वाढती लोकसंख्या ठरते देशाच्या विकासात अडसर

वाढत्या लोकसंख्येचा परिणाम म्हणजे वाढती बेरोजगारी, गरिबी या दोन मोठ्या समस्या ! सरकारने कितीही प्रयत्न केले, तरी प्रत्येक माणसाला रोजगार देणे अशक्यप्राय आहे.

Story: विचारचक्र । प्रा. वल्लभ केळकर |
23rd June 2021, 05:24 pm
वाढती लोकसंख्या ठरते देशाच्या विकासात अडसर

हल्लीच सत्तेवर आलेल्या आसाममधील हेमंत विश्वशर्मा सरकारने  दोन मूलं असतील तरच सरकारी योजनांचा लाभ मिळेल अशा प्रकारचा निर्णय घेतल्यानंतर देशात वातावरण ढवळून निघाले आहे.सत्तेवर स्थानापन्न होताच या सरकारने अनेक धडाकेबाज निर्णय घेताना बांगलादेशी घुसखोरांनी कब्जा केलेली जमीन खाली केली. त्याचबरोबर त्यांनी स्त्री शिक्षण,गरिबी हटवणे यावर आपले भाष्य केले, त्याचबरोबर त्यासाठी  लोकसंख्या नियंत्रण अत्यावश्यक असल्याचे सांगितले. प्रथेप्रमाणे विरोधी पक्षांनी त्यांच्यावर टीका करणे सुरू केले आहे.

आपल्या निर्णयांनी त्यांनी आपल्या देशासमोरील एका महत्त्वाच्या विषयावर सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.वेगाने वाढणारी लोकसंख्या ही आपल्या देशासमोरील खूप मोठी समस्या आहे. राष्ट्रीय समस्येचा विषय जेव्हा निघतो त्या वेळेला सर्व पक्षांनी आपले मतभेद बाजूला सारून देशासाठी निर्णय घ्यायचा असतो, परंतु आपल्या देशात राजकीय पक्षांमध्ये तेवढी प्रगल्भताच नाही, त्यामुळे चांगल्या निर्णयांना अकारण विरोध केला जातो.आसाम पाठोपाठ उत्तर प्रदेश सरकार सुद्धा अशाच प्रकारचा निर्णय घेण्यासाठी मंथन करीत आहे.स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाची लोकसंख्या झपाट्याने वाढली व सध्या आपला देश चीननंतर लोकसंख्येत दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. मोठी लोकसंख्या ही एक शक्ती असतेच परंतु त्यामुळे अनेक सामाजिक,आर्थिक,व राजकीय समस्या निर्माण होतात. लोकसंख्येची समस्या चर्चेत आली की आपली तुलना चीन बरोबर केली जाते. काही अहवालानुसार लवकरच आपला देश चीनवर लोकसंख्येच्या बाबतीत कुरघोडी करणार आहे. क्षेत्रफळानुसार चीन आपल्यापेक्षा तीन पटीने मोठा आहे. कोणतीही कारणे असू,राष्ट्राचा विचार ज्यावेळेला येतो त्यावेळी चीनची पूर्ण जनता सरकारच्या मागे उभी राहते,जी गोष्ट आपल्याकडे दिसून येत नाही.अमर्याद वाढलेल्या लोकसंख्येमुळे प्रत्येक क्षेत्रात असमतोल निर्माण होतो.ज्या देशांतील लोकसंख्या जास्त तेच देश अविकसित,गरीब राहिले आहेत व ज्या देशात लोकसंख्या कमी ते देश आज विकसित झाले आहेत.आज आपल्या देशाचा विचार करता अजून पर्यंत आपल्या देशातील करोडो लोकांना निवाऱ्याची सोय झाली नाही,अजून लोकांसाठी स्वच्छ पाणी मिळू शकत नाही.लोकसंख्या विस्फोट हा आपल्या देशाच्या विकासात मोठा अडथळा आहे.लोकसंख्या वाढीमुळे बेरोजगारी,गरिबी वाढत आहे,जमिनीचे क्षेत्र कमी आणि लोकसंख्येची घनता जास्त आहे.पर्यावरण,तसेच नैसर्गिक स्रोतांवर खूप विपरीत परिणाम होत आहेत. लोकसंख्येचा हाच वेग कायम राहिल्यास आपल्यावर खूप मोठे संकट ओढवणार आहे.आज संपुर्ण जग कोरोनाचा सामना करीत असताना,मर्यादित लोकसंख्या असणाऱ्या देशांनी या संकटावर मात केली आहे,परंतु अवाढव्य लोकसंख्या असल्यामुळे,उपचार,लसीकरण,यासाठी आपणाला खूप जास्त वेळ लागणार आहे.त्यामुळे भविष्यात अशा अनेक संकटावर मात करण्यासाठी लोकसंख्येवर नियंत्रण ही काळाची गरज असणार आहे.आपल्या देशातील प्रमुख शहरे असलेल्या मुंबई, दिल्ली, कलकत्ता, चेन्नई, या शहरात लोकसंख्या दोन कोटींच्या पार गेली आहे.त्यामुळे या शहरात गृहबांधणी,जलव्यवस्था,स्वच्छतागृहे या गोष्टींची व्यवस्था करणे खूप मोठे आव्हान आहे.गेल्या ५० वर्षात लोकांचा गावातून शहरांत मोठा ओघ सुरू आहे,त्याचा परिणाम म्हणून शहरे बकाल बनली आहेत,वाढलेल्या झोपडपट्या, गुन्हेगारी,तसेच बेकायदेशीर वास्तव्य यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

