चीनशी संगनमत करून पाकची तालिबानला मदत

Story: विश्वरंग /सुदेश दळवी |
31st July 2021, 12:07 am
चीनशी संगनमत करून पाकची तालिबानला मदत

अमेरिकेने अफगाणिस्तानमधून सैन्य माघारी बोलावण्याचा निर्णय घेतल्यानंतर आशियातील आंतरराष्ट्रीय राजकारणाचे संदर्भ बदलत आहेत. पाकिस्तानने एकीकडे चीनसोबतचे संबंध दृढ करायला सुरुवात केली आहे, तर दुसरीकडे अफगाणिस्तानमध्ये आपले दहशतवादी पाठवण्याचा सिलसिलाही बंद केलेला नाही. भारत या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे. एकीकडे दहशतवादाविरोधात लढण्यासाठी पाकिस्तान हा चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीसोबत आपली ताकद वाढवत असल्याचे चित्र आहे. चीन हा आपला नैसर्गिक मित्र असल्याचे सांगत पाकिस्तानकडून चिनी सैन्याच्या स्थापनादिनी कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे, तर दुसरीकडे तालिबानच्या मदतीसाठी दहशतवादी पाठवणेही पाकिस्तानने सुरूच ठेवले आहे. त्यामुळे पाकिस्तान भारताविरोधात ताकद एकवटण्यासाठी चीनला जवळ करत असल्याचे आणि दुसरीकडे तालिबानसोबत संबंध अधिक दृढ करत असल्याचे पहावयास मिळत आहे.                  अमेरिकेच्या सैन्याने अफगाणिस्तानमधून टप्प्याटप्प्याने माघार घेण्यास आरंभ केल्यापासून तालिबानला चेव चढला आहे. अद्याप अमेरिकेचे सैन्य पूर्ण मागे फिरलेही नाही, तोच तालिबानने अफगाणिस्तानच्या ८५ टक्के भूभागावर नियंत्रण मिळाल्याचा दावा केला आहे. यातून तालिबानचा अफगाणिस्तानवर आजही किती प्रभाव आहे, हे दिसून येते. अफगाणिस्तानमधील सरकार तालिबानच्या वाढत्या प्रभावासमोर हतबल असल्याचे दिसून येत आहे. अफगाणिस्तानचे पंतप्रधान अश्रफ घनी यांचेही तालिबानच्या दहशतीपुढे काहीएक चालत नसल्याचे चित्र आहे. अमेरिकेच्या सैन्याने माघार घेण्यास आरंभ केल्यानंतर अल्पावधीतच तालिबानने केवळ अफगाणिस्तानमध्येच दहशत परवली असे नाही, तर पाकिस्तान आणि चीन यांच्याशी सलगी वाढवून आतंकवादाचे जाळे आणखी घट्ट विणले आहे. भारतासाठी ही सर्वांत मोठी डोकेदुखी आहे. तालिबान आणि चीन यांच्यात युती झाल्यास, त्याचे वाईट परिणाम भारताला भोगावे लागतील, हे लक्षात घेऊन सरकारने वेळीच डावपेच आखणे राष्ट्रासाठी हिताचे आहे.                  अफगाणिस्तानमधील तालिबान या कट्टर जिहादी आतंकवादी संघटनेच्या एका गटाने मुल्ला अब्दुल गनी बरादर याच्या नेतृत्वाखाली चीनमध्ये जाऊन त्या देशाचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांची नुकतीच भेट घेतली. यावेळी अब्दुल गनी याने अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर कोणत्याही देशाच्या सुरक्षेच्या विरोधात होऊ देणार नाही, असे चीनला आश्वस्त करत तालिबानने चीनशी एकप्रकारे हातमिळवणी केली आहे. चीन सध्या तालिबानसोबत आपले संबंध सुधारत असून अफगाणिस्तानमध्ये तालिबानची संभाव्य सत्ता लक्षात घेऊन चीनने आपले व्यापारी आणि लष्करी हितसंबंध जोपासायला सुरुवात केली आहे. तर पाकिस्ताननेही तालिबानशी जवळीक वाढवली आहे. त्यामुळे आगामी काळात भारतासमोर अधिक आव्हाने निर्माण होण्याची शक्यता आहे.