कांचन

राजा रवी वर्माच्या चित्रांमधल्या स्त्रियांमध्ये जसं वात्सल्य, प्रेम , लज्जा , प्रसन्नता ओतप्रोत भरलेली होती ती प्रचिती मला कांचन मावशीकडे पाहून येते. पण आज 'कांचन 'हरवत चाललीये. स्त्रीमधली 'ती' लुप्त होत गेलीये.

Story: ललित । नेहा उपाध्ये |
05th September 2021, 10:08 pm
कांचन

लहानपणी आई मला लग्ना- मुंजीत घेऊन जायची. आईकडच्या कार्यांमध्ये तर 'ती ' हमखास असायची किंबहुना 'ती'असणार म्हणून मी जायचे. मंगल कार्यालयात पोहचल्या पोहचल्या माझी नजर भिरभिरत तिला शोधायची आणि 'ती'दिसली की तिच्यावर स्थिर व्हायची. एखाद्या खुर्चीत बसून तिचं हसणं,बोलणं पाहत बसायला मला फार आवडायचं. प्रत्येक कुटुंबात एखादी 'बेबी ' असतेच तशी 'ती '  सगळ्यांची 'बेबी' होती. तिला बेबी म्हणून हाक मारलेली मला अजिबात आवडत नसे. मी एकदा घरी येताना आईला विचारलंच "आई त्या बेबीचं नाव काय गं?" 

आई रागवत म्हणाली " ए मावशी आहे ती तुझी...बेबी काय गं म्हणतेस ."

"हो गं पण बेबी मावशीला नाव असेलच की..." मी आईला नाव ऐकण्याच्या उत्सुकतेने म्हणाले.

 "कांचन" आई म्हणाली .

"वाह! काय सही नाव ठेवलयं गं" माझ्या तोंडून आपसूक निघालं. हे नाव ऐकलं आणि 'सर्वे गुणा: कांचनमाश्रयनति' ह्या उक्तीचा एक वेगळाच अर्थ माझ्या डोळ्यांसमोर तरळून गेला. खरंच! सगळे गुण 'ह्या 'कांचनच्या ठायी आश्रयाला होते. स्त्रीसुलभ लज्जा, मृदुभाषी, लाघवी, सोज्ज्वळ , सालस या सर्व शब्दांचा अर्थबोध मला तिला पाहता क्षणी झाला. ती केतकीच्या फुलासारखी होती, नाजूक आणि सोनेरी कांती. तिच्या 'नावातला' गुण पुरेपूर तिच्यामध्ये उतरला होता. तिने नेसलेल्या  साड्यांपासून ते कानात घातलेल्या कुड्यांपर्यंत मला सगळंच स्तिमित करून टाकत असे. त्यात तिचं ते हळू आवाजातलं बोलणं आपसूक घरंदाज आणि नम्र व्हायचं. आवाज अगदी मंजूळ आणि बोलणं ऐकत रहावं अश्यातला नव्हता पण राजा रवी वर्माच्या चित्रांमधली एखादी स्त्री चित्रामधून जिवंत होऊन आपल्यासमोर उभी राहिली तर तिच्या सौंदर्यापुढं तिचा आवाज ऐकण्याची इच्छा होईल काय? तसंच ती काय बोलते ह्याला माझ्या लेखी महत्त्व नव्हतं, ती कशी बोलते हे मला प्रिय होतं. तिच्या आवाजाने कधी वरचा सा गाठलाच नसवा. 

" आई ,कांचनमावशी आपल्या मुलांना कध्धी कध्धी रागवत नसेल ना. "

आई म्हणाली " आई म्हटलं की ती  मुलांना रागावणारच मग ती कुणीही असू दे ".

छे! आईचं हे स्पष्टीकरण जरी खरं असलं तरी माझ्या मनाला ते खरं मानायला जड जात होतं. कांचन मावशी कधीही रागवत नाही ही माझ्या मनाची मी समजूत घातली. एवढे सुंदर तिचे अर्धोन्मीलित डोळे  कधी कुणावर वटारले असतील ? अशक्य ! कविंना भुरभुरणारे केस वेड लावत असले तरीं तिने काळ्याभोर केसांचा बांधलेला आंबाडा आणि त्यात डाव्या बाजूला खोचलेला एक गुलाब दिलखेचक होता.

 एकविसाव्या शतकात अश्या स्त्रिया मी फक्त टिकल्यांच्या पाकिटावर आणि काजळाच्या डबीवर पाहिल्या होत्या. आपल्यासारख्या माणसांनी दाणदाण पावलं टाकावी आणि त्याला 'चालणं ' म्हणावं पण त्या गजगामिनीची पावलं भुईला भार होऊ नये ह्याच काळजीने चालत. त्या चालण्याला एका लयीची आणि नाजूकपणाची सवय होती. त्याचा भंग होऊ नये ह्याची किती काळजी होती त्या पावलांना. 

तिच्यासमोर मला माझं चालणं अगदी बेढब वाटे. तिचं मृदू बोलणं ऐकून आपण किती कर्कश आहोत असं मला उगाचंच वाटे . राजा रवी वर्माच्या चित्रांमधल्या स्त्रियांमध्ये जसं वात्सल्य, प्रेम , लज्जा, प्रसन्नता ओतप्रोत भरलेली होती ती प्रचिती मला कांचन मावशीकडे पाहून येते. पण आज 

'कांचन 'हरवत चाललीये. स्त्रीमधली 'ती' लुप्त होत गेलीये.

आज स्त्री स्वातंत्र्याच्या आणि समान हक्काच्या नावाखाली जणू प्रत्येक मुलीवर घोर अन्याय होत आहे या भावनेच्या भरात लांबसडक केसांना कात्री लागलीच पण पुरुषी वेषाची फॅशनसुध्दा आली. ह्याला काही आक्षेप नाही बरं! पण या स्त्रीवादी हट्टात 'स्त्री ' स्वतः कधी हरवून गेली कळलंच नाही. सुबक, सोज्ज्वळ, मृदू  हे स्त्री सौंदर्य असणंच मुळी स्त्रियांना कमकुवत बनवतं हा स्त्रियांचाच दावा आहे. स्त्री ही देवाने निर्माण केलेली किती सुंदर निर्मिती. तिला सौंदर्य बहाल करताना देवाने जराही हात आखडता घेतला नाही. पण आज हे सौंदर्य  स्वतः स्त्रिया नाकारतायत ही किती दुःखाची गोष्ट. 

लाजणं, पायाच्या अंगठ्याने माती उकरणं, इश्श इत्यादी शब्दप्रयोग हा पुरातत्त्व विभागासाठी संशोधनाचा विषय झाला नाही म्हणजे मिळवलं. कारण माझ्या पिढीने हे कधी पाहिलेलं नाही आणि पुढच्या पिढीला ऐकायला तरी मिळेल की नाही याबाबत साशंकता आहे.' कांचन ' म्हणजे स्त्री सौंदर्याचा बावनकशी दागिना. पण एक ग्रॅम सोने असलेल्या आणि सोन्याहून पिवळ्या असलेल्या दागिन्यांच्या जमान्यात अस्सल दागिन्याची काय किम्मत!