‘ऑपरेशन मुस्कान’ मुळे खुलले हास्य

Story: वाचक पत्रे |
31st July 2021, 12:30 am

घरात भांडण होणे, गर्दीत हरवणे, मुंबईचे आकर्षण या आणि अशा अनेक कारणांमुळे महाराष्ट्रातील अनेक मुले मुंबईत दाखल होतात. कुटुंबाशी ताटातूट झालेली ही मुले मबईतील रस्त्यांवर, फूटपाथवर, रेल्वे स्टेशन, बस स्टॉपवर भटकत असतात. भीक मागून पोटाची खळगी भरत असतात. यातील काही मुले वाम मार्गाला लागतात तर काही मुले असेच अनाथ म्हणून भटकत असतात. या अनाथ मुलांना पुन्हा स्वगृही पाठवण्यासाठी मुंबई पोलिसांनी ऑपरेशन मुस्कान नावाची एक अत्यंत स्तुत्य मोहीम  सुरू केली  आहे. या मोहिमेअंतर्गत मागील तीन वर्षात १०, १४९ मुलांना त्यांच्या कुटुंबाकडे पाठवण्यात आले आहे. मागील महिन्यांत म्हणजे जून महिन्यात  राबवण्यात आलेल्या ऑपरेशन मुस्कान मोहिमेत ठाणे पोलिसांनी ४३ मुली व २१ मुले अशा एकूण ६४ अल्पवयीन मुलांचा शोध घेत या मुलांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिले आहे विशेष म्हणजे शोधलेल्या मुलांमध्ये पोलीस ठाण्यात नोंद नाही अशीही काही मुले मुली आहेत. या ऑपरेशन मुस्कानमुळे हजारो बालकांच्या आणि त्यांच्या पालकांच्या  चेहर्‍यावर हास्य फुलले आहे. ही मोहीम अतिशय स्तुत्य आणि अनुकरणीय अशी आहे.  ही मोहीम राबणार्‍या पोलीस दलाचे जितके कौतुक करावे तितके कमी आहे. पोलिसांनी हजारो मुलांना अनाथ होण्यापासून आणि वाममार्गाला लागण्यापासून वाचवले आहे. ही मोहीम सुरू करणार्‍या अधिकार्‍यांना आणि सर्व पोलीस कर्मचार्‍यांना  मनापासून धन्यवाद द्यावे लागेल. ऑपरेशन मुस्कान ही मोहीम फक्त मुंबई पुरतीच मर्यादित न राहता राज्यातील सर्व महानगरात राबवायला हवी म्हणजे अनाथ, बेघर झालेल्या लाखो मुले स्वगृही परततील आणि स्वगृही परतणार्‍या त्या मुलांच्या आणि पालकांच्या चेहर्‍यावर हास्य फुलेल.

— श्याम ठाणेदार,  पुणे