डेल्टाविरोधात पावले उचला

महाराष्ट्र, केरळ, मध्य प्रदेश या तीन राज्यांना केंद्राचा इशारा!


23rd June 2021, 02:13 am
डेल्टाविरोधात पावले उचला

डेल्टाविरोधात पावले उचला
महाराष्ट्र, केरळ, मध्य प्रदेश या तीन राज्यांना केंद्राचा इशारा!
नवी दिल्ली :
करोनाच्या दुसर्‍या लाटेचा जोर ओसरू लागलेला असताना दुसरीकडे देशात म्युकरमायकोसिसपाठोपाठ डेल्टा प्लस या करोनाच्या नव्या व्हेरिएंटचा धोका निर्माण झाला आहे. सध्या विषाणूच्या या प्रकाराचे देशात फारसे रुग्ण जरी नसले, तरी त्याची क्षमता आणि त्याच्या प्रसाराचा वेग पाहाता केंद्र सरकारने  महाराष्ट्र, केरळ आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांना तातडीने पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत.
या तीनही राज्यांमध्ये करोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचे विषाणू रुग्णांमध्ये आढळून आले असून त्यांना वेळीच आवर घालण्यासाठी केंद्राने या राज्यांना डेल्टा प्लसचे रुग्ण आढळलेल्या भागात निर्बंध किंवा तत्सम पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. यासंदर्भात केंद्रीय आरोग्य विभागाने या तीनही राज्यांच्या मुख्य सचिवांना यासंदर्भात पत्र पाठवून सतर्क केले आहे.
डेल्टा प्लस व्हेरिएंटविषयी आढावा घेणार्‍या आयएनस-सीओजी या गटाच्या अभ्यासातून आलेल्या निष्कर्षांच्या आधारावर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने डेल्टा प्लस व्हेरिएंटविषयी महाराष्ट्र, केरळ आणि मध्य प्रदेश या राज्यांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे.
केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, करोनाचा डेल्टा व्हेरिएंट भारतासह जगातल्या एकूण ८० देशांमध्ये सापडला आहे. मात्र, डेल्टा प्लस व्हेरिएंट आत्तापरर्यंत एकूण ९ देशांमध्ये आढळला आहे. यामध्ये अमेरिका, ब्रिटन, पोर्तुगाल, स्वित्झर्लंड, जपान, पोलंड, नेपाळ, चीन आणि रशिया या देशांचा समावेश आहे. भारतात डेल्टा प्लसचे एकूण २२ रुग्ण सापडले आहेत. मात्र, या २२ पैकी १६ रुग्ण महाराष्ट्राच्या रत्नागिरी आणि जळगावमध्ये आढळले आहेत. त्याशिवाय काही रुग्ण केरळ आणि मध्य प्रदेशमध्ये आढळले आहेत.

 
-------
देशातील ६ जिल्ह्यांमध्ये झाला प्रादुर्भाव
महाराष्ट्रातील रत्नागिरी आणि जळगाव, केरळमधील पलक्कड आणि पथ्थनमथित्ता, मध्य प्रदेशमधील भोपाळ आणि शिवपुरी जिल्ह्यांमध्ये करोनाचा डेल्टा प्लस व्हेरिएंट आढळून आला आहे.
-------------------------
 


यासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या तीनही राज्यांना सल्ला दिला आहे की, स्थानिक सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापनाने या व्हेरिएंटविषयी अधिक लक्षपूर्वक आणि कार्यक्षमपणे काम करणे आवश्यक आहे. आधीपासूनच या यंत्रणा व्यापक अर्थाने त्या पातळीवर काम करत असल्या, तरी डेल्टा प्लसबाबत अधित सतर्क राहण्याची गरज आरोग्य मंत्रालयाने व्यक्त केली आहे.
---------------
अधिक संसर्गजन्य
डेल्टा प्लसमध्ये एक अतिरिक्त के४१७एन हा म्युटंट आहे. हा म्युटंट डेल्टाचे (बी.१.६१७.२) रुपांतर डेल्टा प्लसमध्ये करतो. अशी शक्यता वर्तवली जात आहे की डेल्टा प्लस हा अल्फा व्हेरिएंटपेक्षा ३५ ते ६० टक्के जास्त संसर्गजन्य आहे. त्यात वेगाने संसर्ग होण्याची क्षमता असू शकते.
-------------
-------------
लसीही ठरतील निष्प्रभ
सध्या लसीकरणामुळे करोनापासून सुरक्षित राहण्यासाठी आणि मृत्यूदर आटोक्यात आणण्यासाठी फायदा होत असला तरी सतत म्युटेट होत राहणार्‍या करोना विषाणूच्या नव्या प्रकारांमुळे चिंतेत भर पडली आहे. या विषाणूमध्ये सतत होत राहणार्‍या म्युटेशनमुळे खूप बदल झालेल्या विषाणूच्या प्रकारावर म्हणजेच कॉन्स्टीलेशन ऑफ म्युटेशन असणार्‍या विषाणूवर लसीचा परिणाम होणार नाही, असे मत मारिया व्हॅन केर्कोव्ही यांनी व्यक्त केले आहे.
---------------