स्वराज्याचे जनक लोकमान्य टिळक

“स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच,” असा स्वराज्याचा मंत्र सर्वांना देण्यासाठी सतत झटणारे, झुंजार महापुरुष म्हणजेच लोकमान्य टिळक. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!

Story: सौ. सरिता नंदा माजिक (केरी-सत्तरी) |
31st July 2021, 12:04 am
स्वराज्याचे जनक लोकमान्य टिळक

विश्वविख्यात इंग्रजी नाटककार शेक्सपियर यांनी थोर माणसाचे तीन वर्ग कल्पिले आहेत. ते म्हणतात, काही माणसं जन्मतःच थोर असतात, काही माणसं कर्तृत्व व तपश्चर्या यांच्या बळावर थोर होतात, तर काही माणसांवर केवळ थोरपणा लादला जातो. रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली गावी जन्मलेले लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची गणना पहिल्या वर्गात होते. असामान्य बुद्धिमत्ता, निर्भय वृत्ती आणि कुठल्याही अन्यायापुढे मान न झुकविण्याचा बाणेदारपणा या गुणांमुळे टिळक नेहमी इतर मुलांपेक्षा वेगळेच वाटायचे. लहानपणीच वार, तिथी, ऋतु, सण ,नक्षत्रे, श्लोक आणि शुभंकरोती हे सर्व टिळक तीन वर्षाचे होईपर्यंत तोंडपाठ म्हणत होते. त्याचबरोबर संस्कृत भाषा, अमरकोश, समासचक्र, रुपावली अशा अनेकांमध्येही त्यांची बुद्धिमत्ता चमकत होती. गणितातील निपुणता, बुद्धिमता तर खूपच आश्चर्यकारक होती. वर्गात गुरुजींनी घातलेले कुठलेही अवघड गणित तर ते तोंडीच सोडवायचे. बुद्धिमत्तेचेबरोबरच सत्यपणा आणि स्पष्टवक्तेपणाही हा गुण तितक्याच प्रखरतेने त्यांच्याजवळ होता आणि म्हणूनच “मी शेंगा खाल्ल्या नाहीत, तेव्हा मी त्यांची शिक्षा घेणार नाही.” अशा तऱ्हेने लहानपणापासूनच अन्यायाविरुद्ध लढण्याचा टिळकांचा स्वभाव होता. आपल्या आजोबांकडून १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धाच्या कहाण्या ऐकल्या होत्या. तात्या टोपे, नानासाहेब पेशवे, झाशीची राणी यांच्या कथा ऐकून त्यांच्या मनात स्वातंत्र्याबद्दलचे विचार रुजू लागले. आपल्या भारतीय लोकांवर अन्याय अत्याचार होत आहेत हे त्यांनी जाणले. काहीही करून आपल्या देशाला पारतंत्र्यातून मुक्त करायचे आहे आणि त्यासाठी मला शिकायचे आहे आणि म्हणून त्यांनी शपथ घेतली की, “मी चाकरी करीन ती भारतमातेची, विद्यादेवतेची. विद्येच्या बळावरच मी भारतमातेला स्वतंत्र करण्याचा प्रयत्न करीन.” आणि म्हणूनच त्यांनी पारतंत्र्यात असलेल्या समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न केला. आणि देशभक्तीचे बीज भारतीयांमध्ये रुजविण्याचे अविरत प्रयत्न केले आणि यासाठी त्यांनी पहिल्यांदा आपल्या भारतीय संस्कृतीवर आधारित शैक्षणिक संस्थांची निर्मिती करण्याचे ठरवले. यासाठी त्यांनी गोपाळ गणेश आगरकर, विष्णुशास्त्री चिपळूणकर यांची मदत घेतली.

टिळकांकडे एक महत्त्वाचा गुण होता तो म्हणजे, एखादी गोष्ट त्यांनी करायचे ठरवले की ते ती गोष्ट साध्य होईपर्यंत आपल्या जिवाचा आटापिटा करायचे आणि म्हणूनच तर त्यांनी ब्रिटीशांच्या विरोधात बुलंद आवाज काढला. “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच” ही त्यांनी शपथ घेतली. ही शपथ जणू काही सगळ्या भारतीयांसाठी एक ऊर्जास्रोत बनले आणि संपूर्ण भारत स्वराज्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध पेटून उठला. भारतवासीयांमध्ये स्वत्व जागृत करून स्वराज्य स्थापन करण्याच्या 

कार्यात वाहून घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला. आपले जीवन आपल्या भारतमातेसाठी खर्ची घातले.

