चाळीस कोटी लोकांना करोनाचा धोका

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून चौथ्या राष्ट्रीय सेरो सर्वेचे निष्कर्ष जाहीर


21st July 2021, 08:32 am
चाळीस कोटी लोकांना करोनाचा धोका

चाळीस कोटी लोकांना करोनाचा धोका
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून चौथ्या राष्ट्रीय सेरो सर्वेचे निष्कर्ष जाहीर
नवी दिल्ली :
देशात करोनाच्या तिसर्‍या लाटेची शक्यता वर्तवली गेलेली असताना, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मंगळवारी चौथ्या राष्ट्रीय सेरो सर्वेचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले. यामध्ये सांगण्यात आले आहे की, देशभरात मुलांसह दोन तृतीयांश नागरिकांमध्ये करोनाविरोधातील अँटीबॉडीज  विकसित झाल्याचे आढळून आले आहे. याच बरोबर, जवळपास ४० कोटी भारतीयांना करोनाचा धोका असल्याचेही समोर आले आहे.
आयसीएमआरने चौथ्या सेरो सर्वेची आकडेवारी जाहीर केली आहे. या सर्वे जून - जुलै दरम्यान करण्यात आला होता. २८ हजार ९७५ लोकांवर केल्या गेलेल्या सर्वेत ६ ते १७ वर्षे वयोगटतील मुलांचा देखील समावेश करण्यात आला होता. सर्वेमध्ये सहभागी ६७.६ टक्के लोकांमध्ये कोविड अँटीबॉडीज  आढळून आल्या आहेत, म्हणजेच ते करोना संक्रमित झाले होते.
या सर्वेमध्ये २८ हजार ९७५ लोकांना सहभागी करून घेतले गेले होते. यामध्ये ६ ते ९ वर्ष वयोगटातील २ हजार ८९२ मुले, १० ते १७ वयोगटातील ५ हजार ७९९ मुले आणि १८ वर्षा पेक्षा जास्त वय असणार्‍या २० हजार २८४ जणांचा समावेश होता.
या सर्वेमध्ये हे देखील दिसून आले की, ६ ते ९ वर्षाच्या ५७.२टक्के आणि १० ते १७ वर्षाच्या ६१.६ टक्के मुलांमध्ये करोना अँटीबॉडीज  आढळल्या आहेत. तर, १८ ते ४४ वर्षाच्या ६६.७ टक्के, ४५ ते ६० वर्षांच्या ७७.६ टक्के आणि ६० वर्षावरील ७६.७ टक्के लोकांमध्ये अँटीबॉडीज  दिसून आल्या आहेत. सर्वेमध्ये सहभागी ६९.२ टक्के महिला आणि ६५.८टक्के पुरुषांमध्ये कोविड विरोधात अँटीबॉडीज  आढळल्या आहेत. शहरी भागात राहणार्‍या ६९.६ टक्के आणि ग्रामीण भागात राहणार्‍या ६६.७ टक्के लोकांमध्ये अँटीबॉडीज  होत्या.
------------
दुसर्‍या लाटेत ऑक्सिजनअभावी एकही मृत्यू नाही
केंद्र सरकारने मंगळवारी राज्यसभेत सांगितले की करोनाच्या दुसर्‍या लाटेदरम्यान राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मृत्यूच्या कोणत्याही घटनेची नोंद केली गेली नाही.
--------------