सिंधूची मेडलची आशा कायम

सलग दुसऱ्या सामन्यामध्ये हाँगकाँगच्या चीयूंग नगनचा पराभव


29th July 2021, 12:28 am
सिंधूची मेडलची आशा कायम

पी.व्ही. सिंधू
टोकियो : टोकियो ऑलिम्पिकमधील भारताची पदकाची प्रबळ दावेदार बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू हिची विजयी कामगिरी सुरू आहे. सिंधूने बुधवारी सकाळी झालेल्या दुसऱ्या लढतीमध्ये हाँगकाँगच्या चीयूंग नगन हिचा २१-९, २१-१६ अशा सरळ गेममध्ये पराभव केला आहे. टोक‌ियोत भारताच्या अन्य बॅडमिंटनपटूंनी मात्र निराशा केल्यानंतर सिंधूच्या या विजयाने फॅन्सना दिलासा मिळाला आहे.
या सामन्यामध्ये पहिल्या गेमममध्ये दोन्ही खेळाडूंनी सुरुवात सावध केली. पहिल्या गेममध्ये स्कोर २-२ असा बरोबरीत होता. त्यानंतर अनुभवी सिंधूने खेळ उंचावला. तिने हाँगकाँगच्या खेळाडूला कोणतीही संधी न देता पहिला गेम २१-९ असा मोठ्या फरकाने जिंकला. १५ मिनिटे चाललेल्या पहिल्या सेटमध्ये हाँगकाँगच्या गँन यीकडून अनेक चुका झाल्या. याचा सिंधूने पुरेपूर फायदा घेत पहिल्याच सेटमध्ये सामना आपल्या बाजूने फिरवला.
दरम्यान, दुसऱ्या सेटमध्ये हाँगकाँगच्या चेंन गँन हिने चांगली वापसी केली. त्यामुळे पी.व्ही. सिंधूला तगडी फाईट द्यावी लागली. दुसऱ्या सेटमध्ये चीयूंगने २-६ अशी पिछाडी भरून काढली आणि एक पॉईंट्सची आघाडी देखील मिळवली. त्यानंतरच्या टप्प्यातही चीयूंगने चांगला प्रतिकार केला. एका क्षणी दोन्ही खेळाडू १४-१४ अशा बरोबरीत होत्या. मात्र, सिंधूच्या प्रतिहल्ल्यापुढे चीयूंग फार कमाल करू शकली नाही. सिंधूने शेवटच्या टप्प्यात सर्वोत्तम खेळ करत दुसरा सेट २१-१६ अशा फरकाने आपल्या नावे केला. एकूण ३५ मिनिटे चाललेला हा सामना सिंधूने २१-९, २१-१६ अशा फरकाने जिंकला. महिला एकेरीच्या ग्रुप स्टेज सामन्यात सलग दुसरा विजय मिळवत सिंधूने नॉकआउट फेरीत प्रवेश केला आहे.दरम्यान, गेल्या रियो ऑलिम्पिक स्पर्धेत सिल्व्हर मेडलची कमाई करणाऱ्या सिंधूचा या ऑलिम्पिकमधील दुसरा विजय आहे. सिंधूने पहिल्या फेरीत इस्रायलच्या पोलीकरपोवाचा २१-७, २१-१० असा दोन सरळ गेममध्ये पराभव केला होता.

बी साईप्रणीथचा सलग दुसरा पराभव
भारताचा पुरुष एकेरीचा १३ वा मानांकित बॅडमिंटन खेळाडू बी साई प्रणीथ ऑलि‌म्पिक स्पर्धेतून बाहेर पडला आहे. टोकिया ऑलिम्पिकमध्ये प्रणीथला सर्वोत्तम कामगिरी करता आली नाही. ४० मिनिटे चाललेल्या या सामन्यात नेदरलँड्सच्या मार्क कालजोव्हने सरळ गेममध्ये प्रणीथचा १४-२१, १४-२१ असा सलग दुसरा पराभव केला. कालजोव्हने गटातील अव्वल स्थान गाठून बाद फेरी गाठली.