तीन वर्षाच्या मुलांना मिळणार नर्सरीत प्रवेश

शिक्षण खात्याकडून परिपत्रक जारी


22nd June 2021, 11:50 pm
तीन वर्षाच्या मुलांना मिळणार नर्सरीत प्रवेश

प्रतिनिधी । गोवन वार्ता
पणजी : नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार आता ३ वर्षे पूर्ण झालेल्या मुलांना नर्सरीच्या प्रथम वर्षासाठी प्रवेश दिला जाणार आहे. या विषयीचे परिपत्रक शिक्षण खात्याने जारी केले आहे.
ज्या मुलांना ३१ मेपर्यंत ३ वर्षे पूर्ण झाली आहेत, त्यांना २०२१-२०२२ या शैक्षणिक वर्षात नर्सरीत प्रवेश द्यावा, असे शिक्षण खात्याने नर्सरीचे वर्ग असलेल्या संस्थांच्या मुख्याध्यापकांना कळवले आहे. नव्या शिक्षण धोरणात प्राथमिक शिक्षणापूर्वी फाउंडेशन कोर्स आहे. त्यात केजी १ आणि केजी २ या दोन इयत्तांचा समावेश आहे. फाउंडेशन कोर्स पूर्ण झाल्यानंतर मुलाला इयत्ता पहिलीत प्रवेश मिळेल. यापूर्वी ३ वर्षे झाल्यानंतर मुले अंगणवाडी किंवा केजीत जात होती. नव्या शिक्षण धोरणात अंगणवाडीच्या शिक्षणाला फाउंडेशन कोर्स म्हटले आहे. या बदलाची या वर्षापासून अंमलबजावणी होईल, असे संकेत या परिपत्रकातून मिळत आहेत.
२०२१-२२ या शैक्षणिक वर्षात नर्सरी वर्गापासून नव्या शिक्षण धोरणाची कार्यवाही होईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आधीच जाहीर केले होते. त्याप्रमाणे नव्या शिक्षण धोरणानुसार नर्सरी प्रवेशाचे परिपत्रक जारी झाले आहे.

हेही वाचा