अंतिम टी-२०मध्ये भारताला नमवत श्रीलंकेचा मालिका विजय


29th July 2021, 11:40 pm
अंतिम टी-२०मध्ये भारताला नमवत श्रीलंकेचा मालिका विजय

कोलंबो : तिसऱ्या व अंतिम टी-२० सामन्यात यजमान श्रीलंकेने भारतीय संघाचा ७ गडी राखून पराभव करत तीन सामन्यांची मालिका २-१ने आपल्या नावावर केली. भारताच्या ८२ धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या लंकेने १४.३ षटकांत ३ गडी गमावून लक्ष्य गाठले.

या श्रीलंका दौऱ्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय भारताने २-१ने आपल्या नावावर केली तर टी-२० मालिका यजमान श्रीलंकेने जिंकून दौऱ्याची अखेर विजयाने केली. भारताचा मुख्य संघ इंग्लंड दौऱ्यावर असल्याने भारताचा युवा संघ या दौऱ्यावर पाठवण्यात आला होता. एकदिवसीय मालिका जिंकल्यांतर टी-२० मालिकेत उतरलेल्या भारतीय संघाला करोनाचा फटका बसला. कृणाल पांड्या करोनाबा​धित आढळल्यानंतर भारताने अखेरच्या दोन सामन्यात युवा खेळाडूंना उतरवले. अखेरच्या दोन सामन्यात भारत तब्बल सहा गोलंदाज संघात घेऊन खेळला.

श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या टी -२० सामन्यात भारतीय युवा फलंदाजी पूर्णपणे कोसळली. यजमान संघाच्या फिरकीपटूंसमोर भारत ८ बाद ८१ धावा करू शकला. भारताने एका टप्प्यावर ३६ धावांवर पाच विकेट गमावल्या होत्या आणि ७४ च्या आधी टी -२० क्रिकेटमधील त्यांच्या सर्वात कमी धावसंख्येपर्यंत डाव अटोपण्याचा होण्याचा धोका होता. परंतु सातव्या क्रमांकावर आलेल्या कुलदीप यादवने नाबाद २३ धावा केल्या आणि भारताला या संकटातून वाचवले. 

भारताच्या डावादरम्यान फक्त चार चौकार ठोकले आणि एकही षटकार ठोकला नाही. भारताच्या टी -२० इतिहासात प्रथमच अशी वेळ आली आहे की, पूर्ण २० षटके खेळल्यानंतरही भारतीय फलंदाज षटकार मारू शकले नाहीत.

केवळ पाच तज्ज्ञ फलंदाजांसह खेळत भारताने पॉवरप्लेमध्ये आपल्या वरच्या फळीतील फलंदाज गमावले. या सामन्यात शिखर धवनसारखा अनुभवी खेळाडू चालला नाही किंवा ऋतुराज गायकवाड, देवदत्त पडिकल, नितीश राणा सारखे नवे खेळाडू चमकले नाहीत. आपला २४ वा वाढदिवस साजरा करणारा श्रीलंकेचा फिरकीपटू वनिंदू हसरंगा भारताच्या खराब स्थितीला जबाबदार होता. त्याने अवघ्या ९ धावांत चार गडी बाद केले. पहिल्याच षटकात त्याने भारताचे दोन गडी बाद करत परिस्थिती आणखी बिकट केली. 

भारतीय संघ या सामन्यात बदल घेऊन आला होता. वेगवान गोलंदाज नवदीप सैनी दुखापतीमुळे बाहेर झाला होता, त्यानंतर संदीप वॉरियरने त्याच्या स्थानावर आंतरराष्ट्रीय टी-२०मध्ये पदार्पण केले.

नाणेफेक जिंकून भारताचा कर्णधार शिखर धवनने फलंदाजीचा निर्णय घेतला. पण सामन्याच्या चौथ्या बॉलवरच त्याला दुश्मंता चामिराने स्लिपमध्ये धनंजय डी सिल्वाच्या हाती झेलबाद केले. दुसरा आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या पडिकलने चौकार मारून चांगली सुरुवात केली पण रमेश मेंडिसच्या चेंडूवर तो पायचित झाला. स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न करताना तो विकेट्सच्या समोर सापडला. या दरम्यान, धाव घेण्याचा प्रयत्न करताना तो धावबादही झाला. देवदत्त पडिकल १५ चेंडूत नऊ धावा करून माघारी परतला. संजू सॅमसनने पुन्हा निराशा केली आणि तीन चेंडू खेळल्यानंतर हसरंगाच्या चेंडूवर पायचित झाला. ऋतुराज गायकवाडदेखील दोन चेंडूनंतर त्याच प्रकारे बाद झाला. त्याने दोन चौकार लगावत १४ धावा केल्या.

अशाप्रकारे पॉवरप्लेच्या पहिल्या पाच षटकांत भारताने २५ धावांत चार विकेट गमावल्या. शेवटचा तज्ज्ञ फलंदाज नितीश राणा याची शिकार श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने केली. त्याने स्वतःच्या गोलंदाजीवर झेल घेऊन राणाचा डाव संपवला. त्याने सहा धावा केल्या. भुवनेश्वर कुमार आणि कुलदीप यादव यांनी सहाव्या विकेटसाठी १९ धावांची भर घातली. १६ धावा केल्यावर भुवी हसरंगाचा तिसरा बळी ठरला.