राज्यातील कोविडबळी तीन हजारांसमीप!

आणखी सात मृत्यू; २१८ जणांना लागण, बरे होण्याचा दर ९६.३२ टक्क्यांवर

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
22nd June 2021, 01:29 am
राज्यातील कोविडबळी तीन हजारांसमीप!

पणजी : राज्यातील आणखी सात करोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांचा आकडा २,९९७ झाला आहे. तर तब्बल सव्वादोन महिन्यांनंतर रविवार आणि सोमवारच्या चोवीस तासांत केवळ २१८ नवे रुग्ण सापडले आहेत. करोनाबाधित होण्याचा दर घटल्याने आणि बरे होण्याचा दर वाढल्याने राज्याला करोनातून मोठा दिलासा मिळाला आहे.
माजोर्डा व सां जुझे दि आरियाल येथील प्रत्येकी ५९ वर्षीय दोन, महाराष्ट्रातील ४३, पाळी येथील ७९, आणि पार्से येथील ४५ वर्षीय पुरुष तसेच खोर्ली येथील ५६ व बांदोडा येथील ७३ वर्षीय महिलेचे करोनामुळे निधन झाले. सातपैकी पाच जणांचा गोमेकॉत, तर दोघांचा दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात मृत्यू झाला. रविवार आणि सोमवारच्या चोवीस तासांत आरोग्य खात्याला ३,०६६ अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील २१८ जण करोनाबाधित सापडल्याने बाधित होण्याचा दर घटून ८.१४ टक्क्यांवर आला आहे. याशिवाय आणखी ४१३ जणांनी करोनावर मात केली. त्यामुळे करोनातून बरे होण्याचा दर ९६.३२ टक्क्यांवर गेला असून, सक्रिय बाधितांची संख्याही घटून ३,०६६ झाली आहे. राज्यात सुरुवातीपासून आतापर्यंत सापडलेल्या एकूण करोनाबाधितांचा आकडा १,६४,६५४ झाला आहे. त्यातील १,५८,५९१ जणांनी करोनावर यशस्वी मात केली आहे.
दरम्यान, फोंडा (२४७) वगळता इतर सर्वच केंद्रांतील सक्रिय करोनाबाधितांची संख्या दोनशेखाली आली आहे. सोमवारी पणजीत १७२, चिंबलमध्ये १४२, मडगावात १७९, साखळीत १४०, म्हापशात १०६, कांदोळीत ११८, खोर्लीत ८५, पर्वरीत ११०, कुडचडेत ९३, काणकोणात १२२, कुठ्ठाळीत १२७, वास्कोत १००, तर शिरोड्यात ११८ सक्रिय रुग्ण होते.
सुमारे ७.६० लाख नागरिकांचे लसीकरण
सोमवारी दिवसभरात राज्यातील १५,२५० जणांनी कोविड लस घेतली. त्यामुळे आतापर्यंत लस घेतलेल्यांची संख्या ७,६०,५७४ झाली आहे. आतापर्यंत राज्यातील ५,५६,७७८ जणांनी लसीचा पहिला डोस घेतला असून, १,०१,८९८ जणांनी दोन्ही डोस पूर्ण केले आहेत. आरोग्य खात्याकडे अजून १,१८,४२० डोस शिल्लक आहेत, अशी माहिती आरोग्य खात्याने दिली आहे.
अपंग व्यक्ती, गरोदर महिला कर्मचाऱ्यांना सूट द्या!
- करोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह, आरोग्य तसेच कुटुंब कल्याण मंत्रालयाने सरकारी सेवेत असलेल्या अपंग व्यक्ती तसेच गरोदर महिलांना घरातूनच काम करण्याची (वर्क फ्रॉम होम) सूट दिली आहे. केंद्राच्या या निर्णयाची राज्यात काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी, असे निर्देश सरकारने सर्वच सरकारी खात्यांच्या प्रमुखांना दिले आहेत.
- सर्वसामान्य खात्याचे सचिव श्रीपाद आर्लेकर यांनी यासंदर्भातील परिपत्रक जारी केले आहे. राज्यात करोनाचा प्रसार कायम असल्याने खातेप्रमुखांनी अशा व्यक्तींना वेळोवेळी सूट द्यावी, असेही परिपत्रकात म्हटले आहे.

हेही वाचा