सोनू यादव मृत्यूप्रकरणी पाच जणांवर आरोप निश्चित करण्याचा आदेश जारी

९ ऑगस्टला होणार पुढील सुनावणी


29th July 2021, 12:15 am

प्रतिनिधी। गोवन वार्ता      

पणजी : सांताक्रुझ येथील इम्रान बेपारी याच्या घरावर हल्ला करणाऱ्या टोळीतील सोनू यादव याचा गोळी लागून मृत्यू झाला होता. या प्रकरणी उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयाने संशयित मार्सेलिन डायस याच्यासह ५ जणांवर आरोप निश्चित करण्याचा आदेश जारी केला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ९ ऑगस्ट रोजी होणार आहे.      

या प्रकरणी जुने गोवा पोलिसांनी पणजी येथील प्रथमवर्ग न्यायालयात मुख्य संशयित मार्सेलिन डायस याच्यासह ५ जणांवर सुमारे ३०० पानी आरोपपत्र दाखल केले होते. त्यात पोलिसांनी सुमारे ४० हून अधिक साक्षीदारांची जबानी नोंद केली होती.      

न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, सांताक्रुझ येथील इम्रान बेपारी याच्या घरावर २० जून २०२० रोजी पहाटे ३ ते ३.३० दरम्यान पूर्ववैमनस्यातून २० ते २५ बुरखाधारी युवकांनी हल्ला केला होता. त्यावेळी हल्ला करणाऱ्या टोळीतील सोनू यादव याचा गोळी लागून मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले होते. या खून प्रकरणी जुने गोवा पोलिसांनी मुख्य संशयित मार्सेलिन डायस याच्यासह रॉनी डिसोझा, फ्रान्सिस नाडार, समर्थ शिरोडकर आणि मयूर आर्लेकर या पाच जणांना अटक केली होती. या खून प्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२, १२०बी व इतर कलमाखाली, तसेच शस्त्र कायद्याचे कलम ३ व ५ व इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.       

या प्रकरणी पोलिसांनी या घटनेत वापरण्यात आलेले एक पिस्तूल, दोन रिवॉल्वर, चार तलवारी आणि दोन चॉपर अशी शस्त्रे जप्त केली आहेत. या प्रकरणी पोलिसांनी प्राथमिक चौकशी केल्यानंतर पणजी येथील प्रथमवर्ग न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर हे प्रकरण उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आले. त्यानंतर या प्रकरणी सुनावणी घेऊन न्यायालयाने मार्सेलिन डायस याच्यासह ५ जणांवर आरोप निश्चित करण्याचा आदेश जारी केला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ९ ऑगस्ट रोजी होणार आहे.