लाडली लक्ष्मी आज असुरक्षित

आपल्या गोव्याचेच उदाहरण घेतले तर समजतं की पोर्तुगीजांच्या जुल्मी राजवटीपासून मुलींच्या बाबतीत सुरक्षित स्थान म्हणुन मानला जाणारा गोवा आज बलात्कार, अपहरण या सारख्या काळ्या डागांनी कलंकित होत आहे.

Story: रुबिना शेख, पिळगाव - डिचोली |
18th September 2021, 12:21 am

‘स्वराज्य आले पण सुराज्य आले नाही, सकाळ झाली पण सुर्य दिसला नाही? हा सुर्य सातत्याने नी खऱ्याने संपूर्ण क्षेत्रामध्ये नंदनवन धडवून आणण्याचा आहे. हा सूर्य चैतन्याचा आहे आणि खऱ्या स्वातंत्र्याचा आहे जो आज बलात्कार खून, अपहरण व भीतीच्या ढगाआढ दिसेनासा झालेला आहे. नुकताच आपण १५ आॅगस्टला स्वातंत्र्य दिवस साजरा केला. परंतु खरे स्वातंत्र्य आम्हाला लाभलेलेच नाहीए. कारण आजही आपल्या देशातील, राज्यातील,आपल्या देशातील व गावागावातील लाडली लक्ष्मीला साधं मोकळेपणाने फिरायला मिळत नाहीये. आपल्या गोव्याचेच उदाहरण घेतले तर समजतं की पोर्तुगीजांच्या जुल्मी राजवटीपासून मुलींच्या बाबतीत सुरक्षित स्थान म्हणुन मानला जाणारा गोवा आज बलात्कार, अपहरण या सारख्या काळ्या डागांनी कलंकित होत आहे. गोव्याची वसुंधरा , गोव्यातील परंपरा आणि गोव्यातील लाडली लक्ष्मी जी आतापर्यंत निर्भयपणे वावरत होती ती आज भीतीने वावरत आहे .

त्यासाठी मुलींना पूर्णपणे समजून घेणे ही प्रत्येक मुलींच्या पालकांची जबाबदारी बनते. त्यांच्या वाढत्या वयात त्यांना काय त्रास होत आहेत ते समजून घेण्याची गरज आहे. आपली मुलगी कुठल्याही चुकीच्या मोहात तर अडकलेली नाहीये ना? हे जाणून घेऊन त्यांना समजावून त्यांस योग्य मार्गावर आणण्याचे कर्तव्य पालकांचे आहे. त्याच्यासाठी पालकांनी त्यांच्ना समुपदेशन करणे गरजेचे आहे. स्वतः किंवा तज्ञांची मदत घेऊन समुपदेशन घडू शकते. व. पू. काळे देखील लिहितात की,' स्पर्श न करता ही आकार देता येतं हे ज्याला कळतं त्यालाच ‘पालक’ शब्दाचा अर्थ समजला'.

पालकांच्या सोबत शिक्षकांचेही कर्तव्य बनते की शिक्षक मग ते शाळेत कुठलाही विषय शिकवू द्या, परंतु आपल्या विद्यार्थ्यांना सभोवतालच्या तंत्रज्ञानाच्या दुनियेत योग्य ज्ञान देणे आवश्यक आहे.  जसे की सोशल मिडीयावर आपला अकाऊंट सुरक्षित कसा ठेवायचा, अनोळख्या व्यक्तिशी ‘चॅटिंग’ न करणे, आपले फोटो अनोळख्या व्यक्तिंना न पाठवणे , फेक अकाऊंटस्  कसे आळखावे याचे देखिल पूरेपुर ज्ञान देणे गरजेचे आहे.  त्याचबरोबर तंत्रज्ञानाच्या दुनियेत वावरताना चांगल्या तत्वाचे पालन करण्याचा ध्यास मुलांत रूजवून देण्याचे कर्तव्य शिक्षकांचे आहे.

या सगळयाबरोबर मुलींनीदेखील स्वत: वर आत्मविश्वास ठेवायला हवा. आज आपला गोवा बा.भ. बोरकरांच्या कवितेमधील सुवर्णभूमी राहिला नाहीये. इथलं वातावरण भयभीत बनलेलं आहे. याला सर्वात जबाबदार म्हणजे काही उनाड तरूण मुलांचा मुलींकडे बघण्याचा दृष्टीकोण. त्यासाठी त्यांच्या पालकांनी त्यांवर केलेले संस्कारही तेवढेच जबाबदार आहेत. त्यांच्यासाठी पलकांनी दिवसभरात निदान ५ मिनीटं तरी आपल्या मुलांशी बसून बोलावे. त्यांच्या आवडी निवडी जाणून हघ्याव्यात. जेणेकरून जर आपला मुलगा चूकीच्या आवडी जोपासत असेल, तर लेगच लक्षात येईल. जसे की आपल्या मुलगा लपून छपून ‘पॉर्न’ बघत असेल, अर्धवट कपड्यांच्या मुलींची छायाचित्रे पाहत असेल तर त्या वाईट सवयी तद्क्षणी सोडविण्याची तसदी पालकांनी घेतली पाहिजे. तसेच त्या मुलांनी स्वत: एक सुसंस्कारी युवक बनण्याचा प्रयत्न करावा आणि या पलीकडे पालकांनी आपल्या मुलांना आपल्या बहिणींसारखे, आपल्या आईसारखे लेखावे हे शिक्षण दिले पाहिजेच! त्याच्यासोबतीने त्यांच्या नजरेसमोर जर कुठल्याही मुलीचे शोषण होत असले, तर तद्क्षणी ते रोखून आपल्या देशातील प्रत्येक मुलीचे रक्षण करण्यासाठीची शिकवण आपल्या मुलांना देणे गरजेचे आहे. उदा. आजच्या मॉडर्न काळात महाविद्यालयात तसेच शाळांमधील देखिल ‘रॅगींग’चा कल्लोळ माजत आहे. जर हा प्रकार मुलींसोबत किंवा कुणाहीबरोबर होत असेल, किंवा मुलींच्या अब्रुशी निगडीत त्यांच्या कपड्यांवर,केसांवर किंवा त्यांच्या राहणीमान पद्धतीवर कोणी कमेंट पास करत असेल तर हे तिथल्या तिथे रोखणे गरजेचे आहे.

सरकारने  बलात्कार करणार्ऱ्यांना कडक शिक्षा दिल्या तर दिवसेंदिवस जन्माला येणारे हरामखोर बलात्कारी कमी होतील. नजरेसमोर असलेल्या  प्रत्येक स्त्रीला देवीच्या रूपात बघायला तो शिकेल. जेव्हा हा दिवस उजाडेल, तेव्हा मुली मध्यरात्रीसुद्धा मोकळेपणी फिरू शकतील आणि तेव्हाच आम्हाला आणि खऱ्या अर्थाने भारताला स्वातंत्र्य मिळेल. तेव्हाच प्रत्येक भारतीय छाती ठोकून म्हणू शकेन की ‘स्वराज्य आले आणि सुराज्य ही आले, सकाळ झाली व सुर्यही दिसला आहे.