तगर कळी अलबेली

सतत फुलणाऱ्या अनंत किंवा तगरीच्या फुलात हल्ली मला ओसंडून वाहताना दिसते धुकं भरली रम्य सकाळी...

Story: त्या फुलांच्या गंधकोषी । आसावरी कुलक� |
05th September 2021, 10:05 pm
तगर कळी अलबेली

चांदणं नक्षी लेऊन सजली

तगर कळी अलबेली

सुंदर तरीही सोजवळ  बाला

जोगीण जणू देवळी....

अनंत, तगर, क्रेप जास्मीन, pinwheel flower (म्हणजे भोवऱ्यासारखी) किंवा Tabernemontanadivaricata अशी नावं घेऊन बसलेलं एक सदाबहार फूल.  काही फुलांचं कसं असतं ना, की ती इतकी सवयीची असतात, त्यांचं सौंदर्य बघायला फार कुणी जात नाहीत. म्हणजे अगदी गृहीत धरली जातात.  म्हणजे बायकांना माळण्यासाठी लागणाऱ्या फुलांचं कोण कौतुक होतं, पण या फुलांना फार कुणी विचारत नाही. एखाद्या नटमोगरीच्या कृत्रिम रंगवलेल्या सौंदर्याची तोंडभरून तारीफ होते, पण घरात असलेल्या सतत राबूनही नैसर्गिक सौंदर्याची जशी उपेक्षा होते तसेच काहीसं या फुलांचं आहे. सतत फुलतात, पसाभर मिळतात म्हणून प्रत्येक बागेत किंवा कुंपणावर यांचं स्थान अबाधित आहे. म्हणजे सुंदर म्हणून जरी फार स्तुती होत नसली, तरी घरासमोर निदान याचं झाड असावं हा अलिखित नियम आहे गोव्यातल्या बागांचा. सात्त्विक सौंदर्य म्हणजे काय हे यांना बघून कळतं.  एक पाकळीवाले किंवा डेरेदार गुच्छ सदृश्य फूल असणारे, एक पाकळी पण मध्ये पिवळसर छटा असणारे असे याचे प्रकार आहेत. डबल पाकळ्या असणाऱ्या तगराला तुलनेत जास्त महत्त्व आहे, लोक म्हणतात की याला गंध नाही, पण फार मंद सुरेख असा गंध असतो या फुलांना.

देवपूजेत मात्र अनन्यसाधारण महत्त्व आहे, भरभरून फुलत असल्यामुळे हार करून घालण्यासाठी ही फुले उपयोगी पडतात. बाकी दुसरी कुठलीही फुलं नसली तरी नुसत्या अनंत आणि तुळशीपत्राचा हार सुंदर दिसतो. शिवाय पांढऱ्या रंगाची फुलं सगळ्याच देवांना चालतात त्यामुळे पुजेसाठी म्हणून ही सररास लावली जातात. गोव्यात बायकांना केसात फुलं हवीच. मग काहीच नसलं तरी ही फुलं मग माळली जातात. डेरेदार असे आच्छादन घेऊन हे झाड वाढतं. पांढरसर बुंधा आणि हिरवीगार पानं, त्यावर सतत फुलणारी नक्षीदार फुलं यामुळे landscaping करण्यासाठी याच्या hybrid जातींचा वापर होतो, म्हणजे मी म्हणाले तसं उपेक्षित नाहीये बरं झाड!

आधी छोटे कळे हे मोत्यासारखे दिसतात आणि मग बटण असल्यासारखे थोडे मोठे होतात. हार करण्यासाठी कळ्यापासून फुलापर्यंत वापर करतात. याचा केलेला हार फारच मनमोहक दिसतो.

 सहसा ही झाडं कुंपण म्हणूनही वापरली जातात कारण एकतर डेरेदार झुडूप आणि कडू चव असल्यामुळे गुरं यांना तोंडही लावत नाहीत. त्यामुळे  गुरापासून धोका नसल्याने आतली बागही सुरक्षित रहाते.

रस्त्याच्या बाजूने असल्यामुळे तशीही मग ती सार्वजनिक होतात (तसंही काही लोकांना आसपासच्या सर्व परसदारात डल्ला मारल्याशिवाय पूजा पूर्ण झाल्याचं समाधानच नसतं) आणि भरपूर  फुलत असल्यामुळे या डल्ला मारण्यावर फारसा आक्षेप घेत नाहीत कुणी. तसंही काही वर्षांपूर्वी गावात फुलावरून तरी कुणी एकमेकांशी भांडत नसत. अनंत, जस्वांद, रुद्राक्ष, कंडे, कण्हेर, शंकर , देवचाफा, कोरंटी इत्यादी फुले तशी सार्वजनिकच असत, अजूनही आहेत. 

