आत्मशक्ती हा महत्त्वाचा मार्ग

नरेंद्र मोदी : करोना महामारीच्या संकटात आशेचा किरण


22nd June 2021, 12:59 am
आत्मशक्ती हा महत्त्वाचा मार्ग

आत्मशक्ती हा महत्त्वाचा मार्ग 

नरेंद्र मोदी : करोना महामारीच्या संकटात आशेचा किरण

नवी दिल्ली : 

योगामुळे निरोगी आयुष्य, सामर्थ्य आणि सुखी जीवन मिळते असंही यावेळी त्यांनी सांगितले.  सुखी आयुष्यासाठी योग महत्त्वाचा आहे. करोना महामारीच्या संकटात तर योग हा आशेचा किरण आहे.  करोनाच्या अदृश्य व्हायरसने जगात धडक दिली तेव्हा कोणताही देश संसाधने तसेच मानसिकदृष्ट्या यासाठी तयार नव्हता. अशा कठीण काळात आत्मशक्ती महत्त्वाचा मार्ग ठरला, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने देशवासीयांना त्यांनी ऑनलाइन संबोधित केले. योगाने लोकांमध्ये करोनाशी लढण्याचा विश्वास निर्माण केला असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या.

आज जेव्हा संपूर्ण जग करोनाशी लढत आहे तेव्हा योग लोकांसाठी आशेचा किरण ठरत आहे. भारतात कोणताही मोठा सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला नसला तरी योग दिनाचा उत्साह कमी झालेला नाही. करोना असतानाही योग दिवसाची थीम ‘योग फॉर वेलनेस’ने कोट्यवधी लोकांमध्ये योगाप्रति उत्साह वाढवला आहे, असे नरेंद्र मोदींनी सांगितले.  योग दिनाच्या निमित्ताने प्रत्येक देश, समाज निरोगी राहावा, असे सांगत मोदींनी एकमेकांची ताकद बनूया, असे आवाहन केले.  

------------------

‘योग ते सहयोग’चा मंत्र 

योग ते सहयोगचा मंत्र भविष्यातील मार्ग दाखवत माणुसकीला सशक्त करेल असा विश्वास नरेंद्र मोदींनी व्यक्त केला आहे. जेव्हा भारताने योग दिनाचा प्रस्ताव ठेवला तेव्हा ते संपूर्ण जगासाठी उपलब्ध व्हावं अशी अपेक्षा होती. आज त्या दिशेने अजून एक पाऊल टाकत भारताने संयुक्त राष्ट्र आणि जागतिक आरोग्य संघटनेसोबत मिळून ‘माययोग’ अ‍ॅप आणलं आहे. कॉमन योग प्रोटोकॉलच्या अंतर्गत वेगवेगळ्या भाषेतील व्हिडिओ येथे उपलब्ध होतील. यामुळे जगभरात योगाचा विस्तार होण्यासाठी तसेच जगाला एकत्र आणण्यात महत्त्वाची भूमिका निभावली जाईल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला आहे.

--------------------

----------

ॐ च का म्हणायचे? : सिंघवी

योगाला ओंकाराशी जोडून त्याला हिंदू म्हणून खपवले जात आहे. ॐ चा जप केल्याने ना योग अधिक शक्तिशाली होईल आणि अल्लाह म्हटल्याने योगाची शक्ती कमी होणार नाही, असे मत काँग्रेसचे नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी व्यक्त केले आहे. 

----------------


-------------

म्हणायला काय हरकत आहे? : रामदेवबाबा 

‘ईश्वर-अल्लाह तेरो नाम, सबको सन्मति दे भगवान’ अल्लाह, देव, खुदा सर्व एक आहेत, तर ॐ बोलण्यात काय हरकत आहे. सर्वांनी योग केले पाहिजेत, तर त्या सर्वांना एकच देव दिसेल, असे रामदेवबाबा म्हणाले. 

----------

--------------

योग म्हणजे नौटंकी : काटजू

५० टक्के बालक कुपोषित आहेत, ५० टक्के महिला अ‍ॅनिमिक आहेत, बेरोजगारीने विक्रम मोडलेत, अशात हे योग दिन वगैरे मला नौटंकी वाटते, असे मत सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनी व्यक्त केले.

-------------


----------

योगामागे लपू नका : राहुल गांधी

हा योगा दिन आहे, योगा दिवसाच्या नावामागे लपण्याचा दिवस नव्हे. सरकारी नुकसानभरपाई ही एक छोटीशी मदत आहे परंतु मोदी सरकार हे करण्यासही तयार नाही, असे काँग्रेसचे नेते राहुल गांधी म्हणाले. 

-----------