केरळमध्ये २४ तासांत २० हजारांपेक्षा अधिक बाधित


30th July 2021, 10:45 pm
केरळमध्ये २४ तासांत २० हजारांपेक्षा अधिक बाधित

कोची : शुक्रवारी सलग चौथ्या दिवशी केरळमध्ये करोना विषाणूच्या संसर्गाचे २० हजाराहून अधिक रुग्ण आढळले आणि ११६ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात संक्रमणाचे प्रमाण १३.६१ टक्के आहे.
राज्य सरकारच्या एका प्रसिद्धीपत्रकात असे म्हटले आहे की संक्रमणाची २०,७७२ नवीन प्रकरणे आल्यानंतर संक्रमित लोकांची एकूण संख्या ३३,७०,१३७ वर पोहोचली आहे. ११६ रुग्णांच्या मृत्यूबरोबर मृतांचा आकडा १६,७०१ वर पोहोचला आहे. १४,६५१ जण संसर्गातून बरे झाल्यानंतर एकूण बरे झालेल्यांची संख्या वाढून ३१,९२,१०४ झाली आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या १,६०,८२४ आहे.
केरळ सरकारनुसार, गेल्या २४ तासांत १,५२,६३९ नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. संसर्गाचे प्रमाण १,६०,८२४ टक्के आहे. आतापर्यंत २,७०,४९,४३१ नमुन्यांची चाचणी घेण्यात आली आहे.
देशात २४ तासांत ४४ हजार रुग्ण
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासांत देशभरात ४४ हजारांहून अधिक प्रकरणे नोंदली गेली आहेत. त्यापैकी २२ हजार प्रकरणे एकट्या केरळमधील आहेत. या काळात ५५५ मृत्यूंपैकी ११६ मृत्यू केरळमध्ये झाले आहेत. केरळच्या परिस्थितीमुळे सतत तीन दिवस सक्रिय प्रकरणेही वाढत आहेत