बाबा नव्हेच माझा प्रिय सखा...

माझ्या बाबांना जाऊन आज नऊ महिने पूर्ण झाले तरीही ती घटना कालच घडली आहे असे वाटून मन भरून येते. माझ्या बाबांचा देहांत हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झाला. एका क्षणाने आमचे अवघे जीवन बदलून गेले. आमच्या काळजाचा तुकडा हरपल्याने आम्ही नुकतीच फुलत असलेली फुलेही गळून पडलो.

Story: माझे बाबा । आकांक्षा अनंत नाईक |
05th September 2021, 09:57 pm
बाबा नव्हेच माझा प्रिय सखा...

झे बाबा म्हणजेच कै. अनंत तुकाराम नाईक होय. कासारवर्णे गावात गरीब कुटुंबात जन्मलेले माझे बाबा संस्कारसंपन्न होते. लहानपणीच त्यांच्या बाबांचे छत्र हरपल्यामुळे घरातील सगळी जबाबदारी बाबांनी आपल्या खांद्यावर घेतली. त्यांनी कसेबसे दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. मोठ्या बहिणीचे आणि भावाचे त्यांनी लग्न लावून दिले. नंतर त्यांना त्यांच्या भावोजीची म्हणजेच नारायण रघुनाथ सावंत यांची मदत मिळाली. बाबांना १९९१ मध्ये पर्वरी कदंबा महामंडळात कंडक्टर म्हणून नोकरी मिळाली अन् हलाखीचे दिवस हळूहळू ओसरू लागले. कामावर ते सर्वांचे एनटीच होते व याच नावाने त्यांना सगळेजण ओळखायचे. 

१९९६ मध्ये बाबांच्या जीवनाचा कायापालट झाला कारण या वर्षी बाबांच्या प्रत्येक सुखदुःखात त्यांना साथ देणारी सहचारिणी मिळाली. त्या दोघांचा संसार म्हणजे दुधात साखरच.

माझे बाबा मनाने अगदी निर्मळ, सगळ्यांना हवेहवेसे, सगळ्यांना मदत करणारे, त्यांनी कधीच कुणाचं वाईट केलं नाही अथवा कुणाला वाईट शब्द दिला नाही. असे म्हणतात की माणसाचा स्वभाव त्यांच्या आचरणात दिसतो आणि बाबांचा स्वभावही त्यांच्या वागण्यात दिसायचा. माझ्या बाबांचा चेहरा नेहमी हसत. कित्येक जण म्हणायचे "तुमच्या घरात सगळ्यांचे चेहरे अगदी हसत असतात त्यामुळे तुमचं घर खूप प्रसन्न वाटतं."

बाबांना आम्ही तिघी मुलीच. परंतु त्यांनी आम्हाला कधीच काहीही कमी केलं नाही. आपल्या मुलींनी भरपूर शिकावं हीच त्यांची इच्छा होती. मुलींच्या शिक्षणासाठी काहीही कमी पडू नये यासाठीच त्यांचे सतत प्रयत्न असायचे. ते आम्हाला तळहाताच्या फोडासारखे जपायचे.

बाबा आमच्यासोबत आमचा सगळ्यात जवळचा मित्र, एक सखा, एक मार्गदर्शक म्हणून राहायचे. आमच्या आयुष्यातील कोणतीही घटना आम्ही पहिल्यांदा ती बाबांना सांगायचो. बाबाही घरी आल्यावर आपल्या कामावरील सगळ्या गोष्टी आम्हांला सांगायचे. एखादा सामाजिक अथवा राजकीय विषय घेवून आम्ही चर्चा करायचो. माझ्या आईला आम्ही भांडतो की काय असे वाटायचे अन् ती आमच्यावर चिडायची. अनेक गोष्टींवर आम्ही बाबांसोबत महाचर्चा करायचो. कधी सर्वांना एकत्र सुट्टी असल्यास आम्ही सर्वजण मिळून खेळायचो. या लॉकडाऊनमध्ये तर आम्ही सगळ्यांनी मिळून अनेक पदार्थ केले होते. शेव, केक, चकल्या, लाडू इत्यादी बाबा शेंगदाण्याची चिकी तर फार मस्त बनवायचे. बाबांच्या हाताला एक वेगळीच चव होती.

बाबा आम्हाला कधीच 'नाही' अथवा 'नको' म्हणत नव्हते. आम्ही मित्र-मैत्रिणींसोबत  फिरायला जायचो परंतु का जातात? कुठे जातात? असे प्रश्न न विचारता सांभाळून चला. लोकांच्या नजरा चांगल्या नसतात जरा जपून, स्वतःची काळजी घ्या, उशीर झाला तर फोन करा असे सांगायचे व हवे तेवढे खर्चासाठी पैसे द्यायचे. ते आमची तोंडावर कधीच स्तुती करत नव्हते. पण आमच्या यशात ते फार समाधानी होते. त्यांना आम्ही त्यांचा मुली आहोत याचा गर्व असायचा. 

