श्रीलंंकेचा रोमहर्षक विजय; टी-२० मालिका १-१ने बरोबरीत

धनंजय डि सिल्वाची नाबाद ४० धावांची झुंजार खेळी : कुलदीप यादवचे २ बळी


29th July 2021, 12:31 am
श्रीलंंकेचा रोमहर्षक विजय; टी-२० मालिका १-१ने बरोबरीत

धनंजय डि सिल्वा

कोलंबो : भारत विरुद्ध श्रीलंका दुसरा टी-२० सामना श्रीलंकेने ४ विकेट्सनी जिंकत मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. या सामन्यात भारताला आपल्या संघात मोठा बदल करावा लागला होता. जवळपास भारताची तिसरी टीम या सामन्यात खेळली. पण, त्यांनीही लंकेला शेवटच्या षटकापर्यंत झुंजवले.
श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करत भारताला १३२ धावांत रोखले. भारताकडून कर्णधार शिखर धवनने सर्वाधिक ४० धावा केल्या. तर लंकेकडून अकिला धनंजयाने भेदक मारा करत २ विकेट घेतल्या. भारताचे १३३ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या लंकेला भारतीय युवा गोलंदाजांनी चांगलाच घाम फोडला. अखेर धनंजय डि सिल्वाने नाबाद ४० धावांची झुंजार खेळी करत सामना श्रीलंकेकडे झुकवला. भारताकडून कुलदीप यादवने ३० धावात २ बळी घेतले.
श्रीलंकेची खराब सुरुवात
भारताने ठेवलेल्या १३३ धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेने सावध सुरुवात करण्याचा प्रयत्न केला. पण, भुवनेश्वर कुमारने आक्रमक अविष्का फर्नांडोला बाद करत लंकेला पहिला धक्का दिला. फर्नांडो बाद झाल्यानंतर समरविक्रमा आणि मिनोद भानुका यांनी डाव सावरत लंकेला ६ षटकात ३६ धावांपर्यंत पोहचवले. मात्र त्यानंतर वरुण चक्रवर्तीने ८ धावांवर खेळणाऱ्या समरविक्रमाला बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर आलेल्या कर्णधार दसुन शनकाला फारसे काही करता आले नाही. तो ३ धावांची भर घालून माघारी परतला. त्याला कुलदीप यादवने बाद केले.
मिनोद भानुका एका बाजूने किल्ला लढवत होता. त्याला भुवनेश्वर कुमारने ३४ धावांवर जीवनदान दिले. पण, त्याच षटकात कुलदीप यादवने त्याला ३६ धावांवर बाद करत लंकेला चौथा आणि मोठा धक्का दिला. त्यानंतर राहुल चाहरने हसरंगाला १५ धावांवर बाद करत लंकेला पाचवा धक्का दिला. याच दबावात रमेश मेंडीस २ धावांवर बाद झाला.
दरम्यान, धनंजय डि सिल्वाने एकाकी झुंज देण्यास सुरुवात केली. दरम्यान १९ वे षटक टाकणाऱ्या अनुभवी भुवनेश्वर कुमारला करुणानरत्नेने षटकार मारत दबावात आणले. भुवनेश्वरने टाकलेल्या या षटकात श्रीलंकेने १२ धावा वसूल केल्या. आता लंकेला शेवटच्या षटकात विजयासाठी ८ धावांची गरज होती. मात्र, त्यांनी ४ चेंडूतच ८ धावा घेत सामना जिंकला आणि मालिकेतील आव्हान कायम ठेवले.
......
संक्षिप्त धावफलक :
भारत : २० षटकांत ५ बाद १३२ धावा
श्रीलंका :१९.४ षटकांत ६ बाद १३३ धावा      

...............

आजचा सामना
स्थळ : आर. प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो.
वेळ : रात्री ८.०० वा.
थेट प्रक्षेपण : सोनी स्पोर्ट्स नेटवर्क