कॉंग्रेसच्या अपात्रता याचिकेवर उच्च न्यायालयात आज सुनावणी


15th September 2021, 08:19 am
कॉंग्रेसच्या अपात्रता याचिकेवर उच्च न्यायालयात आज सुनावणी

कॉंग्रेसच्या अपात्रता याचिकेवर उच्च न्यायालयात आज सुनावणी
प्रतिनिधी । गोवन वार्ता
पणजी :  कॉंग्रेसच्या दहा बंडखोर आमदारांविरोधात गिरीश चोडणकर यांनी दाखल केलेल्या अपात्रता याचिकेची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाने न्या. के. के. तातेड आणि न्या. पृथ्वीराज चव्हाण या विशेष द्वीसदस्यीय न्यायपीठासमोर बुधवार दि. १५ रोजी होणार आहे.
उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर, मंत्री फिलीप नेरी रॉड्रिग्ज, मंत्री जेनिफर मॉन्सेरात, आमदार बाबुश मॉन्सेरात, नीळकंठ हळर्णकर, फ्रान्सिस सिल्वेरा, टोनी फर्नांडिस, उपसभापती इजिदोर फर्नांडिस, क्लाफासिओ डायस, विल्फ्रेड डिसा या दहा जणांनी दि. १० जुलै २०१९ रोजी कॉंग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर या प्रकरणी कॉंग्रेस पक्षाने २४ जुलै २०१९ रोजी वरील बंडखोर आमदारांविरोधात सभापतींसमोर अपात्रता याचिका दाखल करण्याचा ठराव संमत केला. प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दि. ८ ऑगस्ट रोजी सभापतींसमोर अपात्रता याचिका दाखल केली होती. सभापती राजेश पाटणेकर यांनी दि. २० एप्रिल २०२१ रोजी अपात्र याचिका फेटाळून लावली होती. या प्रकरणी चोडणकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आव्हान दिले आहे. ही याचिका न्यायमूर्ती महेश सोनक आणि न्यायमूर्ती एम. एस. जवळकर या द्वीसदस्यीय खंडपीठासमोर सुनावणीसाठी ७ जून रोजी आली असता, न्या. सोनक यांनी या याचिकेतील प्रतिवादीच्या वतीने पूर्वी बाजू मांडल्याची माहिती देऊन संबंधित याचिका आमच्यासमोर नको असल्याचे मत व्यक्त केले होते. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने संबंधित याचिकेची सुनावणीसाठी न्या. के. के. तातेड आणि न्या. पृथ्वीराज चव्हाण न्यायमूर्तींचे विशेष द्वीसदस्यीय न्यायपीठ स्थापन करून त्यांच्यासमोर ठेवली. त्यानुसार या याचिकेची सुनावणी दि. १५ रोजी होणार आहे.