वाढत्या लोकसंख्येचा परिणाम म्हणजे वाढती बेरोजगारी,गरिबी,या दोन मोठ्या समस्या! सरकारने कितीही प्रयत्न केले,तरी प्रत्येक माणसाला रोजगार देणे अशक्यप्राय आहे.वाढत्या गरीबीमुळे शाळा सोडण्याचे प्रमाण वाढत आहे. शिक्षण नसल्यामुळे सुद्धा लोकांचे योग्य रित्या प्रबोधन होऊ शकत नाही आणि त्याचा परिणाम म्हणून लोकसंख्येचा विस्फोट सुरूच आहे.

आज वेळ आली आहे या समस्येवर एक ठोस निर्णय घेण्याची.८० च्या दशकात चीन सरकारने एकापेक्षा जास्त मुलांवर बंदी घातली,ती बंदी काही वर्षांनी उठवून दोन मुलांची योजना बनवली,व हल्लीच तरुणांची संख्या कमी होते आहे हे लक्षात आल्यानंतर तीन मुलांना परवानगी देण्यात आली आहे.चीनने घेतलेल्या ठोस निर्णयामुळे त्यांनी आपल्या लोकसंख्येवर नियंत्रण मिळवले आहे.सध्याची परिस्थिती आणि वेग लक्षात घेता काहीच वर्षांनी भारत चीनला मागे टाकणार आहे. याबाबत चर्चा सुरू झाली की लगेच या विषयाला धर्माशी जोडला जातो.तसेच हा निर्णय मुस्लिमविरोधी असल्याचा कांगावा केला जातो. आज आपल्या देशातील राजस्थान, तेलंगणा, आंध्रप्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, उत्तराखंड, कर्नाटक, ओरिसा या राज्यांमध्ये दोन पेक्षा जास्त मुलं असल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांत निवडणूक लढवण्यास बंदी आहे.यातील काही राज्यांमधे दोन पेक्षा जास्त मूल असल्यास सरकारी सेवा मिळवण्यात प्रतिबंध केला जातो. यावरून एक गोष्ट लक्षात येते,असा निर्णय घेणार आसाम हे पहिले राज्य नाही.उलट आसामच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेली मते ही रोखठोक आहेत व त्याचबरोबर सत्य स्थिती वर्णन करणारी आहेत. काही काळासाठी का होईना लोकसंख्येच्या नियंत्रणासाठी कठोर परंतु लवचिक कायदा करण्याची नितांत गरज आहे.सर्व पक्षांनी आपले मतभेद विसरून या संकटावर मात करण्यासाठी एक राष्ट्रीय धोरण बनविले पाहिजे,किंव्हा सरकारने असा निर्णय घेतल्यास त्यांना सहकार्य केले पाहिजे.

लोकसंख्या वाढ अनेक समस्यांचे कारण आहे,वाढते प्रदूषण,वाढणारा कचरा,पृथ्वीचे वाढलेले तापमान,निसर्गाचा विनाश अशा अनेक गोष्टींमुळे मानवतेच्या अस्तित्वावर प्रशचिन्ह उभे राहणार आहे त्यासाठी आपल्या देशाचे पर्यायाने आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी निर्णय घेण्याची हीच ती वेळ आहे.त्यामुळे देशातील जनतेने सजग होऊन लोकांचे प्रबोधन करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे,त्याच बरोबर शिक्षणाचा प्रसार वेगाने झाला पाहिजे आणि जुन्या भ्रामक समजुती दूर झाल्या पाहिजेत.

आपला देश प्रचंड मोठा आहे,त्यामुळे अशा देशात कोणताही निर्णय लोकक्षोभ निर्माण करणारा होऊ शकतो.सध्या देशात  टूलकिट चा वापर करून यादवी माजवणे सुरू आहे,त्या शक्तींचा बिमोड करून ठोस आणि कठोर निर्णय हाच पर्याय आहे.