आमचे एक लहानसे दुकान होते आता काही कारणास्तव ते बंद झाले. दुकानावर जो तो माणूस बाबांकडून उदारीवर सामान न्यायचा आणि बाबा त्यांना द्यायचे. असे करून आजही कित्येक माणसांनी उदारीचे पैसे दिले नाहीत. आपण मात्र कधी कुणाचे पाच पैसे सुद्धा उसने घेत नसत आणि कुणाच्या उपकारात राहत नसत. माणसाने आपलं अंथरूण पाहून पाय पसरावेत, आपल्याकडे काही नसलं तरीही चालेल पण दुसऱ्याकडे हात पसरू नये. माणसाने 

कधीही कुणावर विसंभून राहू नये असे ते नेहमी आम्हाला सांगायचे. 

बाबांना कुणीही गरीब माणूस दिसला तर त्याला ते जेवण द्यायचे. घरातील आमच्या वापरायच्या वस्तू पण काढून मोठ्या मनाने द्यायचे. असे माझे बाबा खूप दानशूर होते.                                              

आमच्या भागात मोपाविमानतळ प्रकल्प, आयुष प्रकल्पाचे काम मोठ्या जोमाने सुरू आहे त्यामुळे बाहेरच्या राज्यातून बरेचसे लोक आमच्या भागात वास्तव्यास आहेत. बाबा त्यांना ओळख नसताना देखील मदत करायचे. घरातील सामान द्यायचे, नारळ, स्टोव्ह वगैरे वस्तू द्यायचे.

माझे बाबा तसे विसरभोळेच. त्यांना व्यक्तींची नावं कधीही आठवत नसत. "हा मिळाला होता" असे घरी येवून सांगायचे मग बाबांना नेमकी कोण व्यक्ती सापडली होती हे आम्ही अचूक ओळखायचो. बाबांना बोलताना "ते हे असे झाले" अशी म्हणायची सवय होती पण आम्हाला ते अचूक समजायचे.

बाबांना बाहेरचं जेवण कधीच आवडत नसायचं. त्यामुळे आई त्यांना डबा घरून द्यायची. पण डब्यातील जेवण बाबा एकटा कधीच जेवत नव्हता आपल्या पार्टनर ड्रायव्हरला जे काही नेलेलं असायचं ते द्यायचा व आपण मात्र राहिलेलं थोडेसं जेवायचा. कुणी कधीही घरी पाहुणे आले तर त्यांचा पाहुणचार बाबा यथातथ्य करायचे. मासे, चिकन आणून आईला ते बनविण्यास सांगायचे.

बाबांना काहीही झालं तरी त्रास आम्हाला व्हायचा. एके दिवशी त्यांच्या पायाला काच लागली अन् खूप रक्त आले. मी त्यांच्या सोबत रुग्णालयात गेले खरे परंतु त्यांचा रक्तस्त्राव बघून मला चक्कर आली. जाताना बाबा पेशंट होते येताना मात्र बाबांनी मला पेशंटसारखं घरी आणलं.

मी स्वभावाने थोडी रागीट आहे परंतु माझा राग शांत करायला केवळ बाबांनाच जमायचा. बाबा नेहमी म्हणायचे, "आपण असू तोवर तुझं हे रुसनं नंतर नवरा करणार नाही हा असे लाड त्यामुळे रागावर नियंत्रण ठेव". माझे बाबा म्हणजे माझ्यासाठी सर्वस्वी होते. बाबांची सर दुसऱ्या कुणाला लागणार नाही. कुणी तरी म्हटले आहे, "चार दिन भी कोई दुसरा नही निभा सकता, जो किरदार बाप पुरी जिंदगी निभाता हैं"

आपल्या मुलींनी खूप स्ट्राँग असावं. जरी कितीही मोठी वादळे आमच्या जीवनात आली तर आम्ही डगमगू नये असे त्यांना नेहमी वाटायचे. त्यामुळे ते आम्हाला सगळ्या गोष्टी सांगून कणखर बनायचे. त्यावेळी त्यांनी सांगितलेल्या गोष्टीचे महत्त्व तेवढे पटत नव्हते परंतु आता त्यांची किंमत कळते. 'जो आवडे सर्वांना तोचि आवडे देवाला' माझ्या आयुष्यातील बाबारुपी देव नशिबाच्या दुर्दैवाने माझ्यापासून हिरावला खरा परंतु त्यांनी दिलेली शिकवण त्यांची आठवण आमच्यात जिवंत आहे अन् कायम राहणार. आज बाबा आमच्या सोबत नाही हे वास्तव स्विकारणे मनाला थोडे कठीण जाते पण ते स्वीकारल्याशिवाय गत्यंतर नाही. वेळ कुणासाठी थांबत नाही वेळेबरोबर माणसाने स्वतः ला सावरून पुढे गेले पाहिजे. बाबांच्या शिकवणीमुळेच  आम्ही एवढा मोठा दुःखाचा डोंगर खांद्यावर पेलून उभे आहोत. बाबांनी आपलं सगळं आयुष्य आमच्यासाठी, आमच्या सुखासाठी घालवलं आता बाबांना आम्ही काहीतरी देण्याची वेळ आलेली आहे. बाबांचा आशीर्वाद कायम आमच्यासोबत आहे आणि बाबांच्या बळावरच आम्ही त्यांची प्रत्येक स्वप्न पूर्ण नक्कीच करू.....