तिरंदाज दीपिका कुमारीचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

तरुणदीप रायचा इस्रायलकडून दुसऱ्या फेरीत पराभव, प्रवीण जाधवचे आव्हान संपुष्टात


29th July 2021, 12:12 am
तिरंदाज दीपिका कुमारीचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

दीपिका कुमारी
टोकियो : ‍जागतिक क्रमवारीतील प्रथम क्रमांकाची तिरंदाज दीपिका कुमारीने बुधवारी अमेरिकेच्या किशोरवयीन जेनिफर मुसिनो-फर्नांडिजला ६-४ ने पराभूत करून टोकियो ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या वैयक्तिक तिरंदाजी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. याबरोबरच दीपिकाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या पदकाच्या आशा कायम राखल्या आहेत. मात्र, तिचे साथीदार तरुणदीप राय आणि प्रवीण जाधवचे दुसऱ्या फेरीतच आव्हान संपुष्टात आले.
युमेनोशिमा पार्कमध्ये झालेल्या या वैयक्तिक तिरंदाजी स्पर्धेत दीपिकाला सुरुवातीला दबाव जाणवला होता, कारण तिने रेड-झोनमध्ये लक्ष्य साधले. तिने पहिला सेट एका गुणाने गमावला. परंतु, नंतर तिने दहा गुणांचे सलग तीन सेट जिंकत ४-२ अशी आघाडी घेतली. मात्र, ती चौथ्या सेटमध्ये अपयशी ठरली. तिचे काही लक्ष्य चुकले. अमेरिकेच्या १८ वर्षीय जेनिफरने ४-४ ने बरोबरी साधत हा सेट २५-२४ ने जिंकला. पाचव्या सेटमध्ये दीपिकाने दमदार सुरुवात करीत बाजी मारली. जेनिफरला विजयासाठी अखेरच्या संधीत दहा गुण मिळविण्याची गरज होती. प‍रंतु, तिचे नऊ लक्ष्य चुकले.
तत्पूर्वी, दीपिकाने सलामीच्या सामन्यात भूतानच्या कर्मावर ६-० ने विजय मिळवून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला होता. जागतिक क्रमवारीत १९३ क्रमांकावर असलेल्या कर्माने तीन सेट्समध्ये २३, २३ व २४ गुणांची नोंद केली. तर दीपिकानेही मंदगतीने सुरुवात करीत प्रत्येक सेटमध्ये प्रत्येकी २६ गुणांची नोंद करून अंतिम ३२ खेळाडूंमध्ये स्थान मिळविले.
मराठमोळ्या प्रवीण जाधवचा पराभव
ऑलिम्पिकमध्ये पदार्पण करणाऱ्या सांगली येथील प्रवीण जाधवने सलामीच्या फेरीत द्वितीय विश्वमानांकित गॅलसन बाझरहापोव्हला पराभवचा धक्का देत शानदार सुरुवात केली. परंतु, दुसऱ्या फेरीत जाधवला विश्वविजेत्या ब्रॅडी एलिसनकडून पराभव पत्करावा लागला. याबरोबरच त्याचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. पहिल्या फेरीच्या सामन्यात २५ वर्षीय प्रवीणने सर्वोत्तम खेळाचे प्रदर्शन करीत रशियन ऑलिम्पिक समितीच्या बाझरझापोव्हला सरळ सेटमध्ये हरविले. परंतु, तो आपला प्रभावी फॉर्म कायम ठेवू शकला नाही. पुढील दुसऱ्या फेरीत प्रवीणला जागतिक अव्वल क्रमांकाचा तिरंदाज अमेरिकेच्या एलिसनकडून पराभव स्वीकारावा लागला.

प्रवीण जाधवचा वरिष्ठ सहकारी तरुणदीप रायसुद्धा दुसऱ्या फेरीत पराभूत झाला. चुरशीच्या सामन्यात त्याला इस्त्रायलच्या इटाय शेनीकडून पराभव स्वीकारावा लागला. सामन्याच्या प्रारंभी उभय प्रतिस्पर्धींनी ५-५ अशी बरोबरी साधली होती. परंतु, रायपेक्षा १५ वर्षांनी लहान असलेल्या शेनीने अचूक लक्ष्य साधत १०-९ असा सामना जिंकला. तीन वेळा ऑलिम्पिकमध्ये खेळणारा राय सलग दोन वेळा दुसऱ्या फेरीतून बाद झाला.