१९०८ साली लोकमान्य टिळकांनी ब्रिटिश सरकारविरुद्ध अनेक क्रांतिकारक चळवळीची सुरुवात केली.  “राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे” किंवा “ सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?” असे अग्रलेख लिहून त्यांनी ब्रिटिश सरकारवर अगदी प्रखर टीका केली आणि अशासाठी त्यांना अठरा महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा देण्यात आली.

 १९०५ च्या बंगालच्या फाळणीला त्यांनी तीव्र विरोध केला आणि यातूनच त्यांनी विविध स्वदेशी चळवळी सुरू केल्या. यानंतर स्वदेशीचे आंदोलन उग्र बनत गेले. विदेशी वस्तूवर लोक बहिष्कार टाकत असत. ठिकठिकाणी विदेशी कपड्यांची होळी होऊ लागली. स्वदेशी, स्वराज्य, बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण हे पवित्र शब्द टिळकांनी लोकांना शिकवले.

टिळकांनी केलेली क्रांती म्हणजे भारतातील लोकांच्या मनात स्वदेशाबद्दल प्रेम निर्माण करणे आणि पारतंत्र्यबद्दल असंतोष. टिळकांनी केसरीमध्ये “देशाचे दुर्भाग्य” या लेखामध्ये लिहिले होते, “देशात बॉम्ब ची निर्मिती व्हावी हे देशाचे दुर्दैव होय. परंतु ते तयार करून फेकावे असे वाटण्याजोगी परिस्थिती शासनानेच निर्माण केली आहे”. केसरीतून असा जळजळीत लेख लिहून टिळकांनी सरकारवर कडाडून टीका केली आणि या लेखाबद्दल देशद्रोहाचा आरोप ठेवून त्यांना अटक करण्यात आले व त्यांना सहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षेसाठी ब्रह्मदेशातील मंडाले येथील तुरुंगात पाठवण्यात आले. पण तिथेही टिळक गप्प बसले नाहीत. मंडाले येथील तुरुंगात एकांतवास सुसह्य व्हावा म्हणून ते सतत वाचन व लेखन करीत बसत. आणि तेथेच त्यांनी “गीतारहस्य” हा अतिशय विद्वत्तापूर्ण ग्रंथ लिहिला. “भारतीय असंतोषाचे जनक” असलेल्या टिळकांनी ४ जानेवारी १८८१ रोजी “केसरी” आणि २ जानेवारी रोजी “मराठा” असे दोन साप्ताहिक सुरू केले. त्यातील “केसरी” मराठीत आणि “मराठा” हे इंग्रजीत होते. केसरीच्या माध्यमातून स्वातंत्र्यप्राप्तीसाठीची स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण ही  चतु: सूत्री दिली. वृत्तपत्राचे  महत्व विशद करताना ते एके ठिकाणी म्हणतात’ “वृत्तपत्र म्हणजे रस्तोरस्ती रात्री दिवे लावलेले असल्याने व पोलिसांची गस्त सारखी फिरत असल्याने उपयोग होत असतो तोच उपयोग वर्तमानपत्रकर्त्यांची  लेखणी नेहमी चालू असल्याचे होत असतो.” आणि अशाच धारदार लेखणीसाठी त्यांना “अग्रलेख लेखनाचे जनक” ही म्हटले जाते. 

 देशासाठी स्वराज्याचा पाया घालून देणारे शेवटपर्यंत स्वराज्याचा मंत्र सर्वांना देण्यासाठी सतत झटणारे तसेच आयुष्याचा प्रत्येक क्षण, प्रत्येक श्वास देशासाठी अर्पण करणारे असे दृष्टा नेता होणेच विरळ. टिळक जरी शरीराने आज आपल्यामध्ये नसले तरी त्यांच्या भव्य दिव्य असीम कृतीमुळे ते अजरामर झाले आहेत. आणि म्हणूनच त्यांच्याविषयी म्हणावं लागतं.               

“थोर महात्मे होऊन गेले 

चरित्र त्यांचे पहा जरा 

आपण त्यांच्या सम व्हावे 

हाच सापडे बोध खरा” ......