प्रतिनिधी। गोवन वार्ता
मडगाव : फातोर्डा परिसरातील मारुती इको गाडीचे सायलेन्सर चोरी करण्याच्या प्रकरणात मुंबई येथून अटक करून आणलेल्या तिन्ही संशयितांना न्यायालयात हजर केले असता, त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणी संशयितांचा मडगाव व मायना कुडतरी पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या चोरी प्रकरणात सहभाग असल्याचा संशय असल्याने त्या दृष्टीनेही चौकशी केली जाणार आहे. सायलेन्सर चोरीच्या रॅकेटमधील तिघांना महाराष्ट्रातील कळवा पोलिसांच्या साहाय्याने फातोर्डा पोलिसांनी अटक केली आहे. संशयित शमशुद्दीन शाह, शमशुद्दीन खान व सद्दाम खान हे तिघेही सराईत गुन्हेगार असल्याचे दिसून आले आहे. महाराष्ट्रातील विविध भागांतूनही त्यांनी सायलेन्सरची चोरी केलेली आहे. इको गाडीच्या सायलेन्सरमधील विशिष्ट प्रकारच्या धातूसाठी संशयित चोरी करत होते. पोलीस निरीक्षक कपिल नायक यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.