अग्रलेख । वेदना उराशी बाळगून धावणारे मिल्खा सिंग

मिल्खा सिंग हे फक्त क्रीडापटूच नव्हते. १९९९ च्या कारगील युध्दात शहीद झालेल्या एका सैनिकाच्या मुलाच्या शिक्षणाचा आणि इतर सर्व खर्च त्यांनी उचलला.


21st June 2021, 07:42 pm
अग्रलेख । वेदना उराशी बाळगून  धावणारे मिल्खा सिंग

अनेक घटना आणि अनुभवांनी ओतप्रोत भरलेलं जीवन, चारवेळा आशियाई आणि राष्ट्रकूल स्पर्धेत एकदा सुवर्ण पदक मिळवून देशाचा सन्मान वाढवणारे फ्लाईंग शिख अर्थात मिल्खा सिंग यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले. अनेक आश्चर्यकारक घटनांनी ज्यांचे जीवन भरले होते ते मिल्खा सिंग आणि त्यांची पत्नी निर्मल कौर या दोघांनीही अवघ्या आठ दिवसांत एकापाठोपाठ जगाचा निरोप घेतला. कोविड महामारीच्या काळात अशा अनेक बातम्या रोज कुठून तरी येत असतात. मिल्खा सिंग यांना मेमध्ये कोविडची लागण झाली होती. त्यांच्या पत्नीही  पॉझिटीव्ह होत्या. सिंग यांचा ऑक्सिजन कमी झाल्यामुळे त्यांना जूनच्या पहिल्या आठवड्यात इस्पितळात दाखल केले होते. पाच दिवसांपूर्वीच त्यांच्या पत्नीचे कोविडमुळेच निधन झाले होते. बुधवारी मिल्खा सिंग यांचा कोविड अहवाल निगेटिव्ह आला होता पण शुक्रवारी त्यांनी जगाचा निरोप घेतला.  

हवेच्या वेगाने धावणारा धावपटू असे संबोधून त्यांना पाकिस्तानचे तत्कालीन सैन्य प्रमुख फिल्ड मार्शल आयुब खान यांनी फ्लाईंग शिख असा किताब दिला होता. पाकिस्तानात लाहोरमध्ये एका आंतरराष्ट्रीय शर्यतीत मिल्खा सिंग यांना आमंत्रित केले होते. पण सिंग यांना तिथे जायचे नव्हते. तत्कालीन पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी सांगितल्यानंतर शेवटी सिंग पाकिस्तानात गेले. पाकिस्तानचे धावपटू अबु खालीक यांना हरवल्यानंतर आयुब खान यांनी ‘मिल्खा सिंग तुम्ही आज धावत नव्हता, उडत होता’ असा गौरव करत फ्लाईंग शिखचा किताब दिला. खलीक हे त्यावेळी गाजलेले धावपटू. त्यांना पराभूत करणे हे एक मोठा विक्रम करण्यासारखेच होते. सिंग यांना १९५९ साली पद्मश्रीने गौरवले गेले. पण त्यानंतर ४२ वर्षांनी २००१ मध्ये त्यांना अर्जुन पुरस्कार देण्यासाठी विचारणा झाली पण आपल्याला जेव्हा तो मिळायला हवा ते तेव्हा तो मिळाला नाही असे म्हणत त्यांनी अर्जुन पुरस्कार नाकारला. नेहमीच स्वाभिमानाने जीवन जगलेल्या मिल्खा सिंग यांच्या जीवनावर आधारित आलेला ‘भाग मिल्खा भाग’ हा चित्रपटही तुफान गाजला. त्यांनी पन्नास वर्षांपूर्वी केलेले विक्रम आणि त्यांचे क्रीडा क्षेत्रातील योगदान नव्या पिढीला खऱ्या अर्थाने कळले असे म्हटल्यास ते अतिशयोक्तीपणाचे होणार नाही. धावपटू कसा असावा, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून मिल्खा सिंग यांच्याकडे पाहिले जात असे. 

मिल्खा सिंग हे फक्त क्रीडापटूच नव्हते. माणूस म्हणून त्यांनी जगाकडे पाहण्याचा आपला विशाल दृष्टीकोन कायम ठेवला. १९९९ च्या कारगील युध्दात शहीद झालेल्या एका सैनिकाच्या मुलाच्या शिक्षणाचा आणि इतर सर्व खर्च त्यांनी उचलला. १९५८ ते १९६२ पर्यंत सात सुवर्ण आणि १९६४ मध्ये रौप्य पदकाचे ते मानकरी ठरले. १९५८ आणि १९६२ साली आशियाई खेळांमध्ये एकूण चार सुवर्ण, कॉमनवेल्थमध्ये एक आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांत दोन सुवर्ण तसेच १९६४ च्या राष्ट्रीय क्रीडास्पर्धेत एक रौप्य पदक मिळवणारे मिल्खा सिंग यांनी भारतीय सैन्यात सेवा दिली. रोमच्या ऑलिम्पिक्समध्ये आपण अंतिम धावरेषेच्या जवळ पोहचलो असताना मागे वळून पाहण्याची चूक केली याची त्यांना कायम खंत होती. मिल्खा सिंग यांना त्या स्पर्धेत कांस्य पदक मिळाले होते. मिल्खा सिंग यांचा जन्म पाकिस्तानातल्या गोविंदपुरा इथला. फाळणीनंतर ते भारतात येऊन राहिले. भारत - पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण असताना मिल्खा सिंग यांनी पाकिस्तानातील जनतेची मने जिंकली. आणि त्याच देशाने जगात फ्लाईंग शिख नावाने ओळख देणारा किताब सिंग यांना दिला, ज्या नावाने त्यांना क्रीडा जगतात ओळखले जात असे. 

वेदना उराशी बाळगून धावणारा फ्लाईंग शिख असेच त्यांच्या बाबतीत म्हणावे लागेल. कौटुंबिकदृष्ट्या ते अतिशय दुर्दैवी ठरले होते, ते सतत संकटांना सामोरे जात राहिले. देशाच्या फाळणीपूर्वी त्यांच्या आठ भावंडांचा मृत्यू झाला होता. फाळणीवेळी त्याचे आईवडील, भाऊ, दोन बहिणींचा हिंसेत मृत्यू झाला. नियतीच्या दुर्दैवी खेळात ते एकटे पडले. मिल्खा सिंग फाळणीवेळी भारतात आले आणि त्यानंतरचा निराशा झटकलेला, उत्सहाचा झरा, सच्चा खेळाडू, क्रीडापटू आजपर्यंतचा मिल्खा सिंग देशाने पाहिला. ह्या महान धावपटूला श्रद्धांजली.