कुणीही यावे आणि टिकली मारून जावे अशी अवस्था. गुलाब, जाई, जुई, मोगरी, डबल अनंत, रतन अबोली, डेलिया ही फुले मात्र आतल्या बाजूने लपवून लावलेली असतात, यांच्या चोरीवरून महाभारत होते बऱ्याच वेळा.

असो तर मुद्दा असा की, अशी ही सोज्ज्वळतेचं प्रतीक असलेली फुले सौंदर्याच्या वर्णनापासून मुकतात. हवीहवीशी, पण विशेष काळजी नसलेली फुले. या झाडांना बघताना पुलंच्या वल्ली मधला नारायणच येतो डोळ्यापुढे.

 झेंडू, शेवंती यांची आवक तशी कमी असायची पूर्वी. त्यामुळे देवकार्याला अनंतचा हार हवाच! मध्ये कसा कुणास ठाऊक त्याच्या छोट्या कळ्यांना केसात सजवायचा ट्रेंड आला.  व्हाट्सऍप, फेसबुक नसतानाही तो "ओहह viral" ट्रेंड होता. छोट्या कळ्यांना सागरवेणीत रचलं जायचं किंवा  आंबाड्यावर सजवलं जायचं. अगदी मोती लावल्यागत वाटायचं आणि केशरचना सुंदर दिसायची. नंतर बाजारात कृत्रिम मोती मिळायला लागले आणि कळ्यांचा वापर कमी झाला.

पण मागच्या दोन ते तीन वर्षात पुन्हा या अनंताच्या कळ्यांची सुंदर फाती केसात माळायचा ट्रेंड आलाय. दक्षिणेकडे बायका बरेच प्रयोग करतात गजरे फात्या बनवायला. गोव्यातील देवळाभोवती बसणाऱ्या  बायका विविध प्रयोग फात्यांचे करतात. खास करून फोंडा महालातील देवळाकडे या सुबक रचलेल्या फात्या बघायला मिळतात. पण आता हा ट्रेंड पुन्हा viral झालाय. अनंताचे बारीक कळे उलीमध्ये बांधून छान आंबड्यावर माळले जातात. काहीजण रंग मारून, कलबुत लावून, सेटिंन रिबन, रंगीत कागद लावून हे सजवतात. इतकी सुरेख दिसते ही फाती! मोत्यांची सर फिकी वाटते याच्यासमोर.  ही कला ज्या बायकांना येते त्यांनाही डिमांड आलाय हल्ली. कळ्यांचा वापर करून वेगवेगळे दागिने बनवणंही छान जमतं काहींना.

अस्मादिकांची नजर बायांनी माळलेल्या फुलावरच असते तशीही. घामाच्या धारा ओतत असताना आणि वैतागवाण्या गर्दीत काल एक ललना केसात फाती घालून दिसली आणि अनंताची अनंत रूपं आठवली.

लहानपणी कुठल्याही सणासुदीला यांचे वेगवेगळ्या पद्धतीने मी माळा करायचे. सरस्वती पूजनाला गच्च गुंफून छान हार तयार करुन त्यात वेगवेगळे बाकीचे फुलरंग वापरून त्याला कसं सुंदर करायचं याची चढाओढ चालायची.

बॉंगे कळे घेऊन त्यांचा हार, फुलांचा देठ काढून हार असे विविध प्रकार आम्ही करायचो. घरात मला म्हणायची सगळी, "तू काही नाही तरी फुलकारीण होऊ शकतेस देवळा बाहेर!" मी रहाते त्या कॉलनीत बाकी काही नसलं तरी यांचे सगळे प्रकार उपलब्ध आहेत. पावसाळ्यात किंवा दंवभरल्या सकाळी यांचा वास नाकात गेला की लहानपणी निगुतीने केलेली पूजा आठवत रहाते. केस धुवून टॉवेलमध्ये गुंडाळून, परडी घेऊन ही फुलं खुडायची(आशा काळे  जयश्री गडकर sस्टाईल) अगदी तसंच बसून छान ओवायची आणि श्रद्धेनं घालायची देवाला. किती निरागस बालपण नाही का?   खरंतर वेगवेगळ्या फुलांनी देवघराची आरास केली, की त्या येत रहाणाऱ्या मंद सुगंधात उदबत्तीचा वास मिश्र होतो. मंद तेवणाऱ्या  समईच्या प्रकाशात आणि आपल्या श्रद्धेत खरा देव डोकावतो. मूर्ती हे प्रतीक असतं आपल्या समाधानासाठी असलेलं. त्या सात्विक सौंदर्यात ठायी ठायी वाहत रहातं देवत्व.

सतत फुलणाऱ्या अनंत किंवा तगरीच्या फुलात हल्ली मला ओसंडून वाहताना दिसते धुकंभरली रम्य सकाळी...