दिल खुश जहाँ.. तेरी तो मंज़िल है वहीं!

विचित्र आणि अद्भुत अशा भावनांचं करायचं तरी काय? कशा पद्धतीने आपण आपल्या भावना ताब्यात ठेऊ शकतो? भावना ताब्यात ठेवणे हे योग्य की अयोग्य? चला तर मग जाणून घेवू आपल्या भावनांविषयी.

Story: समुपदेशन । विभा आळगुंडनी |
23rd July 2021, 11:01 Hrs
दिल खुश जहाँ..  तेरी तो मंज़िल है वहीं!

आपल्या भावनांचा आपल्या जीवनावर लक्षणीय प्रभाव असतो. कधीकधी असंही वाटू शकतं की आपल्या आयुष्यात फक्त आपल्या भावना आपल्यावर राज्य करतात. आता बघा ना, सकाळपासूनच जर काही कारणास्तव आपला मूड खराब असेल तर पूर्ण दिवसात एकही काम सरळ होत नाही. पण जर आपला मूड एकदम मस्त असेल तर असं वाटतं की आज तर मी जगच जिंकून येणार! आपल्या भावना कधी कधी तर इतक्या प्रखर असतात की समोरच्या माणसावरही त्याचा प्रभाव दिसून येऊ शकतो. 

आपल्या दैनंदिन जीवनात जरी आपण असंख्य भावना अनुभवतो, तरीही प्राथमिक रित्या सहा भावना आपल्या जीवनाचा भाग असतात. त्या म्हणजे आनंद (Happiness), दुःख (Sadness), भीती (Fear), राग (Anger), आश्चर्य (Surprise), आणि तिरस्कार (Disgust). आपल्या दैनंदिन जीवनात घडत असलेल्या अनुभवांना या सहा भावना एकत्रितपणे आपल्या जीवनाला नवनवीन अर्थ देत असतात. 

आपण आपल्या आयुष्यात इतके गुंतून गेलेलो असतो की आपल्या मानसिक आरोग्याबद्दल आपण जास्त विचार करत नाही. त्यामुळे आपल्या मनात नेमकी कोणती भावना आहे हेही लक्षात येत नाही. पोटात दुखते तेव्हा आपण जसं म्हणतो "कसंतरीच होतंय", अगदी तसंच काहीसं आपल्या मनाच्या बाबतीतही होतं. तर मग अशा अनिश्चित भावनांना सामोरं कसं जायचं? 

बऱ्याच वेळा अनिश्चितता केवळ एवढ्याचसाठी असते कारण आपण अनेक भावना एकत्र अनुभवत असतो आणि आपण त्या भावनांना व्यक्त होण्यासाठी संधी देत नसतो. भावनांना व्यक्त होण्यासाठी जर वेळोवेळी संधी मिळाली नाही तर पुढे आयुष्यात त्याचे परिमाण आपल्याला भोगावे लागू शकतात. 

तर अशा अनिश्चित परिस्थितीत अथवा जेव्हा आपल्याला वेळ मिळेल तेव्हा एका क्षणासाठी डोळे बंद करून शांत राहण्याचा प्रयत्न करा. दीर्घ श्वास घेऊन ज्या ज्या भावना आपल्या मनात घर करून आहेत त्यांना बाहेर येऊ द्या. भावना एकदा बाहेर आल्या तर त्यामुळे होत असलेल्या शारीरिक प्रकटीकरणालाही सामोरे जा (उदाहरणार्थ, दुःख वाटत असेल तर रडण्यापासून स्वत: ला रोखू नका). भावना कोणतीही असो, त्याला स्वीकारण्याचा प्रयत्न करा. जर नियमितपणे आपण भावनांशी एकरूप राहण्याची ही सवय जोपासली, तर आपण आपले मानसिक आरोग्य संतुलित ठेऊ शकतो आणि सुखी आयुष्य जगू शकतो.

कधी कधी आपल्या भावना लज्जास्पद असतात म्हणून आपण त्यांना आपल्या मनाच्या एका कोपऱ्यात लपवून ठेवतो. बऱ्याच काळासाठी आपण हे सतत केल्यानं होतं असं की आपल्या भावना आपल्यालाच सहकार्य करत नाहीत आणि विनाकारण आपली चिडचिड होते किंवा आपण सतत दुःखी राहतो. यामुळे नैराश्य देखील येऊ शकते. हे नैराश्यच जगातील आत्महत्येचे प्रमुख कारण आहे.

आपल्या भावनांशी एकरूप राहण्यासाठी इतर अनेक उपाय आहेत. जसे ध्यान करणे, मित्रांसोबत वेळ घालवणे, दैनंदिन जीवनात घडत असलेल्या गोष्टी शेयर करण्यासाठी एखादी डायरी लिहिणे, एखाद दुसरा छंद जोपासून आपल्या भावना त्या छंदाद्वारे व्यक्त करणे वगैरे वगैरे. पण जर वेळच मिळत नसेल तर ही छोटीशी क्रिया आपण कधीही करू शकतो. मोठ्या आणि अनिश्चित भावनांना सामोरे जाणे ही एक कठीण बाब आहे पण जर आपण अशा लहानलहान सवयी स्वतःला लावण्याचा प्रयत्न जरी केला तरीसुद्धा त्यांची मोठी मदत होऊ शकते आणि तरीही जर समाधान होत नसेल तर समुपदेशन तुमच्या मदतीला धावून येईलच याची खात्री मनाशी बाळगा. 

चला तर, स्वतःसाठी वेळ काढूया आणि भावनिकदृष्ट्या व्यक्त होऊया.