पूजा राणीची उपांत्यपूर्व फेरीत धडक

पदार्पणाच्या सामन्यात अल्जेरियाच्या चायबवर ५-० वर्चस्व


29th July 2021, 12:26 am
पूजा राणीची उपांत्यपूर्व फेरीत धडक

पूजा राणी
टोकियो : ऑलिम्पिकच्या पदार्पणातच भारतीय मुष्टियोद्धा पूजा राणीने ७५ किलो वजनी गटात खेळताना बुधवारी अल्जेरियाच्या इचराक चायबला पराभूत करून टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. ३० वर्षीय पूजाने दहा वर्ष कनिष्ठ असलेल्या प्रतिस्पर्ध्यावर ५-० असे वर्चस्व गाजविले.
दोन वेळच्या आशियाई विजेत्या पूजाने उजव्या हाताने जबरदस्त ठोसे लगावत सामन्यावर नियंत्रण राखले व रिंगमधील चायबच्या असंतुलनाचाही तिने बराच फायदा उचलला. चायबसुद्धा प्रथमच ऑलिम्पिकमध्ये खेळत होती. परंतु, ती राणीच्या जोरकस ठोशांना प्रत्युत्तर देऊ शकली नाही, परिणामी तिन्ही फेऱ्यांमध्ये राणीनेच वर्चस्व गाजविले. राणीने सुरक्षित अंतर ठेवून कौशल्यपूर्ण खेळाचे प्रदर्शन केले. चायबने जोरदारपणे आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. परंतु, ती अपयशी ठरली. कारण मुख्य भागावर तिला लक्ष्य साधता आले नाही.
३० वर्षीय पूजा तिच्या सर्वोत्तम फॉर्मात आहे. मे महिन्यात झालेल्या आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत तिने सुवर्णपदक जिंकले होते. तत्पूर्वी मार्चमध्ये तिने विश्वविजेती अथेन्या बायलनवर सरशी साधली होती. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तिने रौप्यपदक पटकावले होते.
राणीचा ऑलिम्पिकपर्यंतचा प्रवास संघर्षपूर्ण आहे. आजपर्यंतच्या कारकिर्दीदरम्यान तिच्या खांद्याला दुखापत झाली होती व दिवाळीच्या सुट्टीत तिचा हात जळला होता. शिवाय तिला आर्थिक मदतीशिवाय आपली वाटचाल सुरू ठेवावी लागली. बॉक्सिंग हा खेळ आक्रमक लोकांसाठी आहे, म्हणून पोलिस अधिकारी असलेल्या तिच्या वडिलांनाही तिला प्रोत्साहन द्यावेसे वाटले नाही. मार खावा लागेल, असे तिचे वडील म्हणायचे, असे तिने एकदा वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ऑलिम्पिकपर्यंतच्या प्रवासाबद्दल सांगितले होते.
पुढील सामना जिंकल्यास पदक निश्चित
टोकियो ऑलिम्पिकमध्ये पहिल्या सामन्यात विजयी ठरल्याने पूजा राणीचा उपांत्यपूर्व फेरीतला प्रवेश निश्चित झाला असून, ती पदकाच्या अगदी जवळ पोहोचली आहे. पूजा राणी ३१ जुलै रोजी चीनची तिसरी रँक प्राप्त ली कियानसोबत सामना खेळणार आहे. आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकवण्याच्या प्रवासात या चिनी बॉक्सरला पूजाने दोनवेळा पराभूत केले आहे. ३१ रोजीच्या सामन्यात पूजाने ली कियानविरुद्ध विजय नोंदवला, तर तिचे टोकियो ऑलिम्पिकमधले पदक निश्चित आहे.