१९८० नंतर स्वातंत्र्यमूल्यांचा सत्तेसाठी चुराडा

Story: वाचक पत्रे |
21st June 2021, 07:51 pm
१९८० नंतर स्वातंत्र्यमूल्यांचा सत्तेसाठी चुराडा

१९८० साली सत्तेत आलेल्या काँग्रेसने व त्यानंतर आलेल्या भाजपने खरेच का गोंयकारांना पोर्तुगीजांच्या  मानसिक गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले? की गोवामुक्तीमागच्या स्वातंत्र्यमूल्यांचा व स्वातंत्र्याकांक्षेचाच, सत्तेच्या लालसेपायी पार चुराडा करून टाकला? गोवामुक्तीच्या साठीनंतर हाती काय पडले,आणि काँग्रेस-भाजप सत्तांनी वाट कशी लावली ,याचा गोषवाराच एकदा मांडूया  ! १ भारतीय वारसा जपण्याऐवजी, पोर्तुगीज वारसा मात्र प्राणपणाने जपला ! २- पोर्तुगीजांचा विकृत बीभत्स कार्निवल भाराभार सरकारी अनुदान देऊन मुक्त गोव्याचा अधिकृत राज्य-उत्सव बनवला ! तो गोव्याच्या सर्व तालुक्यात नेऊन पोर्तुगीज स्मृति जागृत ठेवल्या.३- दिल्लीला प्रजासत्ताक दिन सोहळ्यात सामील होणारे गोव्याचे चित्ररथ पोर्तुगीज मुलामा असलेले अथवा पाश्चात्य धाटणीचे वाटतील, असे पाठवले! ४- सगळ्यात जास्त लोकसंख्या, बंदर व विमानतळ असलेल्या शहराचे " वास्को द गामा " या समुद्री पोर्तुगीज दरोडेखोराचे ठेवलेले नाव, काँग्रेस व भाजपाची केंद्र ,राज्य व नगरपालिकेत एकाच वेळी, एकाच पक्षाची सत्ता असताना देखील, बदलले नाही! ५- रस्ते व गावांची पोर्तुगीजांनी ठेवलेली नावे व अपभ्रष्ट केलेली स्पेलिंग्स व उच्चार जशास तसे ठेवले गेले आहेत. ६- काँग्रेस राजवटीत पर्यटनाचे निमित्त करून गोव्याची प्रतिमा " पूर्वेकडिल रोम " अशी हेतुपुरस्सर करण्यात आली. भाजपच्या राजवटीत ही प्रतिमा " व्यसनभूमी " अशी करण्यात आली.काँग्रेसने पहिला कॅसिनो गोव्यात आणला! भाजपने संख्या  वाढवून ती सहावर आणली.शिवाय कॅसिनोंना "ऑफशोर "असतानाही  मांडवीत कायमचे स्थिर कायदेशीर दर्जा दिला. ७ - गोवा मुक्त झाला तरी मये गावाला मुक्ति मिळालेली नाही. सनदा दैण्याच्या नावावर लोकांची फसवणूक चालली आहे. या सनदा तकलुपी असून ,कायद्याच्या आधारावर टिकणाऱ्या नाहीत. प्रत्येक निवडणुकीत वचने व घोषणा असतात. प्रश्न अजून सुटलेला नाही! ८- कुंकळीच्या पोर्तुगीजांविरुद्धच्या प्रेरक स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्याची इच्छाशक्तीच सरकारला नाही! फक्त आश्वासने देऊन फसवण्यात येत आहे! ९- गोवा मुक्तिलढ्याचा इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोचवण्यास अक्षम्य दुर्लक्ष्य व हेळसांड! १०- पोर्तुगीजपूर्व गौरवास्पद वारसास्थळे व ऐतिहासिक स्थळांना पर्यटनात अजिबात स्थान नाही! ११. गोव्याच्या पोर्तुगीजपूर्व गौरवशाली इतिहासाचा प्रचार व प्रसार शून्य १२- दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या फुटिरतावादाची कुणीच गंभीर दखल घेतलेली नाही. उलट सरकार त्यांना चुचकारते व संरक्षण देत आहे,हे ध्यानात येते. १३ -  गोवा,दमण,दीव स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास या मनोहर हिरबा सरदेसाई लिखित पुस्तकाचे 2 खंड, स्वातंत्र्यसेनानी टी.बी.कुन्हांचे ' डिनॅशनलायजेशन ऑफ गोवन्स', अ.का.प्रियोळकरांचे " इन्क्विजिशन ऑफ गोवा" या महत्वाच्या पुस्तकाचे पुनर्मुद्रण व ही पुस्तके सर्व शाळांना पाठवण्याचे सरकार मनावर घेत नाही. १४ - गोव्यातील ५१  किल्ल्यांची डागडुजी व जतन, त्यांचा संबंध पर्यटनाशी जोडणे, हाॅटल चालवायला विकलेले किल्ले परत घेऊन त्यांचा सन्मान राखणे एवढ्या वर्षात जमू नये? खाजगी मालकांना विकलेल्या जमिनीत अंतर्भूत असलेले महत्वाचे ऐतिहासिक अवशेष दखल न घेता नामशेष होऊ दिले जात आहेत. ६० वर्षे फुकट तर गेलीच आहेत! सत्तेच्या, लांगुलचालनाच्या पलिकडे जाऊन, राष्ट्रियतेची जाणीव असली तरच तरणोपाय! स्वातंत्र्यासाठी केलेला त्याग व दिलेली बलिदाने सत्ताधाऱ्यांनी निष्फळ ठरवलेली आहेत! दैवदुर्विलास! दुसरे काय?       

— प्रा. सुभाष भास्कर वेलिंगकर, राज्य संघचालक, भारतमाता की जय संघ, गोवा.