ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेत नितीशची चमकदार कामगिरी


29th July 2021, 12:08 am
ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेत नितीशची चमकदार कामगिरी

नितीश बेलूरकर
पणजी : गोव्याचा बुद्धिबळपटू एफएम नितीश बेलूरकरने नॅशनल ज्युनियर ऑनलाईन २०२१ बुद्धिबळ स्पर्धेत ९वे स्थान मिळविले.  या स्पर्धेत नितीशने आयएम अरोनीक घोष विरुद्ध सलग पाच सामने जिंकले. दरम्यान, २३ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे इंटरनेट सेवा बंद पडल्यामुळे नितीश विजयापासून वंचित राहिला होता. तरीही नितीशने शेवटचे चार सामने जिंकण्यासाठी पुन्हा लढत दिली. आणि या सामन्यांत ८ वेळा विजय प्राप्त करत ८ गुणांसह ९ वे स्थान मिळविले.
या स्पर्धेत गोव्यातील अन्य खेळाडू आयुष शिरोडकर ५.५ गुणांसह ४४व्या स्थानावर, तर जॉय काकोडकर ५.९५ गुणांसह ९५व्या स्थानावर आहेत. दरम्यान, नितीश एस.एस. धेंपे कॉलेज ऑफ कॉमर्सचा इकॉनॉमिक्सचा विद्यार्थी असून जिनो फार्मास्युटिकल्सचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आहे. जीसीएचे अध्यक्ष तथा ऊर्जामंत्री नीलेश काब्राल आणि जीसीएचे सचिव किशोर बांदेकर यांनी नितीशचे नॅशनल ज्युनियर्समधील उत्कृष्ट खेळीबद्दल अभिनंदन केले आहे.