सरपंचांवरील अविश्वास पंचायतीबाहेर मंजूर

पाळे शिरदोणमधील अजब प्रकार, चोरीच्या तक्रारीमुळे कार्यालयाला टाळे

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
31st July 2021, 01:18 Hrs
सरपंचांवरील अविश्वास पंचायतीबाहेर मंजूर

पाळे शिरदोण पंचायतीबाहेर सरपंच जगदीश गावस यांच्याविरुद्ध अविश्वास ठरावावर चर्चा करताना सदस्य.
पणजी : पाळे-शिरदोण पंचायत कार्यालयात चोरी झाल्याची तक्रार सरपंच जगदीश गावस यांनी पोलिसांत दिल्याने, पोलिसांनी पंचायतीला टाळे ठोकले. त्यामुळे सचिवांनी कार्यालयाबाहेर व्यवस्था करून सरपंचांविरोधातील अविश्वास ठरावावर मतदान घेतले. यामध्ये ४ विरुद्ध ० मतांनी सरपंच गावस यांच्यावरील हा ठराव संमत करण्यात आला.विविध कारणांनी सरपंच जगदीश गावस यांच्याविरोधात पंचायत सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता. या ठरावावर शुक्रवारी चर्चा करून मतदान होणार होते. मात्र, तत्पूर्वीच पंचायत कार्यालयाचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत होते. त्यामुळे सरपंच गावस यांनी पंचायत कार्यालयात चोरी झाल्याची तक्रार दाखल केली. जेव्हा सचिव सकाळी कार्यालयाजवळ आले तेव्हा पोलिसांनी त्यांना कार्यालयात जाण्यापासून अडवले. त्यांना दरवाजा उघडू दिला नाही. शेवटी कार्यालयाबाहेरच व्यवस्था करून सरपंचांविरोधातील अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला.

पाळे-शिरदोण येथील अजब प्रकाराचे पडसाद लगेच विधानसभा अधिवेशनातही उमटले. सकाळच्या सत्रात अधिवेशनाच्या सुरुवातीलाच आमदार विजय सरदेसाई यांनी यावर आक्षेप घेतला. तेव्हा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी याची चौकशी करण्याचे आश्वासन सभागृहाला दिले. दरम्यान, यामध्ये या प्रकारात स्थानिक आमदाराचा हात असल्याचा आरोप गोवा फॉरवर्डने केला आहे.