महिला हॉकीत ग्रेट ब्रिटनची भारतावर ४-१ ने मात

भारतीय संघाचा सलग तिसरा पराभव : पुढील फेरीत जाण्याचा मार्ग आणखी खडतर


29th July 2021, 12:10 am
महिला हॉकीत ग्रेट ब्रिटनची भारतावर ४-१ ने मात

‍टोकियो : भारताच्या महिला हॉकी संघाला बुधवारी पराभवाचे तोंड पहावे लागले. ग्रेट ब्रिटनच्या संघाने भारतीय महिला संघाचा ४-१ च्या फरकाने पराभव केला. या पराभवामुळे भारताचा पुढील फेरीत जाण्याचा मार्ग आणखी खडतर झाला आहे. आता भारतीय महिला संघाला त्यांचे पुढील दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागणार आहेत.
भारतीय संघाचे आगामी सामने आयर्लंड आणि रिपब्लिक ऑफ साऊथ आफ्रिका संघाविरुद्ध होणार आहेत. आजच्या पराभवामुळे भारताची गोल्सची संख्या उणे ९ इतकी झाली आहे. शर्मिला देवीने पेनल्टी कॉर्नरच्या संधीचे गोलमध्ये रूपांतर करत आजच्या सामन्यात भारतातर्फे एकमेव गोल केला. ग्रेट ब्रिटनसाठी हान मार्टीनने दोन तर लिली ओस्ले आणि ग्रेस बाल्सडोनने प्रत्येकी एक असे एकूण चार गोल नोंदवले.
टोक‌ियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला संघाचा हा सलग तिसरा पराभव आहे. ओआय हॉकी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यामध्ये भारतीय संघ ग्रेट ब्रिटनच्या संघासमोर अगदीच दुबळा वाटला. सामना सुरू झाल्यानंतर ७५ व्या सेकंदाला ग्रेट ब्रिटनने आपला पहिला गोल केला. त्यानंतर भारताला गोल करण्याच्या काही संधी निर्माण झाल्या. मात्र, त्यात संघाला यश आले नाही. ब्रिटनच्या संघाची बचाव फळी फारच मजबूत असल्याने भारतीय महिला खेळाडू गोंधळताना दिसल्या. दुसऱ्या क्वार्टरमध्ये मार्टीनने संघासाठी दुसरा गोल केला. मार्टीनने पहिल्यांदा गोल करण्याचा प्रयत्न भारतीय गोलकीपर असणाऱ्या सविताने योग्य पद्धतीने आडवला. मात्र, दुसऱ्या प्रयत्नात मार्टीनला यश आले. या गोलनंतर सहाव्या मिनिटामध्ये भारताने आपला सामन्यातील एकमेव गोल नोंदवला. गुरजीत कौरने हा गोल केला.

सामन्याच्या उत्तरार्धामध्ये भारताला एकही गोल करता आला नाही. तर ब्रिटनने एक गोल नोंदवत भारतावर ४-१ च्या फरकाने विजय मिळवला. यापूर्वी भारताला सोमवारी जर्मनीने २-० ने पराभूत केले. तर त्याआधी नेदरलॅण्डने रविवारच्या सामन्यात भारताला पराभूत केल होते. आता भारताचा सामना ३० जुलै रोजी आयर्लंडसोबत तर ३१ जुलै रोजी दक्षिण आफ्रिकेसोबत होणार आहे. दरम्यान, २ ऑगस्टपासून बाद फेरीला सुरुवात होणार आहे.