योग, निसर्गोपचाराकडे जग आकृष्ट : गडकरी


22nd June 2021, 01:13 am
योग, निसर्गोपचाराकडे जग आकृष्ट : गडकरी

योग, निसर्गोपचाराकडे जग आकृष्ट : गडकरी

नवी दिल्ली : 

योग आणि आयुर्वेद ही भारताची शक्तिस्थाने आहे. आमचे ऋषी आणि संत यांनी याचा अभ्यास व यामध्ये संशोधन करण्याला हजारो वर्षांची परंपरा आहे. योग आणि निसर्गोपचार यामुळे संपूर्ण जगाला भारताचे आकर्षण आहे, असे मत रस्ते आणि परिवहन मंत्री नितिन गडकरी यांनी व्यक्त केले.

सूर्या फाउंडेशन आणि आंतरराष्ट्रीय निसर्गोपचार संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय योग दिन व्हर्च्युअल पद्धतीने साजरा करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आभासी पद्धतीने या कार्यक्रमात सूर्या फाउंडेशनचे अध्यक्ष जयप्रकाश अग्रवाल, आंतरराष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष अनंत बिरादर, छत्तीसगडच्या राज्यपाल अनसूया उइके, संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुनराम मेघावल, दार्जिलिंगचे खासदार राजू बिश्त, आदी मान्यवर सहभागी झाले होते. करोना महामारीमुळे लागू झालेल्या निर्बंधांनुसार केवळ काही मोजक्या लोकांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून योगासने केली व मुख्य कार्यक्रम ऑनलाइन झाला.

भारत हा तरुणांचा देश आहे. त्यांच्यासाठी योग आणि निसर्गोपचार या पद्धती कमी खर्चात आणि सहज उपलब्ध होणार्‍या प्रभावी उपचार पद्धती आहेत. प्रत्येक माणासापाशी, प्रत्येक घरात निसर्गोपचार पोहोचावा, हे आमच्या संस्थेचे ध्येय आहे, असे पद्मश्री जयप्रकाश अग्रवाल यांनी सांगितले. 

प्रत्यक्ष झालेल्या आणि ऑनलाइन कार्यक्रमात सूर्यनमस्कार आणि भ्रामरी प्राणायाम यांचे आयोजन करण्यात आले होते. यात २९ राज्यांतील ४०० जिल्ह्यांमधून हजारो योग साधक सहभागी झाले, अशी माहिती अनंत बिरादर यांनी दिली.