क्रांतिदिनी लोहिया मैदानावर राजकीय गर्दी

गोवा

Story: अंतरंग | अजय लाड |
21st June 2021, 07:46 pm

स्व. राम मनोहर लोहिया यांनी ज्या ठिकाणाहून गोव्याच्या स्वातंत्र्याची ज्योत गोमंतकीय जनतेच्या मनामनातून प्रज्वलित केली होती. त्या लोहिया मैदानावर क्रांतिदिनी अनेक राजकीय चेहर्‍यांची झालेली गर्दी पाहावयास मिळाली. नक्कीच उपस्थितांची हजेरी ही आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून असल्यानेच गेली चार वर्षे लोहिया मैदानावर न फिरकलेल्या व्यक्ती लोकांच्या हितासाठी आल्या की, राजकीय स्वार्थासाठी हे ठरवण्याची वेळ आता नागरिकांवर आलेली आहे.  

१८ जून १९४६ रोजी गोवा मुक्तीसाठी क्रांती झालेल्या ठिकाणी आता लोहिया यांचा पुतळा उभारुन या ऐतिहासिक ठिकाणाला लोहिया मैदान संबोधले जाते. गेली कित्येक वर्षे या स्थळाची महती कमी झालेली नाही. गोवा मुक्तीसंग्रामाची सुरुवात येथून झाल्याने प्रत्येक गोमंतकीयाची नाळ या ठिकाणाशी जोडली गेलेली आहे. राज्यातील कोणताही विषय असो, उत्तर गोव्यात आझाद मैदान तर दक्षिण गोव्यात लोहिया मैदान ही आंदोलन स्थळे झालेली आहेत. गोवा मुक्तीसाठीची ठिणगी पडलेल्या या ठिकाणावर आल्यावर स्वातंत्र्यासाठी प्राण अर्पण केलेल्या हुतात्म्यांची व लढलेल्या स्वातंत्र्यसैनिकांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. सत्यपाल मलिक यांची गोव्याच्या राज्यपालपदी नेमणूक झाली होती, त्या कालावधीत गेल्यावर्षी त्यांनी क्रांतिदिनी आवर्जून लोहिया मैदानाला भेट देत स्व. लोहिया यांच्यासह स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली वाहिली होती. तसेच राज्य सरकारने या लोहिया मैदानाच्या सौदर्यीकरणासाठीचा प्रश्‍न सोडवून आवश्यक तो निधी प्राप्त करुन द्यावा यासाठी मुख्यमंत्र्याशी चर्चा करु असेही त्यांनी सांगितले होते. जानेवारीत निविदा जारी करुन एप्रिलपासून लोहिया मैदानाच्या सौदर्यीकरणाचे काम सुमारे सव्वादोन कोटी खर्च करुन सुरु करण्यात आलेले आहे. लोहिया मैदानाच्या सौंदर्यीकरणाची स्वातंत्र्यसैनिकांची मागणी पूर्ण झाली असून स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांना नोकरी देण्याची प्रक्रियाही सरकारकडून सुरू आहे. 

लोहिया मैदान हे स्थळ गोमंतकीय जनतेच्या अस्मितेचे प्रतिक बनलेले असल्याने कोणत्याही प्रश्‍नासाठी न्यायाची मागणी करावयाची असल्यास आंदोलनाची सुरुवात याच ठिकाणाहून केली जाते. राज्यात येऊ घातलेल्या राष्ट्रीय महामार्ग, तमनार प्रकल्प, रेल्वेेचे दुपरीकरण या प्रकल्पांविरोधात जनता रस्त्यावर उतरली असून विविध माध्यमातून हे प्रकल्प विनाशकारी असल्याचे विविध संघटना, पर्यावरणवादी जनतेला पटवून देण्याचे काम करत आहेत. यासाठी याच लोहिया मैदानावर मोठी सभा आयोजित करुन सर्व विरोधी आमदारांना एकत्र आणत यापुढेही सत्ताधार्‍यांविरोधात एकत्र राहून सत्ता प्राप्त करण्याची मागणी करण्यात आली होती. यावेळीच्या क्रांतिदिनीही सत्ता प्राप्त करण्यासाठीच लोहिया मैदानावर येत सत्ताधार्‍यांकडून केलेली कामे विषद करत विकासकामे सुरू राहणार असे सांगण्यात आले तर विरोधकांकडून मात्र, राज्यातील प्रकल्प, कोविड काळातील नियोजनवर प्रश्‍नचिन्ह ठेवतानाच रासुकाबाबतही प्रश्‍न करण्यात आले. या क्रांतिदिनी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, फातोर्डा आमदार विजय सरदेसाई, उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांच्यासह मगोचे आमदार सुदिन ढवळीकर, आपच्या प्रतिमा कुतिन्हो, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार चर्चिल आलेमाव, कुंकळ्ळीचे आमदार क्लाङ्गासिओ डायस यासह अन्य राजकीय नेत्यांची उपस्थिती प्रामुख्याने लक्षवेधक ठरली. निवडणुका डोळ्यासमोर ठेवत लोकांच्या डोळ्यात राजकीय क्रांतीची धूळफेक सुरू झाली असून मागील निवडणुकीप्रमाणे सत्तेसाठी टीका केलेल्या पक्षाच्याच डेर्‍यात जाउन बसण्याची शक्यता कोणीही टाळू शकत नाही. सध्याच्या राजकीय व्यक्तींतून किंवा एखादा नवा उमेदवार निवडण्याची संधी मिळणार  आहे. निवडणुकीवेळी काय देणार यापेक्षा गोव्यासाठी काय करणार याचा विचार करणार्‍यांची गरज आहे, हे ओळखून नव्या क्रांतीची सुरुवात गोमंतकीयांनीच करावी.