शंभर टक्के लसीकरणानंतर दहावी, बारावीचे वर्ग

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची घोषणा

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
21st July 2021, 11:57 pm
शंभर टक्के लसीकरणानंतर दहावी, बारावीचे वर्ग

डिचोली : राज्यात शंभर टक्के लसीकरण पूर्ण होताच दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू करण्यात येतील, अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली.
कोविड व्यवस्थापनात लसीकरण मोहिमेत गोवा देशात सर्वाधिक पहिला डोस घेणारे राज्य ठरले असून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत शिक्षक व संबंधित कर्मचारी यांच्यातील दोन लसींचा ८५ दिवसांचा अवधी कमी करून तो ३० दिवस करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. त्यासाठी केंद्राच्या मंजुरीची वाट पाहत आहे. तसे झाल्यास मुलांची सुरक्षा पडताळून विद्यालये व महाविद्यालये सुरू करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
राज्यातील कोविड व्यवस्थापनात मोठे यश आले असून सर्वप्रकारची खबरदारी घेताना शैक्षणिक क्षेत्रातील कर्मचारी, शिक्षक, बालरथ चालक व इतरांचे दोन्ही डोस ३० दिवसांत पूर्ण करून शैक्षणिक वर्ग सुरू करण्याचा आमचा विचार आहे. त्यादृष्टीने तयारी सुरू करण्यात आली आहे. दहावी आणि बारावी वर्ग नियमित सुरू करताना सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्याबाबत सरकार प्रयत्न करत आहे, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
राज्यातील नव्वद टक्के लोकांनी पहिला डोस घेतला अाहे. ३० जुलैपर्यंत शंभर टक्के लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. त्यामुळे ज्यांनी अजून पहिला डोस घेतला नाही, त्यांनी त्वरित तो घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केले आहे.