ममतांचा दिल्ली दौरा

शरद पवार आणि सोनिया गांधी यांना आजाराने ग्रासले आहे, राहुल गांधी अद्याप परिपक्व नाहीत, प्रियंका यांना आत्मविश्‍वास नाही, असे चित्र पुढे आणून ममता बॅनर्जी आपले घोडे पुढे दामटतील, असेच वाटते.


31st July 2021, 12:02 am

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नुकताच दिल्ली दौरा केला आणि तीन वर्षांनी होणार असलेल्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपविरोधात एकत्रित लढण्यासाठी काय करता येईल याची चाचपणी केली. त्यांना त्यात कितपत यश आले हे आताच सांगणे तसे कठीण आहे. एक मात्र खरे की त्यांना आपल्या राज्यात मिळालेले यश त्यांची प्रतिमा उंचावणारे ठरले आहे. अतिशय कठीण वाटणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपला ज्याप्रकारे हरविले, ते पाहून देशवासीय अचंबित झाले. याचा लाभ घेत ममता बॅनर्जी आता राष्ट्रीय स्तरावर येण्याची तयारी करीत आहेत. पश्चिम बंगालमध्ये कॉंग्रेसला अपयश आले असले तरी या पक्षाचे अन्य काही राज्यांत प्रस्थ आहे. त्यामुळे इतर कोठल्याही पक्षापेक्षा हा पक्ष देशव्यापी आहे, याची खात्री ममता बॅनर्जी यांना आहे. त्यामुळे आपले युवक कॉंग्रेसमधील जुने सहकारी कमलनाथ आणि आनंद शर्मा यांच्याशी असलेल्या जवळकीचा लाभ घेत त्या कॉंग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांना आपल्या क्षमतेचा प्रत्यय आणून देण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांनी दिल्लीत मागेच सोनिया, राहुल आणि प्रियंका यांची एकत्र भेट घेऊन चर्चा केली होती हे सर्वश्रुत आहे. असे असले तरी नेतृत्वाच्या शर्यतीत त्या टिकतील का, हा खरा प्रश्न आहे. शरद पवार आणि सोनिया गांधी यांना आजाराने ग्रासले आहे, राहुल गांधी अद्याप परिपक्व नाहीत, प्रियंका यांना आत्मविश्वास नाही, असे चित्र पुढे आणून ममता बॅनर्जी आपले घोडे पुढे दामटतील, असेच वाटते.

ममता बॅनर्जी यांना निवडणुकीत मदत करणारे प्रशांत किशोर सध्या कॉंग्रेसच्या वळचणीला गेले आहेत. त्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा उफाळून आली आहे, ते कदाचित कॉंग्रेसचे उपाध्यक्षपद मिळवतील, असा कयास आहे. नपेक्षा अहमद पटेल यांच्याप्रमाणे सल्लागाराची भूमिका बजावतील. मात्र नेतृत्वबदलाची अथवा पूर्णवेळ अध्यक्षांची मागणी करणारे २३ नेते त्यांना स्वीकारतील का, हा प्रश्न आहे. ममता बॅनर्जीनी आघाडीचे नेतेपद मागितले, तर मग शरद पवार का नकोत, हा मुद्दा समोर येऊ शकतो. पवारांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चांगले संबंध आहेत, हे लपून राहिलेले नाही. त्यामुळे मोदींना कडवा विरोध करायचा तर ममताच पाहिजेत असा विचार पुढे येऊ शकतो.

विरोधकांची आघाडी करण्यासाठी ममता बॅनर्जींनी यापूर्वीही पुढाकार घेतला होता. २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत विरोधक एकत्र आले नाहीत, त्यामागची कारणे आजही बदललेली नाहीत. कॉंग्रेसवर त्यांचा विश्वास असला किंवा कॉंग्रेसला त्यांच्याबद्दल भरवसा वाटत असला तरी, देशातील अन्य नेत्यांनाही हे मान्य व्हायला हवे. डावे पक्ष केरळमध्ये कॉंग्रेसशी टक्कर देत आहेत, पश्चिम बंगालमध्येही तीच स्थिती आहे. तृणमूल कॉंग्रेसने तेथे डाव्यांना नामशेष केले आहे. जगनमोहन रेड्डी, चंद्रशेखर राव, तेजस्वी यादव, अखिलेश यादव, अरविंद केजरीवाल यांना कॉंग्रेससोबत नेणे किती अवघड आहे, याची कल्पना ममता बॅनर्जींना नसेल असे कसे म्हणता येईल? असे असले तरी भाजप आणि मोदी यांना संयुक्तपणेच हरवावे लागेल, असा त्यांचा ठाम विश्वास आहे. ममता बॅनर्जी या केवळ पश्चिम बंगालच्या नेत्या आहेत. त्यांनी हिंदीतून बोलण्याचा सराव केला असला तरी उत्तर भारतात त्यांना अथवा तृणमूल कॉंग्रेसला स्थान नाही. पण राजकारणात काहीही होऊ शकते, हे देवेगौडा अथवा इंद्रकुमार गुजराल यांनी दाखवून दिले आहे. तीच महत्त्वाकांक्षा ठेवून ममता यांनी दिल्ली दौरा केला आणि मोठा अवधी शिल्लक असतानाही त्या प्रयत्न करीत आहेत, असेच दिसून आले.

तसे पाहाता, ममता यांची राष्ट्रवादी कॉंग्रेसशी आणि द्रमूकशी जवळीक आहे. शरद पवार आणि स्टॅलिन यांच्याशी त्यांचा संपर्क आहे. याच कारणामुळे त्यांच्या नावाला महत्त्व प्राप्त झाले आहे. शरद पवारांशी चर्चा केल्यानंतर प्रशांत किशोर यांनी प्राप्त केलेले वजन कॉंग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण करू शकले, हे लक्षात घेता नेमका हाच हेतू साध्य केलेले किशोर भविष्यात आपली खेळी खेळतील, त्यावेळी त्यांच्या पटलावर ममता बॅनर्जी कुठे असतील याची कल्पना सध्या तरी करणे अशक्य आहे. २०१४ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी आणि भाजपला मदत केल्यानंतरही आपली अवहेलना झाली, याची खंत असलेले प्रशांत किशोर यांची पुढील चाल ही विरोधकांना एकत्र आणणारी असेलच, मात्र नेतृत्वाबाबत ते कॉंग्रेसच्या बाजूने झुकतील, कारण तोपर्यंत ते त्या पक्षाचा भाग बनलेले असतील. त्यामुळे विरोधकांचे राजकारण कोणते वळण घेते हे केवळ वर्षानंतरच स्पष्ट होईल. ममता बॅनर्जी यांनी प्रारंभ तर केला आहे. त्यांचे जहाज कोणत्या बंदराला लागते, ते भविष्यात दिसेलच.