप्पा कॅंटिनवाल्या बाईला मागे बसवून आणि राणीचा भैय्या स्वीटीला मागे बसवून वरात निघाली. एवढ्यात राणीने आणि मीनीने आपआपल्या आयांना वीडियो कॉल लावला..

“मम्मे, पप्पांना बघ...” इति मीनी

“मम्मा, भैय्याला बघ..” इति राणी

आणि दोघी ही खुद्कन हसल्या.. 

दूसऱ्या दिवशी राणी आणि मीनी मात्र कॉलेजमध्ये जाण्यासाठी घरातून बाहेर पडल्या पण त्यांच्या मागोमाग बाहेर पडणारे राणीचे भैय्या व मीनीचे पप्पा दोघींच्या मम्मांच्या कडक निगराणीत आत बसून होते. रस्त्यावर आल्या आल्या मीनी आणि राणीने शरदला व्हॉट्सअप केला ‘थँक्स ब्रो.. काल अफलातून युक्ति सुचवल्याबद्दल’ कारण शरदच्याच सांगण्यावरून राणीने आणि मीनीने कँटिनमध्यल्या बाईला मीनीच्या पप्पांसोबत आणि स्वीटीला राणीच्या भैय्या सोबत जायचा प्रस्ताव दिला होता..